'नुक्कड शाळां'चा 'कृतिका'बंध...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019   
Total Views |



तामिळनाडूतील ग्रामीण भागातील मुलांना शाळेनंतर केवळ दोन तास हसतखेळत शिक्षणाचे धडे आणि जगण्याचे बाळकडू देणाऱ्या 'नुक्कड शाळा' केंद्रांची आकृतीकार असलेल्या २२ वर्षीय कृतिका राव हिच्या कार्याचा अल्पपरिचय...


 

विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले ।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ॥

 

थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या अखंडातून शिक्षणाची महती आणि अविद्येने होणारी अधोगती नेमक्या शब्दांत विशद केली. पण, आपल्या समाजाचे दुर्दैव की, आजही लाखो मुले या शिक्षणप्रवाहापासून वंचित आहेत, तर विद्यार्जनाची वाट अर्धवट सोडणाऱ्या किशोरवयीनांची संख्याही चिंताजनक म्हणावी लागेल. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध कारणास्तव शिक्षण अर्ध्यावर सोडणे हे वैयक्तिकच नाही, तर राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यात आडकाठीच ठरते. भारतातील ग्रामीण भागात पाचवी ते सातवी दरम्यान शाळा सोडणाऱ्या मुलामुलींचे प्रमाण हे तब्बल ५० टक्के आहे. यावरून शिक्षणाप्रतिची समाजातील अनास्थाच प्रतिबिंबित होते. तेव्हा, मुलांनी शिक्षण असे अर्ध्यावरच न सोडता, अगदी हसतखेळत, मनोभावे संपूर्ण जिद्दीनिशी प्रेरणेने पूर्ण करावे म्हणून कृतिका राव आणि तिच्या वडिलांनी 'नुक्कड शाळा' तामिळनाडूच्या ग्रामीण भागात सुरु केल्या. आज या शाळांची एकूण ३८ केंद्रे तामिळनाडूच्या विविध जिल्ह्यांत कार्यरत आहेत.

 

२२ वर्षीय कृतिका आपल्या वडिलांबरोबर फेरफटका मारत असताना, एका झोपडीतून त्यांना काही मुलं बाहेर पडताना दिसली. अधिक माहिती घेतल्यावर कृतिकाला त्या झोपडीत भरलेल्या शाळेविषयी समजले. एरवी 'शाळा' म्हटल्यावर मोठाली इमारत, भरपूर रंगरंगोटी, पुस्तकांची रेलचेल, पांढराशुभ्र गणवेश असे चकचकीत चित्र डोळ्यासमोर उभे राहते. परंतु, ग्रामीण भागात शाळांवर नुसते छत असले तरी निभावते. मग काय, त्या क्षणापासून कृतिका आणि 'मायक्रो फायनान्स' कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या तिच्या वडिलांनी शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याचे ठरवले. आज गावागावांमध्ये प्राथमिक शाळा पोहोचल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे अर्ध्यावर शाळा सोडून जाण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. भारतात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ २५ विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडतात. तेव्हा, विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करण्याबरोबरच, त्यांना जीवनातील शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 'नुक्कड शाळां'ची कृतिकाने आखणी केली. दैनंदिन शाळेनंतर केवळ दोन तास या मुलांना अभ्यासाचे धडे दिले जातात. पण, केवळ पुस्तकी अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता या मुलांमध्ये हसतखेळत, प्रात्यक्षिकांवर भर देऊन गणित, विज्ञानासारख्या विषयांची गोडी निर्माण केली जाते. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून एक छोटेखानी ग्रंथालयही या 'नुक्कड शाळां'मध्ये असून मुलांना दर आठवड्याच्या शुक्रवारी त्यांनी वाचलेल्या पुस्तकाची वर्गासमोर माहितीही द्यावी लागते. यामुळे वाचनाची सवय तर लागतेच, पण चारचौघांसमोर आपले मत मांडण्याची कलाही मुलांमध्ये विकसित होते. सामाजिक-आर्थिकदृष्ट्या गरीब घरातील या मुलांना मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून जीवनोपयोगी मूल्यांची शिदोरीही याच 'नुक्कड शाळा' प्रदान करण्याचे मौल्यवान काम करतात. आजघडीला 'नुक्कड शाळां'च्या ३८ केंद्रांमुळे तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. याविषयी कृतिका म्हणते की, "आमच्या या शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांनीही अतिशय सकारात्मक पद्धतीने स्वीकार केला. मुलांची एखादा विषय नीट समजून घेण्याची क्षमता, त्यांची एकाग्रता आणि नवनवीन विषयांना आत्मसात करण्याची उत्सुकता कमालीची वाढली असून त्यांच्यातील हा बदल सर्वस्वी कौतुकास्पद आहे."

 

अशा या गावात जिथे जागा मिळेल तिथे सुरू केलेल्या 'नुक्कड शाळां'मध्ये मुलांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच इंग्रजी भाषा, संभाषण कौशल्य, संगणक हाताळणीचेही रीतसर प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, कृतिकाच्या या 'नुक्कड शाळां'मध्ये शिकवण्यासाठी तुम्ही तामिळनाडूत असलेच पाहिजे, अशी अट नाही. 'नुक्कड शाळे'च्या 'मेन्टॉरशिप प्रोगाम' अंतर्गत तीन महिन्यांसाठी आठवड्यातून फक्त दोन तास तुम्ही या मुलांना घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करू शकता. अट एकच की, तुमचे इंग्रजी आणि तामिळ या दोन्ही भाषांवर प्रभुत्व हवे. इतकेच नाही, तर यासाठी तुम्ही शिक्षणक्षेत्राशी संबंधित नसाल, तरी अजिबात हरकत नाही. लिहिण्या-वाचण्याची, शिकवण्याची आवडही पुरेशी आहे. तंत्रज्ञानाला शिक्षणाशी जोडण्याच्या कृतिकाच्या या व्यापक संकल्पेनमुळे तामिळनाडूत 'नुक्कड शाळां'ना समाजातूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. भविष्यात 'नुक्कड शाळां'मध्ये गणित-विज्ञानासारखे तुलनेने अवघड विषय सोपे करून शिकवण्यासाठी कमी खर्चिक 'कीट' उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पैसा म्हणजे काय, त्याचा योग्य वापर कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जाणीव-जागृतीवरही या शाळांचा भर असेल. अशा या 'नुक्कड शाळां'चा आकृतिबंध कृतिकाला देशातील प्रत्येक गावागावांमध्ये पोहोचवायचा आहे. त्या दिशेने तिची आणि तिच्या संपूर्ण टीमची वाटचालही सुरू आहेच. तेव्हा, कृतिकाचे स्वप्न पूर्णत्वास येवो आणि अशा 'नुक्कड शाळा' देशभरात शिक्षणाचा नवप्रवाह घेऊन विद्यार्थ्यांच्या मती, नीती, गतीला बळ देवो, हीच सदिच्छा!

@@AUTHORINFO_V1@@