गोबेल्सचा दुसरा भाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |
 


गोबेल्सचे तंत्र मरत नाही. ते जन्माला येत राहाते, दर वेळी नव्या अवतारात...

 

१९२५ साली अ‍ॅडॉल्फ हिटलरने ‘माइन काम्फ’ हे त्याचे आत्मचरित्र लिहून प्रकाशित केले. यानंतर लोकांना एक मोठा धक्का बसला, कारण त्याच्या ‘द बिग लाय’ तंत्राचे रहत्सोद्घाटन त्याने यात केले होते. इतक्या व्यापक प्रमाणात खोटारडेपणा करायचा की कोणालाही वाटणार नाही की, हा अपप्रचाराचा भाग आहे. पहिले महायुद्ध जर्मनी हरला, तो ज्यूंनी वापरलेल्या या तंत्रामुळेच. यानंतर बरोबर १६ वर्षांनी गोबेल्सनेही या तंत्रावर भाष्य केले. इंग्रजी नेतृत्वाचा विजय हा एका महाकाय असत्यावर अवलंबून होता, असे असत्य जे इतके मोठे असेल की, त्यावर सगळ्यांना विश्वास ठेवावा लागेल. एक मात्र करायचे ते म्हणजे या असत्याला सगळ्यांनी चिकटून मात्र राहायचे. गोबेल्सचा रोख वस्तुत: ग्रेट ब्रिटनचा नेता चर्चिलकडे होता.

 

अर्थकारणातही खर्‍या-खोट्या नाण्यांवर असाच खल झालेला आपल्याला आढळतो. बाजारात खोटी नाणी आली की, खरी नाणी बाजूला पडतात. ग्रेशमही म्हणतो की, "आपल्याकडे खोटी नाणी असतील तर आपण ती आधी चलनात आणतो आणि खरी स्वत:जवळ ठेवून घेतो." हा सगळा तपशील आठविण्याचे कारण म्हणजे, जम्मू-काश्मीरच्याबाबतीत जे सध्या सुरू आहे. देशाचे नवे गृहमंत्री अमित शाह यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यसभेत ३७० कलम हटविण्याचा संकल्प जाहीर केला आणि नंतर सणसणीत मतधिक्याने तो हटविलादेखील. आधी उल्लेखलेल्या भयगंडांची पुरेशी पेरणी अत्यंत खोटारडेपणा करून व्यवस्थित केली गेली होती. मोदी आणि शाह यांनी या भयगंडाला भीक घातली नाही. अत्यंत धाडसाने त्यांनी हे पाऊल उचलले आणि ३७० वे कलम हटवून टाकले. ज्या काही भाकडकथा सांगून यापूर्वी भारतीय राजकारण्यांना घाबरविले गेले, त्याचा काहीच परिणाम होताना दिसला नाही.

 

मोदी किंवा अमित शाहांना या गोबेल्स तंत्राची भीती कधीच वाटली नव्हती. फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि अशा कितीतरी बुणग्यांच्या धमक्यांना बिलकुल भीक न घालता, त्यांनी ३७०चे जोखड जम्मू-काश्मीरच्या मानेवरून उखडून टाकले. गोबेल्सच्या तंत्राचा पहिला अध्याय इथे संपला. मात्र, दुसरा सुरू झाला आहे. हा अध्याय आहे जम्मू-काश्मीरमधील वस्तुस्थितीचा विपर्यास करून जगासमोर मांडण्याचा. ही पद्धत तशी जुनीच आहे. पॅलेस्टाईनमध्ये वापरले जाणारे व्हिडिओ ज्या पद्धतीने केले जायचे, तसेच व्हिडिओे निर्माण करण्याची पद्धत आता पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, आता बोललेले खोटे लगेचच उघडे पडत आहेत. गोबेल्स तंत्राचा सुधारित अध्याय हा तितकाच मजेशीर आहे. यातील पहिले भांडे फुटले ते एका दृष्टी गमावलेल्या तरुणीचे चित्र समोर आल्यानंतर.

