काँग्रेससाठी घराणेशाही श्रेष्ठ, बाकी सारे गौण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019   
Total Views |



काँग्रेसच्या घराणेशाहीवर श्रद्धा ठेवणारे एकटे चाको नाहीत तर, अख्खा काँग्रेस पक्षच नेहरू-गांधी घराण्याचे गोडवे गाण्यात स्वतःला धन्य समजत आला आहे. हुजरेगिरी करणे, हा त्या पक्षातील नेत्यांचा स्वधर्म असल्याने आपण काही वावगे करीत आहोत, असेही त्यांना वाटत नाही.


देशभर सर्वत्र निवडणूक प्रचाराची धामधूम चालली असून या निमित्ताने विविध पक्षांचे खरे राजकीय रंग दिसण्यास प्रारंभ झाला आहे. काँग्रेस पक्ष तर आपणास जनतेचा अपार कैवार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांपासून गल्लीतील नेत्यांपर्यंतची उभी हयात भ्रष्टाचार करण्यात गेली, त्या नेत्यांना निवडणुका आल्या की, एकदम मतदारांचे भरते आल्याचे दिसत आहे. तसेच काँग्रेस पक्ष घराणेशाहीचे गोडवे गाण्यात गर्क असल्याचे प्रत्यंतर या निमित्ताने आले आहे. काँग्रेसचे नेते पी. सी. चाको हे पक्षाचे दिल्लीचे प्रभारी. त्यांनी मध्यंतरी गांधी घराणे म्हणजे ‘देशाचा प्रथम परिवार’ असल्याचे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत, काँग्रेसचा ‘प्रथम परिवार’ कधीच सत्तेवर येऊ शकत नसल्याचे म्हटले होते. मोदी यांनी गांधी घराणे हे केवळ काँग्रेस पक्षापुरते सीमित केल्याचे चाको यांना खटकले आणि त्यानी गांधी घराणे हे ‘खऱ्या अर्थाने देशाचा प्रथम परिवार’ असल्याचे म्हटले. काँग्रेसच्या घराणेशाहीवर श्रद्धा ठेवणारे एकटे चाको नाहीत तर, अख्खा काँग्रेस पक्षच नेहरू-गांधी घराण्याचे गोडवे गाण्यात स्वतःला धन्य समजत आला आहे. हुजरेगिरी करणे, हा त्या पक्षातील नेत्यांचा स्वधर्म असल्याने आपण काही वावगे करीत आहोत, असेही त्यांना वाटत नाही. पी. सी. चाको यांच्या वक्तव्याचा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खरपूस समाचार घेतला. आणीबाणीच्या काळात देवकांत बारुआ यांनी ‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा दिली होती. चाको यांनी ती हुजरेगिरी करण्याची संस्कृती काँग्रेसमध्ये विद्यमान असल्याचे पुन्हा दाखवून दिले इतकेच!

 

घराणेशाही ही काँग्रेसची संस्कृती असल्याचे स्पष्ट करून, भारतीय जनता पक्ष मात्र देशातील गरीब कुटुंबास आपला ‘प्रथम परिवार’ मानत असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी ठामपणे सांगितले. पण, झापडे बांधून चालणाऱ्या काँग्रेसजनांना, घराणेशाहीचे जोखड घेऊन वाटचाल करण्यात धन्यता वाटत असेल तर त्यास तुम्ही आम्ही काय करणार? लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रचार जोरात चालू असला तरी विरोधी पक्ष मात्र अजून चाचपडत असल्याचेच दिसत आहे. त्यांचे ‘महागठबंधन’ प्रत्यक्षात कधी येणार ते विरोधी नेत्यांनाच माहीत! मात्र, दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका करणे सुरूच ठेवल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याचे दिसत आहे. विरोधक हे भ्रष्टाचाररूपी फेविकॉलमुळे एकमेकांना चिकटून राहिले असल्याची टीका पंतप्रधानांनी केली आहे. जी मंडळी जामिनावर आहेत, ती चौकीदारावर टीका करताना दिसत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. ‘नॅशनल हेराल्ड’ खटल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी या जामिनावर आहेत, हे सर्वविदित आहेच. भ्रष्टाचारी काँग्रेसवर टीका करताना, आपणास ‘भलाई’ करणारे सरकार हवे की ‘मलई’ खाणारे सरकार हवे? तसेच ‘दमदार’ सरकार हवे की ‘दागदार’ सरकार हवे, असा प्रश्नही त्यांनी मतदारांना केला आहे.

