दुसरे औषध शोधावे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |


 


मोदीद्वेषाचा मूळव्याध झालेल्यांनी आपल्या आजारावर दुसरे काही औषध शोधावे. कारण, या पत्रापत्रीतून जनतेच्या मनातून उतरण्याखेरीज काहीही साध्य होणारे नाही.

 

"देशातील मुस्लीम, दलित आणि अल्पसंख्याकांचे झुंडबळी तत्काळ थांबवा," अशी मागणी करत चित्रपट, साहित्य, कलाक्षेत्रातील '४९ वजा १' ख्यातनामांनी (चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनी मला न विचारता नाव टाकल्याचे म्हटले) पुन्हा एकदा असहिष्णुतेच्या नावाने ठणाणा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात झुंडहल्ल्यातील बळी, मुस्लिमांवरील अन्याय-अत्याचार, 'जय श्रीराम' ही घोषणा आणि शहरी विचारवंत-नक्षलवाद्यांचा उल्लेख या लोकांनी केला. आपल्याला केवळ मुस्लीमहितैषी समजू नये, म्हणून त्यांनी या पत्रात दलितांविरोधातील (निवडक) गुन्ह्यांचा मुद्दाही जोडला. सोबतच आपल्या मुद्द्यांच्या पुष्ट्यर्थ 'राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा'ची आकडेवारीही दिली. दरम्यान, सध्याच्या समाजमाध्यमी युगात एखाद्या व्यक्तीला मारहाण केल्याची ध्वनिचित्रफित फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्रामवर बर्‍याचदा पाहायला मिळते. नंतर अशा बातम्या पसरवल्या जातात की, अमुक अमुक ठिकाणी झुंडीच्या हल्ल्यात तमुक तमुक व्यक्तीचा जीव गेला.

 

खरे म्हणजे कोणत्याही घटनेत कोणाही व्यक्तीचा बळी जाणे, हे नक्कीच निषेधार्ह, त्यामुळे त्याचे समर्थन कधीच होऊ शकत नाही. पण, असल्या घटनांतूनच सुरू होते विशिष्ट गोटातल्या व्यक्तींचे 'हिंदू विरुद्ध मुस्लीम' वा 'खुला वर्ग विरुद्ध दलित' असा कोन शोधण्याचे गलिच्छ राजकारण! एकदा मारणार्‍यांचा आणि मरणार्‍याचा धर्म शोधला, त्यातील व्यक्ती अनुक्रमे हिंदू व मुस्लीम असल्या की, आपल्या स्वार्थपूर्तीसाठी कोणत्याही थराला जाणार्‍यांचे डोळे चमकतात. अशा घडामोडींच्या आडून आपला अजेंडा राबविण्यासाठी चटावलेले लोक मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील भाजप सरकार आणि रा. स्व. संघाच्या नावाने बोंबाबोंब चालू करतात. कारण, आता ही प्रथाच पडलीय की, देशाच्या राजधानीपासून ते पार कानाकोपर्‍यापर्यंत एखादी घटना घडली की, त्याला पंतप्रधानांना जबाबदार ठरवायचे. जरा काही कुठे खुट्ट वाजले की, त्याचे पाप मोदींच्याच माथी मारायचे, हा काही लोकांचा आवडता उद्योग झाला आहे. आताचे पत्रही त्याचाच एक भाग.

 

वस्तुतः झुंडहल्ल्यात मुस्लिमांचा प्राण गेल्याचा व त्याला 'जय श्रीराम' ही घोषणा जबाबदार असल्याचा आरोप हा निखालस खोटा असून त्याला कसलाही पुरावा नाही. काहीच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी झुंडहल्ल्याची प्रकरणे 'जय श्रीराम' घोषणेशी संबंधित नसून वैयक्तिक वादातून झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे स्वतःला फार मोठे विद्वान समजून 'जय श्रीराम' घोषणेला विरोध करणार्‍यांनी, त्यावर बंदी घालण्याच्या अभिलाषेने काहीबाही खरडणार्‍यांनी स्वतःची बुद्धी तपासून घ्यावी. तसेच 'जय श्रीराम'वर आक्षेप घेत या लोकांनी त्याला चिथावणीखोर युद्धघोषही ठरवले. त्यामुळे त्याचाही समाचार घेतला पाहिजे. होय, 'जय श्रीराम' हा युद्धघोष होताच-हनुमंताने लंकेवर उड्डाण करतेवेळी, वानरसेनेने रावणाच्या अत्याचाराविरोधात हाती शस्त्र घेतले, त्यावेळी 'जय श्रीराम'चीच घोषणा दिली होती. अर्थात, हा संदर्भ ऐतिहासिक काळाशी निगडित आहे, आताच्या नव्हे.

