लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव भाग-३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |


'गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली?' या वादात टिळकांच्या विरुद्ध पक्षात 'भाऊसाहेब रंगारी' हे नाव आपण ऐकतो. 'टिळक विरुद्ध भाऊ रंगारी' असा सामना टिळक आणि भाऊ रंगारी यांच्या समर्थकांकडून लढवला जातो. मात्र, गणेशोत्सवाच्या पलीकडे जाऊन विचार केला, तर भाऊसाहेब रंगारी या नावाला एक निराळे अस्तित्व आहे हे जाणवते. भाऊ रंगारी यांचे अस्तित्व केवळ गणेशोत्सवापुरते भांडण्यात नाही. दुर्दैवाने या वादापालीकडे जाऊन त्यांचा शोध कुणी करत नाही. 'लोकमान्य टिळक या नावाला जसे गणेशोत्सवापलीकडेसुद्धा एक निराळे अस्तित्व आहे, ओळख आहे तशीच भाऊ रंगारी यांनाही आहे. त्यांची ही वेगळी ओळख आतातरी लोकांसमोर आणायला हवी...


'भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक?' या वादाची चर्चा करताना भाऊ रंगारींच्या जीवनाबद्दलही पुरेशी माहिती आपल्याला असलीच पाहिजे. सार्वजनिक गणेशोत्सवात टिळकांच्या बरोबरीने वादासाठी का होईना, ज्यांचे नाव घेतले जाते त्या भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दल काही निराळी माहिती जाणून घेऊया.

 

कोण आहेत भाऊसाहेब रंगारी?

 

भाऊसाहेब लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी! पुण्याचे प्रसिद्ध राजवैद्य ! पुण्यात शनिवार वाडा जिथे आहे, त्याच्या मागे, म्हणजेच शालूकरांच्या बोळात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा वाडा होता. त्या काळी या परिसरात शालू विणण्याचे आणि शालू रंगवण्याचे काम चालत असे म्हणून त्याला 'शालूकरांचा बोळ' असे नाव पडले असावे. याच भागात भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसायसुद्धा होता. एकीकडे लोकांना औषधे देत देत भाऊसाहेब शालू रंगवण्याचे कामही करत. त्यामुळे ओघानेच भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांचे 'भाऊसाहेब रंगारी' असे नामकरण झाले. असं म्हणतात, भाऊसाहेब अध्यात्मवादी होते, तरीही नव्या विचारांचे होते. ब्रिटिशांच्या अन्यायकारी राजवटीतून देशाला मुक्त करायचे असेल, तर सशस्त्र क्रांतीचा मार्ग भाऊहेबांना जवळचा वाटत होता. जाती- धर्मात विभागलेला समाज एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढला तर आपला देश लवकरच स्वातंत्र्य मिळवेल असे त्यांना मनापासून वाटत होते. भाऊसाहेब विचारी होते, देशाच्या वर्तमान परिस्थितीची चिंता त्यांना होती. या चिंतेतून देशाला स्वातंत्र्य करण्याचे त्यांचे चिंतन सुरू होते. आपल्या मनातील राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग भाऊसाहेब रंगारी यांनी निवडला.

 

भाऊसाहेबांच्या क्रांतिकारक उलाढाली

 

भाऊसाहेब रंगारी यांच्या गुप्त क्रांतिकारक चळवळीची साक्ष मिळते ती त्यांच्या पुण्यातील घरावरून! ब्रिटिश शासनाविरुद्ध उठाव करण्यासाठी भरपूर शस्त्रास्त्रे हवीत, या हेतूने भाऊसाहेबांनी स्वतःच्याघरात प्रचंड शस्त्रसाठा जमवला होता, असे दिसते. हा साठा अगदी अलीकडे म्हणजे २०१५ साली त्यांच्या राहत्या घराच्या वास्तूत सापडला. यात मोठ्या प्रमाणावर सिंगल बॅरल, डबल बॅरल, ठासणीच्या बंदुका, तसेच ठासणीची दारू, गोळ्या, छर्हे आणि दारुगोळा बनवण्याची सामग्री याचा समावेश होता. त्यांच्या घरात शस्त्रे लपवण्यासाठी अनेक छुप्या जागा बनवल्या होत्या असेही दिसते. खोलीचा दरवाजा आतून लावला असेल तरी तो बाहेरून उघडता येईल अशी एक निराळी व्यवस्था होती. या भाऊसाहेब रंगारी भावनाच्या माध्यमातून नंतरच्या काळात, विशेषतः पत्री सरकारच्या काळात अनेक क्रांतिकारकांना गुप्तपणे छुपी मदत पुरवल्याचीही अनेक उदाहरणे सापडतात. भाऊसाहेब सक्रिय क्रांतिकारक होते याचे उल्लेख काही दस्तावेजांमध्ये आढळतात, त्याकडेही एकदा बघूया :

 

"Bhau Rangari and Ganesh Narayan Ghotwadekar were two other members of Tatyasaheb's coterie. Bhau Rangari whose real name was 'Bhau Lakshman Javle' was a Maratha whom the police considered an extremely dangerous and troublesome man, he was deprived of his licence to hold arms in १८९५ on account of his bad reputation. He and Ghotwadekar were committed to the poona court sessions in १८९४, after the daeuwalla bridge communal riot, when they were charged with being the ringleaders of the crowd attempting to the aid rioters and obstruct the police. The charges were not sustained.'' (The myth of Lokamanya pg. no 70)

 

त्यांच्या क्रांतिकारक जीवनाबद्दल ही महत्त्वाची नोंद आहे. दुर्दैवाने भाऊसाहेब रंगारी यांचे हे क्रांतिकार्य समाजाला ठाऊक नाही. ज्या पुण्यातल्या घरातून हे क्रांतिकारी प्रयोग पुण्यात आजही भाऊसाहेबांचे हे घर तसेच आहे. जिज्ञासूंनी त्या वस्तूला अवश्य भेट द्यावी.