 

भाजप आणि मित्रपक्षांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत असताना सत्ताधारी भाजपची कोंडी कशी करता येईल, असा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन शक्ती’ यशस्वी झाल्याची माहिती देशवासीयांना दिल्यानंतर अस्वस्थ झालेल्या विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन आदर्श आचारसंहितेचा हा भंग असल्याची तक्रार केली. पण, आयोगाने ती फेटाळून लावल्याने विरोधकांच्या तक्रारीतील हवा निघून गेली. या निमित्ताने काँग्रेसचे नेते सोयीनुसार या बोटावरील थुंकी त्या बोटावर कशी फिरवतात, हेही दिसून आले. राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याने त्याबद्दलची सर्व माहिती उघड झाली पाहिजे, त्यात काहीही गुप्तता पाळायला नको, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने केली जात आहे. पण, ‘मिशन शक्ती’ यशस्वीपणे पार पडल्याची माहिती पंतप्रधानांनी देऊन मोठी चूक केली, असे भाष्य माजी संरक्षणमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केले. संरक्षणविषयक गुपिते फोडल्याबद्दल चिदंबरम यांनी सरकारची संभावना केली. काँग्रेस नेत्यांच्या या वागणुकीला दुटप्पीपणा नाही तर काय म्हणायचे? भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करण्याची मोहीम आयकर विभागाने कर्नाटकमध्ये हाती घेतल्याचे दिसताच विरोधकांचा पोटशूळ उठला. खरे म्हणजे ही कारवाई कोणत्याही राजकीय नेत्यांविरुद्ध नसल्याचे आयकर विभागाने स्पष्ट करूनही कर्नाटकमध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेसने आकांडतांडव केले. बंगळुरूमधील आयकर खात्याच्या कार्यालयासमोर काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी निदर्शने केली. मुख्यमंत्री कुमारस्वामी हे स्वत: या निदर्शनात सहभागी झाले होते. ज्यांनी कथित भ्रष्टाचार केला आहे, अशा कंत्राटदार आणि अभियंत्यांची चौकशी आयकर विभागाकडून हाती घेण्यात आली होती. अशी चौकशी झाली तर आपले बिंग फुटेल, अशी भीती वाटल्याने या राजकारण्यांनी त्या विरुद्ध आवाज उठविला नाही ना?

 

भाजपविरुद्ध टीका करण्यासाठी विरोधकांना एक निमित्त मिळाले, ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांना लोकसभेसाठी तिकीट नाकारण्यात आल्याचे! त्यावरून भाजपमध्ये वडीलधारी नेत्यांना मान दिला जात नाही, अशी कोल्हेकुई काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केली. त्या टीकेस भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी जोरदार उत्तर दिले. ‘दुसऱ्यांच्या घरामध्ये नाक खुपसण्यापेक्षा आधी आपल्या घरातील गोंधळ निस्तरा,’ असा सल्ला त्यांनी या महाभागांना दिला. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली ‘गरिबी हटाव’चा नारा देऊन मतदारांची दिशाभूल केली होती. तसाच एक प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा केला आहे. इंदिरा गांधी यांची ‘गरिबी हटाव’ घोषणा कागदावरच राहिली आणि गरीब हा गरीबच राहिला! आता काँग्रेस पक्षाने ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय) नावाच्या योजनेचे गाजर पुढे करून मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेद्वारे देशातील अत्यंत गरीब अशा २० टक्के जनतेला दरवर्षी ७२ हजार रुपये देण्यात येतील, असे काँग्रेसने म्हटले आहे. मान्यवर अर्थतज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली ही योजना तयार करण्यात आली असल्याचे काँग्रेसचे म्हणणे. पण, या योजनेविषयी शंका घेण्यास काही अर्थतज्ज्ञांनी आताच प्रारंभ केला आहे. दुसरे म्हणजे काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्याच्या पुढच्या अशा, जर-तरच्या या गोष्टी आहेत. राहुल गांधी यांनी अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपविरोधात देशव्यापी वातावरण तयार करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पण, त्या निर्णयास डाव्या पक्षांनी जोरदार विरोध करून तेथे राहुल गांधी यांचा पराभव करणारच, असा इशारा दिला आहे. अशा वातावरणात विरोधकांचे ऐक्य कसे काय होणार? ते भाजपचा पराभव कसा करणार? सत्तेवर येण्याची त्यांची स्वप्ने कशी काय साकारली जाणार?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@