कुणी घर देईल का घर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2019   
Total Views |



मुंबईमध्येच काय, कुठेही घर घेणार्‍या कष्टकरी जनतेला विचारा. त्याच्यासाठी एक घर आयुष्यभर हाडं मोडून, रक्ताचं पाणी करून पै पै जमवलेल्या पैशाचं स्वप्न. खुराड्यासारखं का असेना, स्वतःचं हक्काचं घर असलं की, मुंबईकरांना स्वर्ग गवसल्याचा आनंद होतो. पण हेच कष्टाने मिळवलेले हक्काचे घर जेव्हा या ना त्या कारणाने त्याच्यासमोर कोसळते किंवा त्या घरावरचा त्याचा ताबा केवळ नाममात्र राहतो, त्यावेळी या कष्टकरी माणसाने काय करावे? विक्रोळी कन्नमवार नगर १ येथील १३ इमारतींचा १३ वर्षांपूर्वी पुनर्विकास करण्याचा घाट घातला गेला. एका बिल्डरने या कामाची तयारीही केली. मात्र, या इमारतींचा विकास सीआरझेडच्या नियमात अडकला. त्यामुळे इमारतींचा विकास करणार्‍या बिल्डरने या इमारतींचा प्रस्ताव दुसर्‍या एका बिल्डरला दिला. मात्र, त्यालाही सीआरझेडमुळे काम करता आले नाही. इमारतींचा विकास रखडला म्हणून काही लोकांच्या तक्रारीमुळे स्थानिक आमदारांनी या इमारतींच्या विकासकामामध्ये लक्ष घातले. पण मामला सीआरझेडचा असल्याने लोकांना दिलासा मिळाला नाही. मग काही लोकांनी इमारतींच्या पुनर्विकासासाठी तिसर्‍याच बिल्डरचा पर्यायही निवडायला सुरुवात केली. मग पहिल्या विकासकाकडून रहिवाशांना महिन्याला जे भाडे मिळायचे, ते येणंही बंद झाले. मग लोक या इमारतींमधले आपले तोडकेमोडके रूमही सोडायला तयार झाले नाहीत. इथे पुनर्विकास कोण करणार यासाठी डोकेफोडी सुरू, (या डोकेफोडीमध्ये राजकारण्यांना भयंकर रस हेही एक कोडे) लोकांचा आता सगळ्यावरून विश्वास उडालेला. कारण जो कोणी या प्रकल्पामध्ये येतो, एक तर तो नेतेगिरी करायला किंवा या प्रकरणातून पैसे उकळण्यास येतो. अशातच या १३ इमारतींपैकी ४३ क्रमांकाची इमारत कालपरवा कोसळली. पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत असलेली ही इमारत. गेली कित्येक वर्षे जीर्णशीर्ण अवस्थेत होती. आपल्याला घर मिळेल, या आशेत हक्काच्या घरातून बाहेर पडून, दुसरीकडे भाड्याने राहणार्‍या या पडक्या इमारतीतील लोकांना काय वाटले असेल, याचा विचारही करवत नाही. इमारतींचा पुनर्विकास होत राहिल, पण आपले हक्काचे घर मरण्यापूर्वी तरी मिळेल, अशी आशा करत मरत मरत जगणार्‍या लोकांना कुणी घर देईल का घर...?

 

सर सलामत तो घर पचास!

 

गेल्या काही वर्षांमध्ये जोरदार पावसामुळे घर कोसळले किंवा धोकादायक इमारतींचा काही भाग कोसळला, हे नेहमीच ऐकायला मिळते. मुंबईत सहा वर्षांत ३ हजार ३२३ इमारतींचे भाग कोसळून त्यामध्ये २४९ लोकांना हकनाक मरावे लागले. याची कारणे काय असतील ती असतील... पण खरेतर महानगरपालिका, प्रशासन अशा धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते, तसेच काही धोकादायक असेल तर रहिवाशांना नोटीसही पाठवते. मात्र त्याचे पुढे काय होते? बहुतेकदा असेच होते की, त्या धोकादायक इमारतींचा, घराचा काही भाग कोसळतो आणि त्यात निष्पाप जिवांचा बळी जातो. त्यानंतर प्रशासनावर, सत्ताधारी पक्षावर ताशेरे ओढत दूरचित्रवाणीवरील प्रत्येक वृत्तवाहिनी बातम्यांचा वर्षाव करते, तर वर्तमानपत्रांमध्येही या बातम्यांचा रतीब किमान आठवडाभर सुरू राहतो, पण नंतर सगळे आलबेल होते. मरणारे मरतात, त्यांच्या पाठी राहणारे पुन्हा नव्याने तिथेच राहतात. सगळेच रामभरोसे. असो. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. आपण माणूस आहोत, ही जाणीव माणसाला झाल्या क्षणापासून माणूस निवारा शोधत आहे. अश्मयुगातही गुहेच्या स्वरूपात माणसाने निवारा शोधला होता. आज प्रगत अवस्थेमध्येही हाच निवारा माणसाच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला आहे. ऊन-वारा-पावसापासून संरक्षण म्हणून नुसते डोईवर छप्पर नव्हे तर आता घर म्हणजे माणसाचे स्टेटस सिम्बॉलही झाले आहे. या घराच्या आपलेपणाबाबत उंचच उंच आकाशाला भेदणार्‍या गगनचुंबी इमारती आणि त्याला खेटूनच दारिद्य्राचे दशावतार दाखविणार्‍या झोपडपट्टीचेही समान भावबंध. स्वतःचे घर या गोष्टीसाठी गरीब-श्रीमंत दोघेही आक्रमकच असतात. खरे तर आपल्या जिवाला धोका आहे, हे जाणत असूनही माणसं तिथे का राहतात? कारण मरण्यापेक्षाही माणसाला जगण्याचा आणि राहण्याचा प्रश्न मोठा वाटतो. काय होणार आहे? जे होईल ते होईल. बघूया... अशा खोट्या आशावादात माणूस अक्षरशः जीव टांगणीला ठेवून पडक्या इमारतींमध्ये राहतो. त्याला आस असते, पडके का होईना शहरात माझे घर आहे. एक बंगला बने न्यारा हा अट्टाहास तसा कोणाही मुंबईकरांचा नसतो. मात्र, रात्री अंग टाकायला किमान हक्काची जागा हवी, असे प्रत्येकाला वाटते. पण जेव्हा घर आयुष्यालाच घरघर लावते तेव्हा? त्यामुळे प्रत्येकाने सत्य ओळखावे की, जब सर सलामत तो घर पचास.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@