 

एक ऐतिहासिक सभा

 

नानासाहेब खाजगीवाले ग्वाल्हेरहून परतले आणि त्यांनी तिकडे दरबारी थाटात साजरा होणारा गणेशोत्सव पाहिला, भाऊसाहेब रंगारी यांना त्याबद्दल सांगितले आणि भाऊसाहेबांनी ही कल्पना उचलून धरली याचा सविस्तर वृत्तांत मागे दिला आहेच. या बैठकीला कोण कोण उपस्थित होते, यावर एकदा नजर टाकूया. त्याची यादीच इथे वाचकांसाठी देत आहोत.

 

. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन

. बाळासाहेब नातू

. गणपतराव घोटवडेकर

. लखुशेठ दंताळे

. बळवंत नारायण सातव

. खंडोबा तरवडे

. मामा हसबनीस

. दगडूशेठ हलवाई

. नानासाहेब पटवर्धन

 

एक फार महत्त्वाची बाब इथे नमूद करावीशी वाटते ती अशी की, भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळक, यापैकी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक किंवा प्रवर्तक कोण आहेत, असे वाद जेव्हा घातले जातात, तेव्हा याचा मुख्य हेतू बहुतांश वेळा जातीय असतो. एका विवक्षित जातीय पैलूतून यावर आजकाल काही लोक भाष्य करत असतात. भाऊ रंगारी बहुजनांचे प्रतिनिधी आणि टिळक सवर्णांचे, असा अविवेकी विचार यामागे असतो. मात्र, या वरच्या यादीवर एकदा जरी नजर टाकली तर लक्षात येईल की, अगदी उच्च वर्णीयांपासून हे बहुजन समाजापर्यंत घटकातील प्रतिनिधी या यादीत दिसतो. इतकेच नव्हे, तर गणेशोत्सवात सवर्ण आणि बहुजन यांचे एक निराळे एकत्रीकरण आपल्याला दिसून येते त्याचे काही संदर्भ पुढील काळात देणार आहोतच. बैठक झाली आणि त्यात घेतल्या गेलेल्या निर्णयानुसार पुण्यात तीन गणपती बसवले गेले. यात भाऊसाहेबांच्या वाड्यातही गणपती बसवला गेला. त्यांच्या गणपतीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण होती. त्या मूर्तीचा वेगळेपणा जाणून घेऊया...

 

भाऊसाहेब रंगारी वाड्यातील इकोफ्रेंडली गणेशमूर्ती

 

'इकोफ्रेंडली' वगैरे शब्द आताशा आपण ऐकतो. पण, त्या काळात गणपती हा 'इकोफ्रेंडली'च असे. अलीकडच्या काळात आम्ही त्याचे स्वरूप दूषित करीत आहोत. या सगळ्या इतिहासाकडून प्रेरणा घेऊन आपण पुन्हा सुरुवातीच्या त्या गणेशोत्सवाचे आदर्श आचरून दाखवायला हवेत. असो ! तर....भाऊसाहेब रंगारी यांनी बसवलेली गणेशमूर्ती ही इतर मूर्तींहून फार निराळी आहे. ही गणेशमूर्ती कागदाचा लगदा आणि मातीपासून बनवली आहे हे विशेष! या मूर्तीची रचना आकर्षक आहे. ती वीररसाने युक्त, भक्तांना शक्तीचा संदेश देणारी आहे. श्रीगणेश हे आपल्या उजव्या हातातील दाताने राक्षसावर प्रहार करताना आपल्याला दिसतात. एका हातात त्रिशूळ, बाण असलेली ही शस्त्रधारी मूर्ती स्वतःचेएक निराळे अस्तित्व टिकवून नवा संदेश देण्याचा प्रयत्न करते हे मात्र नक्की! हा गणपती राक्षसासोबत युद्ध करताना दाखवला आहे. दुष्टांचा नाश करण्यासाठी वेळोवेळी भगवंतालासुद्धा शस्त्रे हाती धरावीच लागली. ब्रिटिशांना नमवायचे असेल तर शस्त्रे हाती धरावीच लागतील, असे भाऊसाहेबांना यातून सुचवायचे असेल का ?

 

हिंदू-मुसलमान दंगलींचा संदर्भ

 

१९९४ साली भारतभर घडून आलेल्या हिंदू-मुसलमान दंगलींमुळे हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र आला आणि या एकत्रीकरणातून गणेशोत्सवाला बळ मिळाले हे याआधी नमूद केले आहेच. लोकमान्य टिळकांनी या दंगलींच्या अनुषंगाने हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी वारंवार लेखन केलेलं आहे याचे जसे संदर्भ सापडतात तसेच भाऊ रंगारी हेही सार्वजनिक या दंगलींमध्ये सहभागी होते याचेही संदर्भ सापडतात. दंगली मिटवण्यासाठी त्यांनी खरेतर पुढाकार घेतला. मात्र, याउलट दंगली भडकावण्याच्या आरोपावरून त्यांना ब्रिटिशांनी अटक केली. त्यांचे बंदुकीचे परवाने रद्द केले. परंतु, अखेरीस कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तात्ता करण्यात आली.

 

लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी

 

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे म्हणताना टिळक चरित्राचा काही भाग लोकांना माहीत असतो, भाऊ रंगारी यांच्याबद्दल मात्र लोकांना काहीच माहीत नसते. त्यांची थोडक्यात ओळख करून देण्याचा केलेला हा प्रयत्न !

 

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@