असा शिष्य होणे नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |


 


समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी ही गुरुशिष्याची अलौकिक जोडी त्या काळात महाराष्ट्राने पाहिली. आदर्श गुरुशिष्याची जी लक्षणे समर्थांनी दासबोधात सांगितली आहेत, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचा शिष्योत्तम कल्याणस्वामी.

 

दासबोधात दशक ५, समास १ ते ३ या समासांमध्ये सद्गुरु व सत्शिष्याची लक्षणे समर्थांनी मोठ्या मार्मिकतेने सांगितली आहेत. परमार्थ क्षेत्रातील आत्मज्ञान, आत्मप्रचिती, ब्रह्मज्ञान हे अतिसूक्ष्म करता येत नाही. या जगात सर्वत्र पसरलेली अविद्या, माया, मोह पार करून ज्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, अशा महापुरुषाचे मार्गदर्शन परमार्थज्ञानासाठी आवश्यक असते.

 

अतींद्रिय व अतिसूक्ष्म ज्ञानाच्या कल्पनेमुळे अध्यात्मक्षेत्रात बर्याच ठिकाणी बनवाबनवी, फसवाफसवी पाहायला मिळते. यासाठी समर्थांनी दासबोधात 'गुरू कसा नसावा' हे प्रथम सांगून भोळ्या भाविकांना दांभिक गुरूंपासून सावध केले आहे. सद्गुरुचे वैशिष्ट्य सांगताना समर्थांनी लिहिले आहे की, सद्गुरुच्या ठिकाणी कसलेही भय नसते. सद्गुरु निर्भय असल्यामुळे ते सदैव प्रसन्न असतात. या विश्वातील अमूक एका गोष्टीची आपल्याला कमतरता आहे आणि आपल्याला ती हवी आहे, असे सद्गुरुला कधीही वाटत नाही. आयुष्यात कसलेही सुखदु:खाचे प्रसंग आले तरी त्याचे चित्त स्थिर राहते आणि परमेश्वरावरील त्याचा विश्वास कमी होत नाही. सद्गुरुच्या ठिकाणी अखंड समाधान असून तो स्वरूपस्थितीपासून ढळत नाही.

 

मुख्य सद्गुरुचे लक्षण।

आधी पाहिजे विमळ ज्ञान।

निश्चयाचे समाधान। स्वरुपस्थिती ॥ (दा. ५.२.४५)

 

तसेच दासबोधात सत्शिष्याची ओळखही सांगितली आहे. निर्मळ आचारशील, विरक्त, निष्ठावंत, धैर्यवान, सात्त्विक, निर्मत्सरी, विवेकी अंतरी परमशुद्ध इत्यादी गुणांनी युक्त असा शिष्य तर हवाच. परंतु, शिष्याचे मुख्य लक्षण समर्थांनी पुढील प्रमाणे सांगितले आहे.

 

मुख्य सच्छिष्याच लक्षण ।

सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण ।

अनन्यभावे शरण । त्या नाव सच्छिष्य (दा.५.३.१९)

 

रामदासस्वामी हे खर्‍या अर्थाने 'सद्गुरु' पदवीस प्राप्त होतात, हे नि:संशय. समर्थांचे शिष्य उदंड असले, तरी कल्याणस्वामी हेच खर्‍या अर्थाने समर्थांचे पट्टशिष्य होते. इ. स. १६४४ साली कल्याण लहान असतानाच ते समर्थांच्या सहवासात आले आणि त्यांचे शिष्य झाले. 'सद्गुरुवचनी पूर्ण विश्वास' आणि 'तयासी अनन्यभावे शरण' ही सत्शिष्याची लक्षणे त्यांनी शेवटपर्यंत सांभाळली. त्यांचे मूळ नाव 'अंबाजी.' या लहान अंबाजीचा 'कल्याण' कसा झाला ही हकिगत मजेशीर आहे. इ. स. १६४४ साली मसूरला आल्यावर समर्थांनी रामजन्मोत्सव सुरू केला. मसूरच्या सार्वजनिक रामजन्मोत्सवाच्या मिरवणुकीत झेंडे घेऊन जात असताना एका झाडाची फांदी आडवी आली.

 

ती तोडण्यासाठी समर्थांनी शिष्यांना चमत्कारिक अट घातली. फांदीच्या शेंड्याकडील भागावर बसून फांदी तोडायची खाली विहीर होती. फांदी तुटताच फांदीबरोबर तोडणाराही विहिरीत पडणार हे स्पष्ट होते. कोणी तयार होईना. पण 'सद्गुरुवचनी पूर्ण विश्वास' असल्याने अंबाजी तयार झाला. फांदी तुटताच फांदीबरोबर तोही विहिरीत पडला. समर्थांनी लगेच विहिरीत उडी मारून अंबाजीला बाहेर काढले. समर्थ म्हणाले, “गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून तू हे धाडस केलेस, तुझे कल्याण होईल. आजपासून तुझे नाव कल्याण!”
 

