'मनोहर' परवाच भेटला होता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2019   
Total Views |


 


पर्रिकरांचा साधेपणा आणि त्यांचे खरे-खोटे किस्से हा 'पर्रिकर' या एकूण व्यक्तिमत्त्वाचा जेमतेम १० टक्क्यांचा भाग म्हणता येईल. हिमनगाचं टोक. बरं, पर्रिकर हे काही फार प्रभावी, ओजस्वी वगैरे वक्तेही नव्हेत. अशी खिळवून वगैरे ठेवणारी शैली त्यांच्यापाशी नव्हती. पण, त्यांचा साधा फोटोतला चेहरा जरी बघितला तरी, जी एक वेगळीच आश्वासक ऊर्जा जाणवते, तीच त्यांना यशस्वी करण्यास कारणीभूत ठरली असावी.


दोन लोकसभा आणि ४० विधानसभा मतदारसंघांचा, महाराष्ट्रातील फारतर एखाद्या जिल्ह्याएवढा गोवा. आकार आणि लोकसंख्येच्या दृष्टीने हे राज्य 'एवढंस' असलं तरी, प्रत्यक्षात असंख्य प्रकारचे 'वाद' आणि त्यावर आधारित अस्मितांच्या बाबतीत ते पुष्कळ समृद्ध आहे. मराठी-कोकणी, उत्तर गोवा-दक्षिण गोवा, कोकणी-घाटी, हिंदू-ख्रिश्चन, कॅथलिक कोकणी-हिंदू कोकणी, सारस्वत-बिगरसारस्वत असे असंख्य वाद आणि अस्मिता इथे 'सुशेगाद' पद्धतीने नांदत आल्या आहेत. उदा. पेडणे किंवा डिचोली-वाळपईच्या माणसांचं मडगाव-वास्कोवाल्यांशी एकमत होणं महाकठीण. याचा परिणाम गोव्याच्या राजकारणावरही दिसला आहे. गोव्याचे आजवरचे मुख्यमंत्री आणि त्यांना मिळालेला कार्यकाळ बघा, लगेच लक्षात येईल. या सर्व वाद आणि जातीय, भाषिक अस्मितांच्या पलीकडे जाऊन, संपूर्ण गोव्याचा एक 'आश्वासक चेहरा' बनू शकलेले आणि त्या आधारावर गोव्याला एक स्थिर नेतृत्व देऊ शकलेले नेते म्हणजे मनोहर पर्रिकर. पर्रिकरांची जात कोणती-धर्म कोणता, त्यांचा गोव्यातला तालुका कोणता, ते मराठीवादी आहेत की कोकणीवादी इ. सगळ्या भिंती केवळ ओलांडूनच नाही, तर अक्षरशः उद्ध्वस्त करून पर्रिकर पुढे निघून गेले होते. “गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर गोव्याला मिळालेला इतका ताकदीचा नेता म्हणजे मनोहर पर्रिकर,” असं गोव्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराने एकदा गप्पांमध्ये सांगितलं होतं. आधी गोव्याच्या माध्यमप्रश्नावर अभ्यास करत असताना आणि दोन वर्षांपूर्वी गोवा विधानसभेची निवडणूक कव्हर करत असताना गोव्याच्या राजकारण-समाजकारणाचा थोडाफार अभ्यास झाला. यावेळी गोव्याचा एकूणच राजकीय रागरंग बघितला आणि त्यावेळी हे मत अगदीच पटलं. पर्रिकरांचा साधेपणा आणि त्याचे खरे-खोटे किस्से हा पर्रिकर या एकूण व्यक्तिमत्त्वाचा जेमतेम १० टक्क्यांचा भाग म्हणता येईल. हिमनगाचं टोक. बरं, पर्रिकर हे काही फार प्रभावी, ओजस्वी वगैरे वक्तेही नव्हेत. अशी खिळवून वगैरे ठेवणारी शैली त्यांच्यापाशी नव्हती. पण, त्यांचा साधा फोटोतला चेहरा जरी बघितला तरी, जी एक वेगळीच आश्वासक ऊर्जा जाणवते, तीच त्यांना यशस्वी करण्यास कारणीभूत ठरली असावी. गोव्यासारख्या छोट्या राज्यातून येऊन राष्ट्रीयस्तरावर एवढं प्रचंड अपिल मिळवणं काय सोप्पं काम आहे का? दिल्लीतले हिंदी-इंग्रजी मीडियावाले पर्रिकरांचे नाव ज्या प्रकारे उच्चारतात, त्यावरून हा माणूस किती वेगळ्या प्रदेशातून तिथे आला होता, हे लक्षात येतं. पर्रिकरांच्या म्हापशातल्या मूळ गावाचं नाव, तर त्यांच्या तोंडी न दिलेलंच बरं.

