पुढच्यास ठेच मागचा शहाणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018   
Total Views |

 


 
 
 
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ अशी मराठीत एक म्हण आहे. परंतु आजकाल अनेकवेळा ठेच लागूनही पुढचा काही शहाणे होण्याचे नाव घेत नाही आणि मागच्याची अवस्था मात्र ‘जैसे थे’ अशीच राहते. या म्हणीचा संदर्भ येथे देण्याचे कारण म्हणजे ‘त्सुनामी’.
 
 
इंडोनेशियामध्ये नुकतेच त्सुनामीचे संकट येऊन धडकले. या संकटात २२२ जणांचा बळी गेला. अनेकांचे घर, संसार उद्ध्वस्त झाले. नैसर्गिक आपत्तीचे संकट इंडोनेशियासाठी काही नवे नाही. भातुकलीचा खेळ मांडून तो मोडावा आणि परत नव्याने मांडावा त्याप्रमाणे परत परत पुन्हा पुन्हा नव्याने संसार उभारण्याची जणू काही सवयच इंडोनेशियातील नागरिकांना जडली आहे. हल्ली तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींबद्दल आधीच कळते. त्यांचा अंदाज बांधता येतो. आधीच खबरदारी घेऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाते. जगातील काही प्रगत देश अशी खबरदारी घेतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींपासून पूर्णत: बचाव जरी त्यांना करता येत नसला तरी होणारे नुकसान काही प्रमाणात टाळता येते. त्यामानाने इंडोनेशिया हा विकसनशील देश आहे. तरीदेखील या त्सुनामीचा अंदाज इंडोनेशियाच्या प्रशासनाला आला नाही. उलटपक्षी ‘समुद्राला मोठी भरती आली असून नागरिकांनी भीती बाळगू नये,’ असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु, इंडोनेशियाच्या प्रशासनाचा हा अंदाज फोल ठरला. परिणामी त्सुनामीच्या संकटाला नागरिकांना तोंड द्यावे लागले. नैसर्गिक आपत्तीचा अंदाज येऊनही त्याबाबत वेळीच खबरदारी न घेतल्यामुळे अनेक जीव मृत्युमुखी पडले, परंतु या चुकीचे खापर सर्वस्वी प्रशासनावर फोडता येणार नाही. कारण नैसर्गिक आपत्ती कधी येऊन पुढे उभी ठाकेल, हे ठामपणे सांगता येत नाही. निसर्गाच्या क्रोधाचा उद्रेक मानवावर केव्हा होईल, हे सांगता येत नसले, तरीही नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मितही असतात. निसर्गाच्या प्रकोपाला मानव कारणीभूत असतो, हे यापूर्वीही वारंवार सिद्ध झाले आहे.
 
 
त्सुनामी म्हणजे समुद्राच्या पोटात होणाऱ्या भूकंपासारख्या हालचाली,’ अशी जरी त्याची व्याख्या असली तरी समुद्रात असलेला प्लास्टिक पिशव्यांचा थर, इतर अविघटनशील पदार्थ, घनकचरा ही सर्व घाण मानवी कृत्यांमुळेच समुद्रापर्यंत पोहोचते. पाणथळ जागांवर सिमेंट रेतीचा भर घालून मानव या जमिनीदेखील गिळू लागला आहे. त्सुनामी हा त्याचाच एक दीर्घकाळानंतर दिसणारा परिणाम आहे. त्सुनामीचे संकट २००४ साली भारतानेही अनुभवले आहे. त्सुनामीच्या तडाख्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यातून सावरण्यासाठी भारताला बराच कालावधी लागला होता. समुद्रात उसळणाऱ्या मोठ्या लाटांची सवय इंडोनेशियाला आहे. परंतु, कोणती लाट केव्हा रौद्र रूप धारण करेल आणि विनाश करेल, हे सांगता येत नाही. प्रगत देशांप्रमाणे नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान भारतानेदेखील अवगत करायला हवे. जेणेकरून येणाऱ्या संकटांची वेळीच चाहूल लागेल आणि त्यासंबंधी खबरदारी घेता येईल. प्रत्यक्षात मात्र पाऊस केव्हा पडेल, पडणार की नाही? अतिवृष्टीचा इशारा याबाबत हवामान खात्याचा अंदाज कितपत खरा ठरतो, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. ते जगजाहीरच आहे. याबाबतीतही प्रगती व्हावी आणि होणारी प्रगती ही कासवाच्या गतीने नसावी. एवढीच काय ती अपेक्षा आपण करू शकतो.
 
 
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे आपत्ती काही प्रमाणात तरी थोपवता येईल, परंतु ही प्रगती संथगतीने झाली तर प्रगत होण्याआधीच कितीतरी नैसर्गिक आपत्ती येतील आणि जातीलही. त्यांचा थांगपत्तादेखील लागणार नाही. त्यातून सावरता सावरता नाकी नऊ येतील ते वेगळे! थोडक्यात काय, तर इंडोनेशियावर आज जे त्सुनामीचे संकट कोसळले त्यावरून भारताने वेळीच धडा घ्यावा. पुढच्यास ठेच लागल्याने मागच्याने शहाणे व्हावे. नाहीतर ‘जैसे थे’ तशीच परिस्थिती राहील. स्वतःच्या चुकीतून तर प्रत्येकानेच धडा घ्यायला हवा. परंतु, दुसऱ्याच्या चुकीतून जो शिकतो तो खरा हुशार ठरतो. ही हुशारी आता भारताने दाखवायला हवी. देशांतर्गत विषयांकडे लक्ष देणे, जेवढे आवश्यक आहे. तेवढेच लक्ष ऐनवेळी उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीकडेही द्यायला हवे. तरच खऱ्या अर्थाने भविष्याचा वेध घेता येईल. देश भाग्यविधाता ठरेल.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@