सह्याद्रीत वाघांच्या अधिवासाचा हा घ्या पुरावा ; आंबोलीत पाऊलखुणा !

    03-Dec-2019   
Total Views | 691

tiger_1  H x W:


सुरक्षित वन्यजीव कॉरिडॉरच्या अभावाने 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'पर्यंत पोहोचण्यास अडथळा


मुंबई (अक्षय मांडवकर) - गेल्या काही महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली आणि आसपासच्या परिसरात वाघाच्या वावराच्या खुणा आढळत आहेत. तज्ज्ञांच्या मते, तिलारी ते राधानगरी दरम्यानचा हा संपूर्ण परिसर वाघांचा भ्रमणमार्ग आहे. मात्र, राधानगरी ते चांदोली दरम्यान सुरक्षित वन्यजीव कॉरिडॉरचा अभाव असल्याने हे वाघ 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’पर्यंत पोहोचू शकत नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.

 

tiger_1  H x W: 
 
 

सह्याद्रीच्या उंच पर्वतरागांमध्ये अधिवास करणार्या वाघांच्या अस्तित्वाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. महाराष्ट्रातील पश्चिम घाटांमध्ये अधिवास करणार्‍या वाघांबाबत वनविभाग जाहीरपणे बोलत नसले, तरी या परिसरात वाघांच्या वावराचे पुरावे समोर येत असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये आंबोली आणि आसपासच्या परिसरामध्ये वाघाच्या पावलांचे ठसे आणि त्याची विष्ठा येथील वन्यजीव निरीक्षकांना आढळून आली आहे. गेल्या आठवड्यात आंबोलीतील एका परिसरात वाघाच्या पावलाचे ठसे आढळल्याची माहिती आंबोलीतील वन्यजीव निरीक्षक काका भिसे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. तसेच महिन्याभरापूर्वी आंबोलीतील रस्त्यानजीकदेखील ठसे आढळळ्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकाराबाबत वनविभागाला वेळीच माहिती दिली. मात्र, त्यांनी यामध्ये लक्ष घालण्यास टाळाटाळ केल्याचे भिसे म्हणाले. या परिसरात वाघाने गुरांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

ऑक्टोबर महिन्यातही ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीदरम्यान त्यांना आंबोलीत वाघाच्या पायांचे ठसे दिसल्याचे वन्यजीव निरीक्षक हेमंत ओगले यांनी सांगितले. सह्याद्रीमधील वाघांच्या अधिवासाबाबत या परिसरात वाघांवर संशोधन करणारे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांना विचारले असता त्यांनी, तिलारी ते राधानगरी दरम्यानच्या संपूर्ण परिसरात वाघांचा वावर असण्यावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील तिलारीच्या परिसरात वाघांचा अधिवास असून यामधील नर वाघाच्या भ्रमंतीचा परिसर सुमारे 200 चौ.किमी असल्याचे आमच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी नमूद केले. महत्त्वाचे म्हणजे हे वाघ स्थलांतरित नसून येथील स्थानिक असल्याचे पंजाबी यांनी सांगितले.

 
 
'सह्याद्री निसर्ग मित्र' आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने राबविलेल्या 'ई-मॅमल' प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी तिलारीजवळील मांगेली गावातील कॅमेरा ट्रॅप मध्ये कैद झालेले वाघ 
tiger_1  H x W: 
 
 

तिलारीमध्ये वाघांचे अस्तित्व असल्याने तिथल्या संपूर्ण परिसराला अभयारण्य घोषित करणे आवश्यक आहे. मात्र, यामध्ये राखीव वनक्षेत्राबरोबरच बिगर राखीव वनक्षेत्राचाही समावेश करावा लागेल. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधणे, जागेचे आरेखन करणे अशी कामे करावी लागणार आहेत. - सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम (वन्यजीव)

 
 

सुरक्षित वन्यजीव काॅरिडाॅरचा अभाव

तिलारी ते राधानगरी दरम्यानच्या परिसरात वाघांचा वावर आहे. राधानगरीपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील चांदोली अभयारण्यापर्यंतचे अंतर थेट पाहिल्यास ६० ते ७० किलोमीटरचे आहे. वाघांसाठी हे अंतर पूर्ण करणे सहजसोप असले, तरी या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी वसाहत आहे. त्यामुळे सुरक्षित वन्यजीव काॅरिडाॅर नसल्याने वाघांना तिथवर पोहचण्यास अडचणी येत असल्याचे, पंजाबी यांनी सांगितले. तसेच एखादा नर वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोहोचल्यावरही तो अपुऱ्या खाद्यामुळे त्याठिकाणी अधिवास करत नाही.

 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121