 

भारताच्या राजकारणाबाबत विश्लेषण करणाऱ्यांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. 'तुम्हाला देशपातळीवर यशस्वी व्हायचं असेल, तर तुमच्यामागे किमान तुमचं राज्य भक्कमपणे उभं असायला हवं' किंवा दुसरीकडे, 'तुम्हाला देशपातळीवर यशस्वी व्हायचं असेल, तर तुमच्या राज्याच्या शिक्क्यापलीकडे जाऊन तुमची ओळख बनायला हवी.' हे दोन सिद्धांत बहुधा विश्लेषकांचे आवडते सिद्धांत असावेत. 'पर्रिकर म्हणजे गोवा' हे समीकरण तर पक्कं झालं होतंच. शिवाय, गोवा भक्कमपणे पाठीशी उभं असलं तरी, त्या दोन लोकसभा आणि ४० विधानसभा मतदारसंघांचा राष्ट्रीय पातळीवर 'वजन' दाखवायला तसा काहीच उपयोग नाही. तरीही जेमतेम दोन-अडीच वर्षांत पर्रिकर राष्ट्रीय पातळीवर इतके लोकप्रिय कसे काय झाले असावेत? हाही एक अभ्यासण्यासारखा विषय ठरतो. हा माणूस जरी कोणी मोठा नेता असला तरी, आपण याला भेटू शकतो, आपलं म्हणणं मांडू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं म्हणणं तो समजून घेऊ शकतो, असा एक विश्वास लोकांना वाटत होता. पर्रिकरांच्या या 'अॅक्सेसेबल' असण्याला त्यांच्या साधेपणाची जोड मिळाली. विद्वत्ता तर त्यांच्यापाशी होतीच. कामाचा वकूब आणि क्षमता तर त्यांनी गोव्यात दाखवून दिलीच होती, पुढे केंद्रातही दाखवून दिली. पर्रिकरांची राष्ट्रीय राजकारणाची कारकिर्द जेमतेम अडीच-तीन वर्षांची ठरली. ती जर पुढे आणखी बहरती तर? पर्रिकरांनाच दिल्ली नको होती, त्यांनाच गोव्यात परत जायचं होतं वगैरे बरंच काय काय बोललं गेलं आहे. खरंखोटं त्यांनाच ठाऊक. परंतु, त्यांनी दिल्ली सोडायला नको होती, असं सारखं वाटतं.

 

पर्रिकरांच्या जाण्यामुळे नुकसान केवळ भाजपचं झालेलं नाही. गोव्याचंही मोठं नुकसान झालं आहे आणि ते कदाचित येत्या काही दिवसांत दिसायलाही लागेल. सगळ्या राजकीय मतप्रवाहांना आपल्या कवेत घेऊन, त्यांच्यासोबतीने पुढे वाटचाल करण्याची क्षमता असणारा नेता गोव्याने आणि देशाने गमावला आहे. अफाट लोकप्रियता काय असते, हे मी गोव्यात दोन-तीनदा पर्रिकरांना भेटलो, त्यांच्या काही सभा, बैठका कव्हर केल्या तेव्हा अनुभवलं आहे. विशेषतः युवा वर्गात पर्रिकरांची 'क्रेझ' थक्क करणारी होती. वयाच्या साठीतला हा नेता युवकांना एखाद्या तिशी-चाळीशीच्या नेत्यापेक्षाही आपलासा वाटायचा, 'आपल्यातला' वाटायचा. आज महाराष्ट्रात नेत्यांच्या तिसऱ्या-चौथ्या पिढ्या लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांची वयं अशीच तिशीच्या आसपास आहेत. परंतु, युवकांना आपलसं करून घेण्याची क्षमता ना या 'उमेदवारां'च्या देहबोलीतून जाणवते ना भाषणांतून. याउलट पर्रिकरांसारख्या गोव्याच्या नेत्याचा फोटो महाराष्ट्रासह देशभरातील हजारो युवकांना त्यांचा फेसबुक/व्हॉट्सअॅपचा डीपी वगैरे ठेवावासा वाटतो, त्यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांतून व्यक्त व्हावसं वाटतं. बरं, पर्रिकर हे काही 'स्टाईल आयकॉन' वगैरेदेखील नव्हते. तेच ते दोन-चार ठरलेल्या रंगांचे हाफ शर्ट आणि खाली काळी पॅन्ट, पायात चपला. तरीही, अगदी त्यांचा तो चश्मासुद्धा लोकांना प्रचंड आवडला, म्हणजे बघा. गोव्यात, मुंबई-पुण्यात पक्षाच्या किंवा अन्य कोणत्याही महाविद्यालयीन मेळाव्यांत पर्रिकरांच्या मागून 'सेल्फी'साठी धावणाऱ्या शेकडो मुलामुलींना मी पाहिलं आहे. गेल्या दोन दिवसांत फेसबुक-ट्विटरवर पर्रिकरांबद्दल पडलेल्या पोस्ट्सचा रतीब पाहिला, तर असं वाटतं की, हा माणूस जगातल्या प्रत्येक माणसाला कुठे ना कुठे भेटला होता की काय... देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या हजारो व्यक्तींनी पर्रिकरांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

