सिंधुदुर्ग : ‘ग्रीन सी’ कासवांचा ‘हॉटस्पॉट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019   
Total Views |



 

मुंबई ( अक्षय मांडवकर ) - सिंधुदुर्ग जिल्ह्याची किनारपट्टी ही सागरी कासवांमधील ग्रीन सीप्रजातीच्या कासवांसाठी पोषक ठरली आहे. या किनारपट्टीलगत असणारे खड़काळ आणि प्रवाळ क्षेत्र या प्रजातीच्या कासवांकरिता उत्तम अधिवास ठरत असल्याचे, मत सागरी संशोधकांनी मांडले आहे. तसेच ग्रीन सीकासवांच्या स्थलांतराच्या दृष्टीने या जिल्ह्यातील सागरी परिक्षेत्रामधून काही पुरावे संशोधकांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गची सागरी परिसंस्था ग्रीन सीकासवांच्या पालनपोषणाकरिता हॉटस्पॉटझाल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षांत सागरी परिसंस्थेबाबत समाजात निर्माण झालेली जनजागृती आणि मच्छीमार व संशोधकांमधील वाढता संवाद ही माहिती समोर येण्यास कारणीभूत ठरली आहे.

 
 

 
 
 

महाराष्ट्रातील सागरी कासवे

जागतिक सागरी परिसंस्थेत समुद्री कासवांच्या एकूण सात प्रजाती आढळतात. त्यामधील महाराष्ट्राच्या सागरी परिसंस्थेत प्रामुख्याने तीन प्रजातीच्या कासवांचा अधिवास आढळून येतो. यामध्ये सर्वसामान्यपणे सर्वाधिक संख्याऑलिव्ह रिडलेप्रजातीची असून त्यापाठोपाठ ग्रीन सीआणि हॉक्सबिलकासवांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर दरवर्षी ऑलिव्ह रिडलेप्रजातीच्या माद्या विणीसाठी येतात. यंदा वर्षाच्या सुरुवातीस या कासवांची १९६ घरटी कोकण किनारपट्टीवर आढळून आली. घरट्यांमध्ये आढळलेल्या एकूण १८ हजार, ९७ अंड्यामधील ११ हजार, २७३ अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडली. या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. ग्रीन सीहॉक्सबिलकासवांचे प्रजनन राज्यातील किनारपट्टीवर होत नाही. मात्र, मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये अनावधानाने ही कासवे सापडल्याची आणि जखमी अवस्थेत किनाऱ्यांवर वाहून आल्याची नोंद आपल्याकडे आहे. या तीन प्रजातींखेरीज राज्याच्या समुद्रात लेदरबॅकही सागरी कासवांमधील सर्वात मोठी प्रजात आणि लॉगरहेडप्रजातीच्या कासवांचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. डहाणू येथील समुद्री कासव उपचार केंद्रात काही वर्षांपूर्वी जखमी लॉगरहेडकासवांवर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याची पुन्हा समुद्रात सुटका करण्यात आली. तसेच यंदा जून महिन्यात रायगड जिल्ह्यातील भारदखोल येथील समु्द्रात लेदरबॅकप्रजातीचे कासव आढळून आले होते. मासेमारीच्या जाळ्यात सापडलेल्या या कासवाची मच्छीमारांनी सुटका करून त्याला पुन्हा समुद्रात सोडले. सिंधुदुर्गातील देवबागच्या किनाऱ्यावर १९८५ साली आढळलेल्या लेदरबॅककासवाचा छायचित्रीत पुरावा संशोधकांकडे उपलब्ध नव्हता. मात्र, भारदखोलच्या समुद्रात या कासवाच्या वावराचा छायाचित्रीत पुरावा प्रथमच सागरी संशोधकांच्या हाती लागला. वरील दोन्ही पुराव्यांच्या आधारे राज्याच्या सागरी परिसंस्थेत लेदरबॅकआणि लॉगरहेडकासवांचा अधिवास असण्याबाबत सागरी अभ्यासक ठाम मत मांडत नाहीत. त्यामुळे या दोन्ही प्रजातींचा केवळ वावर असल्याचे ढोबळमानाने म्हणता येईल.



