अहमदाबाद : धारावीच्या विद्यमान वैशिष्ट्यांवर आधारित बांधकाम करण्याचा, धारावीकरांसाठी जागतिक दर्जाचा जिल्हा निर्माण करण्याचा आणि हार्ट ऑफ न्यू मुंबई ठरणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आमच्यासाठी सर्वात परिवर्तनकारी प्रकल्प असल्याचे सूतोवाच केले. धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) हा धारावीकरांच्या जीवनमानात आणि 'रोजगाराच्या' विद्यमान परिस्थितीत बदल घडवून आणण्याची एक अनोखी संधी आहे. ज्याचे उद्दिष्ट उत्तम पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधांसह उच्च दर्जाचे जीवनमान बहाल करणे असल्याचेही गौतम अदानी म्हणाले. ते अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल)च्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम) संबोधित करत होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, “आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आता भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी शहरी पुनर्वसन प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. धारावी सोशल मिशन कौशल्य,आरोग्यसेवा आणि रोजगार कार्यक्रमांद्वारे तरुणांना प्रोत्साहन देत आहे. दहा लाखांहून अधिक धारावीकर आता अरुंद गल्ल्यांमधून वैयक्तिक शौचालये, खुल्या जागा, शाळा, रुग्णालये, ट्रान्झिट हब आणि उद्याने असलेल्या टाउनशिपमध्ये स्थलांतरित होतील.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, सरकारने माटुंगा येथे ४० एकर रेल्वे जमीन प्रकल्पाला दिली गेली आहे. पुनर्विकासादरम्यान स्थलांतरित होणाऱ्या सुमारे १५,००० ते २०,००० लोकांसाठी नवीन घरे बांधण्यासाठी ही जमीन वापरली जाईल. या योजनेत बहुमजली निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे बांधकाम, रस्ते आणि पुलांचे अपग्रेडेशन आणि स्वच्छ पाणीपुरवठा, स्वच्छता, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि मनोरंजन केंद्रे यासारख्या आवश्यक सेवांचा विकास यांचा समावेश आहे.
अदानी म्हणाले, “मी तुम्हाला वचन देतो की अदानी समूहाचा वारसा त्यांनी बांधलेल्या टॉवर्सच्या उंचीवर नाही तर आम्ही ज्या विश्वासांवर प्रकल्प अंमलात आणतो त्याच्या उंचीवर प्रतिबिंबित होईल. हेच आमचे सत्य आहे. हेच आमचे वचन आहे,” असे अदानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.