ज्या देशात बहुसंख्य हिंदू असून देखील तेथील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान मुस्लीम असू शकतात. अश्या देशातील मुस्लीम समाज स्वत:ला बैचेन, अथवा असुरक्षित कशा प्रकारे मानू शकतो? परंतु गेली १० वर्षे भारताचे उपराष्ट्रपती असलेले मोहम्मद हमीद अन्सारी यांना दुर्दैवाने असे वाटत आहे, आणि हा साक्षात्कार त्यांना तब्बल १० वर्षानंतर घडला आहे.
देशाचे मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य देऊन त्यांनी स्वत: ला देशाचे नव्हे तर मुस्लीम समाजाचे उपराष्ट्रपती मानून घेतले आहे, असेच लक्षात येते. भारताच्या जगप्रसिद्ध बॉलीवूडमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आणि सर्वाधिक चाहते असलेले तिन्ही व्यक्ती मुस्लीम आहेत. मात्र इथल्या बहुसंख्य हिंदू समाजाने त्यांना वाळीत टाकले नाही, उलटपक्षी त्यांच्या कर्तृत्वाची दादच दिली आहे. भारतीय क्रिकेट संघात असलेले इरफान पठाण, युसुफ पठाण, मोहम्मद शमी, मोहम्मद कैफ यांच्या खेळीची तुलना होऊ शकत नाही एवढे असाधारण कर्तुत्व त्यांनी दाखविले आहे, आणि त्यांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम देखील मिळाले आहे, आणि तरी देखील मुस्लीम समाज स्वत:ला बैचेन कश्या पद्धतीने मानू शकतो?
उपराष्ट्रपती म्हणून संविधानाचे संरक्षण करणे हे हमीद अन्सारी यांचे आद्य कर्तव्य आहे, त्याच बरोबर नि:पक्ष असणे देखील. असदुद्दिन ओवैसी यांच्या सारख्या धर्मांध नेत्याला शोभेल अशी भाषा देशाच्या उपराष्ट्रपतीकडून जनतेला अपेक्षित नाही. हमीद अन्सारी यांची पार्श्वभूमी तशी मुस्लीम समजाचा नेता म्हणून जरी असली, तरी देखील उपराष्ट्रपती पदी असताना केवळ एकाच धर्माच्या बाजूने बोलणे हे असंवैधानिक ठरते. कारण देशाचा संविधान केवळ मुस्लीम समाजासाठी बनलेला नसून तो सर्व भारतीयांसाठी बनला आहे. त्यामुळे असुरक्षितता ही भारतीयांसाठीची असू शकते, केवळ एखाद्या धर्मियांसाठीची नव्हे. हे लांगुलचालनाचे राजकारण एखाद्या राजकीय नेत्याला शोभेसे असते. उपराष्ट्रपतींना नव्हे.
मालदा, काश्मिरी पंडित, कम्युनिस्ट हिंसाचार, गोध्रा घटनांवर मौन का?
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या मुलाखती दरम्यान अखलाक, तथाकथित गौरक्षकांचा हल्ला यांचे उदाहरण देत देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षितता असल्याचे सांगितले. मात्र याच वेळी मालदा येथे हिंदू नागरिकांवर झालेल्या हल्ल्याविषयी सोयीने मौन साधले. काश्मिर मधून हल्ला करून आपल्याच घरातून हाकलून लावलेल्या काश्मिरी पंडित यांच्याबद्दल देखील ते काहीही बोलले नाहीत. केरळमध्ये हमीद अन्सारी यांच्याच उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात शेकडो नागरिकांचा कम्युनिस्ट हिंसाचाराने बळी घेतला आहे, मात्र त्यांना यावर बोलणे महत्वाचे वाटले नाही, गोध्रा येथे ५६ कारसेवकांना जिवंत जाळल्याची घटनेवर देखील त्यांनी साधलेली चुप्पी कशाचे द्योतक मानावे?
जेथे केवळ मुस्लीम समाजाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच विषयांवर त्यांनी भाष्य केले आहे. याचा अर्थ मुस्लीम नागरिकांचा मृत्यु होणे जेवढे दुर्दैवी आहे, तेवढे हिंदू नागरिकांचा मृत्यू दुर्दैवी नसतो, असा त्यांचा दृष्टीकोन आहे का? हा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे संविधानाच्या संरक्षकाने हिंसाचारावर केवळ एकाच अंगाने बोलणे हे एकांगीपणाचे लक्षण आहे, आणि ते एखाद्या हिंसाचारा एवढेच दुर्दैवी आहे.
कर्तृत्ववान मुस्लिम समाज
आपल्या देशातील मुस्लीम समाज हा एक कर्तृत्ववान समाज आहे. देशाच्या विकासासाठी या समाजाचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. आपल्या देशातील सुप्रसिद्ध खेळ क्रिकेट संघाचा कप्तान मोहम्मद अजहरुद्दिन असो किंवा जहीर खान असो यांनी क्रिकेट जगतात भारताला उच्च पदावर नेण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. बॉलीवूडकर सलमान, आमीर आणि शाहरुख खान यांच्यावर हजारो-लाखो नागरिक प्रेम करतात. त्यांच्या लोकप्रियतेने देशाची शान वाढत असते. लष्करात असलेले हजारो मुस्लीम सैनिक हे देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढतात, केवळ मुस्लीम समाजाचे संरक्षण करावे असा त्यांचा उद्देश्य असतो का? कदापि नाही ...!!
जेव्हा माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम देश २०२० पर्यंत जागतिक आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतात तेव्हा केवळ मुस्लीम समाजाने प्रगती करावी असे ध्येय त्यांच्यासमोर नसते. ते संपूर्ण भारतीय समाजाचा विचार करतात. मात्र दुर्दैवाने हमीद अन्सारी यांना तो दृष्टीकोन लाभला नाही.
आपल्या देशात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात, प्रत्येकजण आपल्या धर्माचे आचरण करून दुसऱ्या धर्माचा आदर करत असतो, मात्र काही तुरळक घटनांचे भांडवल करून देशभरचे वातावरण गढूळ करायचे कुणी ठरवलेच असेल तर त्यास काही औषध नाही. कारण झोपलेल्याला जागविता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे अवघड नव्हेच, तर अशक्य होऊन जाते.
शहाण्यांस अधिक काय सांगावे. मी जे अधिक स्पष्टपणे माडले आहे तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानिक पद्धतीने राज्यसभेत मांडले आहे. त्यांचे संपूर्ण वक्तव्य आणि माझे मत थोडे मिळते जुळते आहे.
- हर्षल कंसारा