मुंबई : पुण्यातील कोंडमळा नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेला १५ दिवस उलटले, तरी चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. या प्रकरणी कार्यादेशास उशीर का झाला आणि दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, असा सवाल भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी विधानपरिषदेत उपस्थित केला.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आ. सुनील शिंदे यांनी ही लक्षवेधी मांडली. यावर बोलताना दरेकर म्हणाले, “हा प्रश्न ग्रामविकास खात्याचा आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याचा, यापेक्षा सरकारने जबाबदारी घेऊन उत्तर देणे महत्त्वाचे आहे. कार्यादेशास उशीर का झाला? त्याची कारणे काय? दोषी कोण? अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही प्रश्न मांडतो.”
यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि ग्रामस्थांच्या पदपथाच्या मागणीमुळे बजेटमध्ये बदल करावा लागला, ज्यामुळे दिरंगाई झाली. “त्रिसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कठोर कारवाई होईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांची मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.