 
(डहाणूच्या किनाऱ्यांवर जखमी अवस्थेत वाहून आलेली 'ग्रीन सी' कासवाची मादी 'समुद्री कासव उपाचार केंद्रा'त उपचार घेताना )
 
 
 

ग्रीन सीकरिता पोषक अधिवास

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सागरी परिसंस्था ग्रीन सीप्रजातीच्या कासवांचा हॉटस्पॉटअसल्याचे मत सागरी संशोधकांनी मांडले आहे. म्हणजेच ही कासवे मोठ्या संख्येने या जिल्ह्यातील सागरी परिसंस्थेत आढळून येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. या जिल्ह्यातील मालवण तालुक्यात सागरी अभयारण्यआहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आसपासचे सागरी क्षेत्र प्रवाळांच्या (कोरल) जैवविविधतेने समृद्ध आहे. त्यामुळे १९८७ साली येथील २९.१२ चौ.किमीचे सागरी परिक्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. मालवण ते वेंगुर्ला दरम्यानच्या सागरी पट्ट्यात किनाऱ्यापासून काही अंतरावर खडकाळ परिसंस्था सुरू होते. अशा परिसंस्थेत सागरी गवत व शैवाळ उगवण्याचे प्रमाण अधिक असते. ग्रीन सीकासवांचे मुख्य खाद्य हे सागरी गवत आणि शैवाळ आहे. त्यामुळे खाद्याच्या उपलब्धतेमुळे 'ग्रीन सी' कासवांचा अधिवास या खडकाळ परिसंस्थेनजीक असल्याची शक्यता वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे सागरी संशोधक स्वप्निल तांडेल यांनी वर्तवली. खडकाळ परिसंस्थेतील या जागांना कासवांचे फिडींग ग्राऊंडम्हटले जाते.

 
 

 
 

मासेमारीच्या आधारे निष्कर्ष

खडकाळ परिसंस्थेच्या क्षेत्रात यांत्रिक पद्धतीच्या आधारे मासेमारी केली जात नाही. यांत्रिक बोटींना खडक लागून अपघात होण्याची शक्यता असल्याने या परिसरात बिनयांत्रिक बोटींच्या आधारे मासेमारी केली जाते. छोट्या स्तरावर मासेमारी करणारे मच्छीमार खडकाळ परिक्षेत्रात जाळी लावतात. यासाठी गिलआणि शोअर सीनजाळीचा वापर केला जातो. खडकाळ क्षेत्रात जाळ्या लावल्याने त्यामध्ये अनावधानाने सागरी कासवे अडकली जातात. यामध्ये सर्वाधिक संख्या ग्रीन सीकासवांची असते. संशोधक स्वप्निल तांडेल यांनी 'रूफफोर्ड फाऊंडेशन'साठी केलेल्या समुद्री कासवांच्या संशोधनादरम्यान खडकाळ क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या बहुतेक मच्छीमार वर्षभरात जाळ्यात अडकणाऱ्या एक ते चार ग्रीन सीकासवांची सुटका करत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. तसेच त्यांच्या सर्वेक्षणानुसार गेल्या महिन्याभरात केवळ वेंगुर्ला किनाऱ्यावरुन जाळ्यात अडकलेल्या सात ग्रीन सीकासवांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे. यावरून मालवण ते वेंगुर्ल्यादरम्यान असलेल्या खडकाळ परिसंस्थेत अधिवास करणाऱ्याग्रीन सीकासवांचा अंदाज येतो.

 
 

 
 ( जाळ्यात अडकलेल्या 'ग्रीन सी' कासवाची वेंगुर्ला किनाऱ्यावर सुटका करताना मच्छीमार )
 
 
 

स्थलांतराचा पट्टा ?