पुढे हे कल्याणस्वामी समर्थांचे पट्टशिष्य झाले. त्यांनी आपले सर्व जीवन समर्थसेवा व समर्थकार्य यासाठी वाहिले. समर्थांबरोबर ते सतत सावलीप्रमाणे राहिलेसमर्थांबरोबर घळीत राहून दासबोधाचे ते लेखनिक झाले. त्यांच्या अपूर्व गुरुसेवेमुळे आज 'दासबोध' हा ग्रंथ आपल्या हाती लागला. समर्थ आणि कल्याणस्वामी हे अनन्यभावाने एकरूप झाले होते. समर्थांच्या अखेरीच्या काळात त्यांनी कल्याणस्वामींना गुरुपदी विराजमान केले. समर्थांनी इ. स. १६७८च्या सुमारास कल्याणस्वामींना जगदोद्धारासाठी डोमगाव, परंडा परिसरात जाण्याची आज्ञा केली. गुरूआज्ञा प्रमाण मानून कल्याणस्वामी इ. स. १७१४ पर्यंत म्हणजे ३६ वर्षे डोमगाव परिसरात राहिले. त्यांनी कर्नाटक व तेलंगण प्रांतात रामदायी संप्रदाय वाढविण्याचे मोठे कार्य केले.

 

२२ जानेवारी, १६८२ ला समर्थांचे निर्याण झाले. परंतु, त्याआधी तीन वर्षे हा शिष्योत्तम डोमगावी येऊन राहिला होता. आयुष्यभर छायेप्रमाणे समर्थांबरोबर राहिलेला हा त्यांचा पट्टशिष्य समर्थांच्या देहावसान प्रसंगी सज्जनगडावर नव्हता. रामदासांच्या देहाला अग्निसंस्कार देण्यात आले. चितेतील राख सावडताना एक स्वयंभू आयताकृती 'चिरा' तेथे सापडली. समर्थांच्या निर्याणाचे वृत्त समजताच कल्याणस्वामी त्वरेने सज्जनगडी आले. चितेतील राख पाहून ते धाय मोकलून रडले. त्यांनी रामदासांना अखेरच्या दर्शनाची कळकळीची विनंती केली. तेव्हा त्या चिरेतून बाहेर येऊन समर्थांनी कल्याणांना दर्शन दिल्याची कथा सांगितली जाते. सज्जगडावर आजही त्या चिरेला पडलेला तडा याची साक्ष देत आहे.

रामदासांचा अस्थिकलश चाफळला राम मंदिराजवळील वृंदावनात ठेवण्यात आला. दहा दिवस झाल्यावर अस्थींचे विसर्जन गंगेत अथवा नदीत करण्याची प्रथा आहे. कल्याणस्वामींचे शिष्य केशवस्वामींकडे या अस्थिकलशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या अस्थी काशीला घेऊन जाण्याची गोष्ट केशवस्वामींनी अनेकदा कल्याणस्वामींकडे काढली. पण, प्रत्येक वेळी 'आता नको, पुढे पाहू' असे उत्तर मिळत असे. शेवटी अखेरीस ३३ वर्षे कल्याणस्वामींच्या संमतीची वाट पाहून, ती न मिळाल्याने केशवस्वामींनी कल्याणस्वामींना न विचारता इ. स. १७१४ मध्ये आषाढ शुद्ध त्रयोदशीला रामदासांच्या अस्थी काशीला नेण्यासाठी चाफळ वृंदावनातून बाहेर काढल्या.

 

जाता जाता डोमगावला जाऊन कल्याणस्वामींना सांगून पुढे जावे, असा त्यांचा विचार होता. इकडे कल्याणस्वामींनी अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी शके १६३६ म्हणजे इ. स. १७१४ मध्ये परंडा जिल्हा धाराशीव (आजचे उस्मानाबाद) येथे देह ठेवला. डोमगाव येथे त्यांचे पार्थिव आणून सीना नदीच्या ताटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

केशवस्वामी रामदासांच्या अस्थी घेऊन डोमगावला पोहोचले. पण, त्यांना कल्याणस्वामींची भेट झाली नाही. कल्याणस्वामींनी देह ठेवल्याचे समजल्यावर त्यांना अत्यंत वाईट वाटले. रामदासांच्या अस्थी विसर्जनाचा विषय निघताच 'पुढे पाहू' असे कल्याण का म्हणत होते, याचा त्यांना उलगडा झाला. रामदासांच्या अस्थी चाफळहून हलवताच कल्याणांनी देह ठेवला, हे आश्चर्यकारक आहे. दोघे किती एकरूप झाले होते, हेच यावरून दिसून येते. केशवस्वामींनी रामदास व कल्याणस्वामी दोघांच्याही अस्थी काशीला नेऊन एकत्र गंगेत विसर्जित केल्या. मृत्यूनंतरही कल्याणस्वामींनी चिरंतनाच्या प्रवासात आपल्या गुरूंची साथ सोडली नाही! धन्य ते कल्याण स्वामी...!

- सुरेश जाखडी 

 

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@