महान कवयत्री महादेवी वर्मा यांना आज गुगलने आठवण केले आहे. महादेवी वर्मा यांची आज जयंती असल्याने त्यांना आज गुगलने डूडलच्या स्वरूपात स्मरणात आणले आहे. २७ एप्रिल १९०७ रोजी महादेवी वर्मा यांचा जन्म झाला. हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जात होते.
आधुनिक हिंदीच्या समर्थ कवी असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा' या नावाने देखील ओळखले जात होते. प्रतिभावान कवयित्री व गद्य लेखिका महादेवी वर्मा संगीतात देखील निपुण होत्या. त्याचबरोबर कुशल चित्रकार व सृजनात्मक अनुवादक देखील होत्या. त्यांना हिंदी साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते.
महादेवी वर्मा यांना प्रशासनिक, अर्धप्रशासनिक व व्यक्तिगत अशा सगळ्याच संस्थांकडून सन्मानित केले गेले होते. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५२ मध्ये उत्तर प्रदेश विधान परिषदेत त्यांना सदस्य बनविले गेले होते. १९५६ मध्ये भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक सेवेसाठी त्यांना पद्मभूषण ही उपाधी दिली. १९७९ मध्ये त्या साहित्य ॲकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य होत्या. भारत सरकारकडून १९८८ मध्ये त्यांना मरणोपरान्त पद्मविभूषण देण्यात आले होते.