माणूस असल्याची जाणीव म्हणजेच माणुसकी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2019
Total Views |

 
 

ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांचे प्रतिपादन 

मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी): “माणूस असल्याची जाणीव होणे, ही माणुसकी उलगडण्याची सुरुवात असते,” असे प्रतिपादन शनिवारी ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांनी केले.


‘चैत्र चाहूल परिवारा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘माझ्या आयुष्याचा अर्थ’ या विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी रवींद्र नाट्यमंदिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार आणि ‘अ‍ॅड. फीज’चे विनोद पवार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी दिनकर गांगल यांचे स्वागत विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते करण्यात आले.


गांगल हे सध्या ‘थिंक महाराष्ट्र’ या पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर वाचक चळवळ चालवतात. गेली अनेक वर्षे ग्रंथालीच्या माध्यमातून ते यासाठी प्रयत्न करत आहेत. ’ना डावे, ना उजवे पण मजकुराशी प्रामाणिक असलेले संपादक’ या शब्दांत दिनकर गांगल यांचे वर्णन किरण शेलार यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विनोद पवार यांनी दिनकर गांगल यांच्या ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील काही उतारे वाचून दाखवले. यावेळी दिनकर गांगल यांच्या पत्नी अनुराधा गांगल यादेखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या.


“तुमच्या दृष्टिकोनातून माणुसकीविषयीची संकल्पना काय आहे?,” या प्रश्नाने किरण शेलार यांनी संवादाचा श्रीगणेशा केला. “माणूस असल्याची जाणीव होणे, ही माणुसकी उलगडण्याची सुरुवात असते,” असे मत दिनकर गांगल यांनी व्यक्त केले.




पुढे ते म्हणाले, “मानवाधिकारांची चर्चा होते, मानवाधिकारांची पायमल्ली झाल्याच्या बातम्या कानावर येतात; पण तुम्ही दादर, मीरारोड स्टेशनवर गर्दीच्या वेळी उतरणारी माणसं पहिली की, मानवाधिकारांची पायमल्ली होण्याच्या वेगळ्या घटना ऐकणे गरजेचे राहत नाही,” असे दिनकर गांगलांनी नमूद केले. “अग्रलेख मागे घेतले जातात, बातम्यांच्या शेजारी खुलासे छापले जातात, तर या पत्रकारितेच्या अवस्थेकडे तुम्ही कसे पाहता?” असाही प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारितेसंबंधीच्या या प्रश्नाला उत्तर देताना गांगलांनी व्यावसायिकीकरणाला जबाबदार धरले. “मानवाधिकारांची पायमल्ली झाल्याच्या घटना ऐकाव्या लागत नाहीत. संस्कृतीकरणाच्या कामाला प्राधान्य दिले गेले पाहिजे,” असेही दिनकर गांगल म्हणाले. मन घडविणार्‍या संस्था महत्त्वाच्या असे गांगल यांना वाटते. “सामाजिक कामांवर पैसा खर्च करण्याविषयीच्या संकल्पना खूप ठोकळेबाज असतात. गरजूला मदत करणे म्हणजेच सामाजिक कामांवर पैसा खर्च करणे नाही, मन घडविण्याच्या कामांसाठी कोण काय कारणार, याचा विचार केला जात नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 


पुढल्या महिन्यात ’गंगेमध्ये गगन वितळले’ या गांधींविषयी लिहिलेल्या पुस्तकावर अशाच प्रकारचा संवादाचा कार्यक्रम लेखक अंबरिश मिश्र यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. यावेळी संस्थेतर्फे प्रशांत शिंदे या युवा उद्योजकाला पंचवीस हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली. प्रशांत शिंदे हा युवक पूर्वी मॅजेस्टिक दुकानात नोकरी करीत असे. सध्या तो घरोघर पुस्तकविक्रीचे काम करतो. यावेळी कार्यक्रमाला अनंत भावे, जयंत धर्माधिकारी, कॅम्लिनचे श्रीराम दांडेकर, साप्ताहिक विवेकच्या अश्विनी मयेकर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे रवींद्र साठे, वसंत वसंत लिमये, नीला उपाध्ये, श्रीकांत बोजेवार, अशोक दातार, चित्रपट समीक्षक अशोक राणे, निलेश जाधव, उषा मेहता, पद्मभूषण देशपांडे, प्रमोद पवार, शुश्रूषा हॉस्पिटलचे संजय पानसे, सुधीर नांदगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.



@@AUTHORINFO_V1@@