कुलाबा मतदारसंघ भाजपकडेच राहण्याचा अंदाज!

    22-Oct-2019
Total Views | 33



विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबई शहर भागात भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचा वरचष्मा राहण्याची चिन्हे आहेत. मुंबई शहारात एकूण मतदानाची टक्केवारी कमी झाली असली तरी झालेल्या मतदानात युवक वर्गाचा सहभाग लक्षणीय होता. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हक्काचे मतदार मतदानाला उतरलेच नाहीत, असे चित्र आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असे दिसते आहे.


मुंबईत सर्वात कमी मतदान दक्षिण टोकाला असलेल्या कुलाबा मतदारसंघात झाले आहे
. इथे भाजपने ज्येष्ठ नेते राज के. पुरोहित यांचे तिकीट कापत इथून राष्ट्रवादीतून नव्याने भाजपमध्ये आलेल्या अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. नार्वेकर कुटुंबीय कुलाब्यातील स्थानिक असून या भागात त्यांचे चांगले सामाजिक कार्य आहे. राहुल हे विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. राहुल यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे भाजपत असून नगरसेवक आहेत. शिवाय राहुल यांच्या वहिनी याच भागातून नगरसेविका आहेत. राज पुरोहित यांचा गट नाराज असला तरी नार्वेकर स्थानिक असल्याने आणि या भागात असलेले त्यांचा जुना जनसंपर्क लक्षात घेता त्या नाराजीचा परिणाम फार होणार नाही असे दिसते आहे.



हा मतदारसंघ परंपरागत काँग्रेसचा आहे
. परंतु, मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर भाजपचे राज पुरोहित यांनी या मतदारसंघात आपला ‘जम’ बसवला आणि २०१४ मध्ये हा मतदारसंघ जिंकला. यावेळी काँग्रेसने भाई जगताप यांच्यासारखा तगडा उमेदवार दिला असला तरी भाई इथले स्थानिक नाहीत. शिवाय भाईंची आक्रमक प्रतिमा इथल्या व्यापारी वर्गात आणि उच्च मध्यमवर्गात तसेच उच्चभ्रू मतदारात पचनी पडणारी नाही. त्यात प्रचारादरम्यान भाई आणि राहुल नार्वेकर यांची एकदा समोर समोर आल्यावर बाचाबाची झाली असल्याचे कळते. ही घटनादेखील या मतदारसंघात मतदारांना रुचली नाही असे वातावरण आहे. त्यात काँग्रेसचे परंपरागत हक्काचे मतदार मतदानासाठी उतरवण्यात भाई जगताप यांना अपयश आल्याचे दिसते आहे. त्यामुळे मतदान टक्केवारी घसरली असली तरी झालेल्या मतदानाचा फायदा राहुल नार्वेकर यांनाच झाला आहे, असे दिसते आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर किमान दहा हजार मताधिक्क्याने ही जागा जिंकतील, असे दिसते आहे.





-
राजेश प्रभु-साळगांवकर

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121