 

आज मात्र 'जय श्रीराम', 'राम राम', 'जय रामजी की', या घोषणा कोट्यवधी नागरिक दैनंदिन अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसतात. पण देशातील हिंदू परंपरा, संस्कृतीच्या बदनामीसाठीच ज्या ताकदी काम करतात, त्यांना ते कसे दिसेल? उलट या विघातक शक्तींना त्याला विरोध करण्यातच शहाणपणा वाटतो. तेदेखील मुस्लिमांवरील अत्याधिक प्रेमापोटी व त्यातून आपला स्वार्थ साधण्यासाठीच! अन्यथा त्यांनी 'अल्ला-हूँ-अकबर'च्या नावाने दहशतवादी, फिदायीन, आत्मघाती हल्ले होत असतानाही, त्यात भारतातच नव्हे तर जगभरात शेकडोंच्या संख्येने माणसे मरत असतानाही त्या नार्‍याला कधी भडकावू वगैरे ठरवले नाही. दुसरीकडे मुस्लिमांच्या हक्क-अधिकारांचा कळवळा दाटून येणारे असे मानतात की, मुसलमान व्यक्ती ही या देशाची केवळ नागरिक नाही, तर त्यापेक्षाही 'काहीतरी अधिक' आहे. मात्र, अशा सर्वसामान्य नागरिकांहूनही 'काहीतरी अधिक' असलेल्या मुस्लिमांना त्यांचा हक्क-अधिकार मिळत नाही, त्यांच्यावर नेहमीच दडपण आणले जाते, अन्याय केला जातो, असे या पत्रापत्री करणार्‍यांना वाटते. म्हणूनच जेव्हा पाहावे, तेव्हा मुस्लीमच पीडित असल्याचे भासवून त्यांच्या नावाने यांची रडारड सुरू असते. परंतु, काश्मीर खोर्‍यातील पंडितांपासून ते गोध्रातील कारसेवकांचे जळीतकांड आणि कंधमालमधील स्वामी लक्ष्मणानंदांपासून ते कालपरवा चेतन शर्मावर झालेल्या हल्ल्यापर्यंतच्या घटना या लोकांना भयानक वाटत नाही.

 

उलट हिंदूंवरील अन्यायाच्या वेळी देशातील उदारमतवादी आणि लेनिन-माओच्या नावाने गांजा ओढणारे डावे विचारवंत रंगीबेरंगी पेयाचे चषक भिडवण्यात वा मैफिली सजवण्यात गुंग असतात. हा दुटप्पीपणा करणार्‍यांना, निवडक घटनांवरून काहूर माजवणार्‍यांना, अफवांनाही खरेपणाची कल्हई लावणार्‍यांना 'जय श्रीराम' ही घोषणा मात्र युद्धाला उत्तेजन देणारी घोषणा वाटते व मुस्लीम समाज त्यामुळे घाबरल्याचे चित्र रंगवले जाते. परंतु, मुस्लीम समाज घाबरलेला वगैरे नसल्याचे गेल्या काही घटनांतूनच दिसते. श्रावण महिन्यात जाणार्‍या कावडीयांवरील हल्ला, मार्ग रोखण्याचा प्रकार असो वा टिकटॉकवरून हिंदूंविरोधातील वटवट वा १५ मिनिटांसाठी पोलीस हटवण्याचे स्वप्न पाहणे, यातून खरा प्रकार उघडपणे दिसतोच. पण डोळे आणि कान बंद केलेल्यांना ते कोणी सांगावे?