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सागरी परिक्षेत्र हा ग्रीन सीकासवांचा स्थलांतराचा पट्टा असण्याची शक्यता देशाच्या पश्चिम किनाऱपट्टीवरील सागरी कासवांवर अभ्यास करणाऱ्या सुमेधा कोरगावकर यांनी वर्तवली आहे. रायगड आणि रत्नागिरीच्या सागरी पट्यामध्ये या कासवांचा फार क्वचितच वावर आढळून येत असल्याची माहिती कासवमित्र मोहन उपाध्ये यांनी दिली. तसेच ग्रीन सीकासवांचे प्रजनन राज्याच्या किनाऱ्यांवर होत नाही. मात्र, लक्षद्वीप बेट आणि गुजरात राज्यातील किनाऱ्यांवर या कासवांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर होते. राज्याच्या उत्तरेकडील पालघर आणि डहाणूच्या किनाऱ्यांवर चार ते पाच फूट आकाराची अवाढव्य ग्रीन सीकासवे जखमी अवस्थेत वाहून येतात. यामध्ये माद्यांची संख्या अधिक असते. या कासवांवर डहाणूमधील सागरी कासव उपचार केंद्रात उपचार केले जातात. डहाणू-पालघरची ही संपूर्ण किनारपट्टी गुजरातच्या ग्रीन सीकासवांच्या विणीच्या स्थळांपासून काही सागरी मैलांवर आहे. शिवाय सिंधुदुर्गमध्ये त्यांचे फिडींग गाऊंडअसल्यामुळे त्यादरम्यानचा संपूर्ण सागरी पट्टा ही कासवे स्थलांतरणासाठी वापरत असल्याची शक्यता कोरगावकर यांनी व्यक्त केली आहे.

 
 

 
 ( वेंगुर्ला किनाऱ्यावर जाळ्यात अडकलेले 'ग्रीन सी' कासव )
 
 

स्थलांतराचा पुरावा

कोरगावकरांनी वर्तवलेल्या स्थलांतराच्या शक्यतेला पाठबळ देणारा पुरावा मच्छीमारांच्या हाती लागला आहे. सिंधुदुर्गमध्ये ट्रॅाल जाळीने मासेमारी करणारे मच्छीमार अक्षय हरम यांच्या जाळ्यात टॅगकेलेले ग्रीन सीकासव अडकले होते. देवगड तालुक्यातील पडवणेच्या समुद्रात मासेमारी करताना लोखंडी टॅगलावलेले चार फुटांचे अंदाजे १५० ते २०० किलोचे ग्रीन सीकासव जाळ्यात सापडल्याची माहिती हरम यांनी दिली. त्याच्या परामध्ये (फ्लिपर) क्रमांक नोंदवलेली लोखंडी पट्टी लावल्याचे हरम यांनी सांगितले. सागरी कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या परांमध्ये सांकेतिक क्रमांक नोंदवलेली लोखंडी पट्टी अडकविण्यात येते. त्यामुळे हे कासव दुसऱ्या किनाऱ्यावर आढळून आल्यास त्यांच्या स्थलांतर मार्गिकेचा अंदाज मांडता येतो. सिंधुदुर्गात टॅगकेलेले सागरी कासव आढळल्याने तेथील संपूर्ण सागरी परिक्षेत्र ग्रीन सीकासवे आपल्या स्थलांतराकरिता वापरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
 

  
                                  (  मच्छीमार अक्षय हरम यांच्या जाळ्यात सापडलेले 'टॅग' केलेले 'ग्रीन सी' कासव )
 
 

उपचार केंद्राचा अभाव

सिंधुदुर्गची सागरी परिसंस्था समुद्री जैवविविधतेने समृद्ध असूनही येथील किनारपट्टीवर सागरी जीवांवर उपचार करण्यासाठी एकही निवारा केंद्र अस्तिवात नाही. येथील किनाऱ्यांवर दरवर्षी मोठ्या संख्येने डॅाल्फिन, पॅारपॅाईज, व्हेल सारखे सागरी सस्तन प्राणी आणि सागरी कासवे जखमी वा मृतावस्थेत वाहून येतात. मात्र, किनारपट्टीवर कोणत्याही प्रकारचे उपचार केंद्र अस्तिवात नसल्याने बहुतांश वेळा मच्छीमारांना या जीवांना जखमी अवस्थेतच समुद्रात सोडावे लागते. यामध्ये पर कापलेले आणि अशक्त झालेल्या सागरी कासवांची संख्या अधिक आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@