मुंबई : "संविधानात 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द समाविष्ट करण्यास संविधान निर्मात्यांनी पाठिंबा दिला नाही. आणीबाणीच्या काळात संसदेत कोणत्याही चर्चेशिवाय तो संविधानात जोडला गेला", असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी नागपूर येथे केले.
माध्यमांना संबोधताना मिलिंद परांडे पुढे म्हणाले, अनेक विद्वान, महान कायदेतज्ज्ञ, तत्वज्ञानी आणि इतरांनी मिळून आपले संविधान तयार केले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान तयार करण्यात खूप मोठा वाटा होता. संविधान सभेदरम्यान धर्मनिरपेक्ष शब्द लिहायचा की नाही यावर चर्चा झाली होती. त्यावेळी कोणीही त्याचे समर्थन केले नाही, ना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे समर्थन केले आणि ना नंतर भारताचे राष्ट्रपती बनलेले डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्याचे समर्थन केले. त्यावेळी कारण असे देण्यात आले की त्यांना संविधान कोणत्याही तत्वाशी बांधायचे नव्हते आणि संविधान स्वतंत्र असले पाहिजे.
पुढे ते म्हणाले, ’समाजवादी’ 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द स्वातंत्र्यानंतर नव्हे तर आणीबाणीच्या काळात जोडण्यात आले होते, त्यामुळे समाजात त्याची व्यापक चर्चा होण्याची गरज आहे. बरेच लोक या मुद्द्यावर बोलत आहेत आणि जर चर्चा सुरू झाली तर ती योग्य दिशेने जाईल असे मला वाटते.
हिंदूंना आपापसात लढवण्याचे षड्यंत्र
मिलिंद परांडे यांनी यावेळी मोठा खुलासा केला की, हिंदूंना आपापसात लढवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. काही शक्ती हिंदू समाजात फूट पाडण्याचा आणि त्यांना आपापसात लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू सण आणि उत्सवांबद्दल चुकीची माहिती पसरवून त्यांना त्यांच्यापासून दूर केले जात आहे. विश्व हिंदू परिषद अशा शक्तींविरुद्ध काम करत आहे. आज देशातील काही राज्यांमध्ये आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यांचे नागरिकत्व नाकारले जात आहे. अशा सर्व हिंदूंना देशाचे नागरिकत्व मिळवून देण्यासाठी विश्व हिंदू परिषद काम करत आहे.