 

काश्मीरमध्ये भारत सरकार पुरस्कृत दहशतवादाचा बळी ठरलेली ही तरुणी आहे, असा दावा होता. याला पॅलेटगनच्या वापराची पार्श्वभूमी होती. मानवतेच्या मूल्याखाली मूर्ख बनविल्या जाणार्‍या विचारवंतांमध्ये हा व्हिडिओे चालूनही गेला असता. मात्र, ज्या कोणी या चित्राचे काम केले होते, त्याने ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय इंटरनेट मालिकेतील ‘आर्या स्टार्क’ या पात्राचा वापर केला होता. त्यामुळे ही चोरी पटकन पकडली गेली. दोन-तीन आंतरराष्ट्रीय वाहिन्यांनीदेखील दगडफेकीचे जुने चलचित्र वापरून जम्मू-काश्मीरचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आणि तो असाच पकडला गेला. मुक्तमाध्यमांचे चव्हाटे हे अशा सत्याअसत्याच्या पडतळीच्या मोठ्या ऐरणी झाल्या आहेत. इथेच हातोडे पडतात आणि जे बेगडी असते, ते तिथल्या तिथे फुटून जाते. आपल्या माध्यमातील दबदब्याच्या जीवावर अशी असत्ये कधी जाणीवपूर्वक, तर कधी मूर्खपणे खपविणार्‍यांची यामुळे चांगलीच गोची झाली आहे. फारूख अब्दुल्ला किंवा मेहबूबा मुफ्ती जे सांगतील ते खरे मानणार्‍यांची आणि तेच वास्तव म्हणून जगासमोर मांडणार्‍यांची अवस्था बिकट आहे.

 

काही इंटरनेट माध्यमातील मंडळींनी आपले नेहमीचेच व्हिडिओ चालविण्याचे तंत्र चालविले आहे. ज्यात एक नोकरी करणारी काश्मिरी तरुणी आपल्या आईशी आपल्याला कसा संवाद साधता आला नाही, याच्या करुण कथा सांगत असते. आता मुद्दा असा की, इतकी वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये जे सुरू आहे, त्यामुळे या मुलीला आणि तिच्या आईला काही भोगावे लागले नाही. मात्र, आता ३७० कलम उठवायला लावल्याबरोबर यांची रडारड सुरू झाली आहे. एक डावा व्यवस्थाविरोधी सूर आहेच. ‘आधी आमचे काहीच झाले नव्हते. आता तरी काय होणार?’ की सगळी वार्तांकने एक विशिष्ट प्रकारचा सूर निश्चित करण्यासाठी केली जात आहेत. हा सूर आहेे भारतविरोधाचा. जागतिक पातळीवर भारताचे नाव खराब करण्याचा. याचा परिणाम अत्यंत धोरणात्मक असा असतो. कुठल्याही राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला मान्यता देण्यासाठी अन्य राष्ट्रांची त्या राष्ट्राविषयीची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरते. ही भूमिका कशी निश्चित करायची, यासाठी या वार्तांकनाचा उपयोग होतो. काही ब्रिटिश व अमेरिकन खासदारांनी या प्रतिमांच्या आधारावर भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

 

या सगळ्या उद्योगात माध्यमातले व अभिव्यक्तीच्या क्षेत्रात काम करणारे लोक मोठी भूमिका पार पाडतात. या मंडळींना बळी पडले की, चावी लावलेल्या खेळण्यांप्रमाणे त्यांचा वापर करता येतो. महेश भट हे असेच प्रकरण. पूर्वी हे महाशय अशा मोहिमांत अग्रस्थानी असायचे. मात्र, डेव्हिड हेडली हा दहशतवादी पकडला गेल्यानंतर या महाशयांची बोलतीच बंद झाली. कारण, महेश भट यांचा मुलगा डेव्हिड हेडलीचा मित्र निघाला. यात महेश भट यांच्या मुलाला क्लीन चिट मिळून गेली. पण, हेडलीसारख्या महाधूर्त दहशतवाद्याबरोबर महेश भट यांच्या मुलाचा मैत्री करण्यासाठी का निवडतो, हा प्रश्न आहे. कारण, वास्तवाचे भान न ठेवता ही मंडळी कठपुतळ्यांसारखी नाचायला लागतात. कठपुतळ्यांचे बरे असते. त्यांनी वर पाहिले तरी आपले सूत्रधार कोण आहेत, ते त्यांना कळू शकते. मात्र, यांची सूत्रे कोणाच्या हाती आहेत, हे कधीच बाहेर येत नाही. कुठल्याही जाहिरातींशिवाय चालणारी ही इंटरनेट माध्यमे कशाचा जिवावर चालतात, हा प्रश्नच आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@