 
गोव्यात फिरायला गेलो असता रस्त्यावरून पर्रिकर कसे एकटेच चालत जाताना दिसले,मुख्यमंत्री असतानाही मुंबईत ते कसे एकटेच आले आणि अमक्या हॉटेलमध्ये चहा-कॉफी घेताना दिसले आणि असं बरंच काय काय... देशाचा एकदा संरक्षणमंत्री आणि एका राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री राहिलेला माणूस देशभरात इतक्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना कुठेना कुठे तरी भेटलेला, दिसलेला कसा काय असू शकतो? त्यातही, पर्रिकरांचा थेट 'मनोहर' म्हणून उल्लेख करणारे आणि जणू काही आम्ही एकाच शाळेत, एका वर्गात शिकलो, अशा आविर्भावात वावरणारे तर गोव्यात प्रत्येक गावात चार-पाच जण मिळतीलच. माध्यमप्रश्नी आणि नंतर निवडणुकांच्या निमित्ताने मी पेडण्यापासून काणकोणपर्यंत ठिकठिकाणी फिरलो, शेकडो लोकांशी बोललो. या प्रवासात 'मनोहर परवाच भेटला होता' असं सहजपणे सांगणारा एखादा शाळकरी मुलगाच फक्त बघायचा राहिला होता! या साऱ्या अतर्क्य गोष्टींमुळे मनोहर पर्रिकर हे एक कोडं ठरतं. आतल्या आत धुमसत असल्याचा भास होणारं, अबोल, तुटकं कोडं. कितीतरी वेगवेगळ्या पारंपरिक समजुती-संकेतांना पर्रिकरांनी छेद दिला आहे. तेही पक्षीय राजकारणाच्या चौकटीत राहून. जातीय राजकारणाला छेद देणारे, भारतीय राजकारणात रूजलेल्या 'राजकीय नेत्या'च्या ठराविक 'इमेज'लाही छेद देणारे, स्वपक्षाच्या रोपट्याचा वटवृक्ष करणारे, कौटुंबिक आघातांनंतरही पुन्हा खंबीरपणे उभे राहणारे, कोणाचीही भीडभाड न बाळगता जे मनात आहे तेच प्रत्यक्षात बोलणारे आणि त्यापासून मागे न हटणारे, तरीही पक्षीय चौकटींच्या पलीकडे सर्वांच्या आदरास पात्र ठरणारे मनोहर पर्रिकर गेले. एक प्रवास अर्धवट राहून गेला. २०१९ या वर्षाच्या सुरुवातीलाच जॉर्ज फर्नांडिस आणि आता मनोहर पर्रिकर असे दोन जबरदस्त संरक्षणमंत्री काळाच्या पडद्याआड गेले. तत्त्वनिष्ठा म्हणजे काय प्रकरण असतं हे आपल्या अवघ्या २५-३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतून दाखवून देणारे मनोहर पर्रिकर हे म्हणूनच एक व्यक्ती नाही तर एक तत्त्व ठरले. निष्ठा कशा पेलायच्या असतात, याची शिकवण देणारं तत्त्व.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@