 

कौशिक सेन, कोंकोना सेन-शर्मा, परमब्रत चट्टोपाध्याय, पार्था चटर्जी, रिद्धी सेन, रुपषा दासगुप्ता, शक्ती रॉय चौधरी, सामिक बॅनर्जी, शिवाजी बसू, श्याम बेनेगल, सौमित्र चॅटर्जी, सुमन घोष, सुमित सरकार, तनिका सरकार, तपस रॉय चौधरी, अदिती बसू, अंजन दत्त, अनुपम रॉय, अपर्णा सेन, बैसाखी घोष, विनायक सेन, बोलन गंगोपाध्याय, चित्रा सिरकार, देबल सेन, गौतम घोष, झोया मित्रा आदी बहुसंख्य बंगाली मंडळींचा भरणा या पत्राच्या प्रेषकांत आहे. साहजिकच यावरून त्यांचा हेतूही लक्षात येतो. बंगालमध्ये सध्या सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जींच्या छत्रछायेखाली हे टोळके राहू इच्छिते व ममतांनी आपल्या राज्यात 'जय श्रीराम'वरून काहूर माजवले आहे. 'जय श्रीराम'चा घोष कानावर पडला तरी ममतांचे माथे ठणकते. ममतांच्या इशार्‍यावर तृणमूलच्या गुंडांनी 'जय श्रीराम'चा जयघोष करणार्‍यांविरोधात हिंसाचारही घडवून आणला. अशा परिस्थितीत आपणही 'जय श्रीराम' ला विरोध केला, मर्जी राखली तर ममतांकडून आपल्या ताटात पदांचा, सत्तेचा चतकोर-अर्धकोर तुकडा पडेल, असे या लोकांना वाटते. म्हणूनच त्यांनी बंगालपुरत्या मर्यादित विषयाला संपूर्ण देशाचा करत मोदींना पत्र लिहिले. मात्र, गुन्हे रोखण्याची व त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची नव्हे तर राज्य सरकारची असल्याची बाब हे लोक सोयीस्कररित्या विसरले.

 

आपल्या पत्रात त्यांनी कोणत्याही राज्य सरकारचा उल्लेख केलेला नाही. उद्या मोदींनी खरोखरच राज्याच्या कारभारात हस्तक्षेप केला तर याच गोतावळ्यातले काही महाभाग हे राज्यांच्या अधिकारावरील अतिक्रमण, संघराज्य भावनेची गळचेपी वगैरे नावाने धुडगूस घालायला कमी करणार नाहीत. झुंडहल्ले, 'जय श्रीराम' घोषणेबरोबरच अभिव्यक्तिस्वातंत्र्याची वकिलीही या लोकांनी पत्रातून केली. त्यासाठी कोणाला राष्ट्रविरोधी वा शहरी नक्षल म्हणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. परंतु, या अतिबुद्धीमंतांना हे कळत नाही की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे स्वैर वागण्या-बोलण्यासाठी दिलेले नाही. स्वातंत्र्याच्या अधिकाराबरोबरच कर्तव्य-जबाबदारीही येते. पण त्याचा मागमूसही त्यांच्या शब्दांत दिसत नाही. सोबतच ज्यांना 'शहरी नक्षल' म्हटले जाते, त्यांना कोणी वैयक्तिक आकसापोटी वा द्वेषापोटी तसे म्हणत नसते, तर त्यांच्या विचारसरणीतील खोटेपणा, विघातकतेमुळेच राष्ट्रविरोधी म्हटले जाते. पण हे या शहाण्यांना समजल्याचे दिसत नाही; अन्यथा नक्षलवादाच्या आरोपावरून शिक्षा भोगलेल्या विनायक सेनने त्यावर सही केली नसती. अर्थात हे सगळेच सुरू आहे, ते नरेंद्र मोदींच्या दुसर्‍यांदा सत्तेवर येण्याने. पण, मोदीद्वेषाचा मूळव्याध झालेल्यांनी आपल्या आजारावर दुसरे काही औषध शोधावे. कारण, या पत्रापत्रीतून जनतेच्या मनातून उतरण्याखेरीज काहीही साध्य होणारे नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@