मुंबई: महिला सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेता आता सर्वच सार्वजनिक वाहनांमध्ये पॅनिक बटन लावण्यात येत आहे. या सर्व प्रणालीचे एकच नियंत्रण कक्ष उभारून आता लक्ष ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये आता पॅनिक बटण बसवण्याची कार्यवाही सुरू झाली असून, एक नियंत्रण कक्ष मुंबईत उभारला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
विधान परिषदेत आ.सत्यजित तांबे यांनी उपस्थितीब केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे. दिल्लीतील निर्भया अत्याचार घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी १ जानेवारी २०१९ पासून सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये पॅनिक बटण अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे. मात्र, ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यात पॅनिक बटणचे कंट्रोल सेंटर उभारलेले नाही, हे खरे आहे का? असा सवाल तांबे यांनी केला. त्यावर उत्तर देताना सरनाईक यांनी नियंत्रण कक्षाची उभारणी अंधेरी येथील आरटीओ कार्यालयात केली आहे, असे स्पष्ट केले. सरनाईक यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये पॅनिक बटण बसवण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. २०१९ नंतर नोंदणी केलेल्या सार्वजनिक प्रवासी वाहनांत हे बटन बसवणे बंधनकारक आहे. त्यानुसार हे बटण बसविण्यात आले असून, ही यंत्रणा कार्यान्वित असल्याची पडताळणी करण्यात येते. सार्वजनिक प्रवासी वाहनांचा परवाना नूतनीकरण, फिटनेस आदी करतानाही पॅनिक बटण बसविले असल्याची खात्री करून परवाना दिला जातो, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.