महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नव्या संधी घेऊन येणार

Total Views |

मुंबई : "नवे राष्ट्रीय शिक्षा धोरण २०२०मुळे गेल्या ७० ते ७५ वर्षाच्या शैक्षणिक इतिहासात हे चौथे सर्वात शिक्षण मोठे धोरण आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्याने भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विकासाच्या आणि शिक्षणाच्या मोठ्या संधी यानिमित्ताने निर्माण होणार आहेत", असा विश्वास मुंबई विद्यापीठ सेंटर फॉर डिस्टन्स अ‍ॅण्ड ऑनलाइन लर्निंगचे संचालक प्राचार्य डॉ.शिवाजी सरगर यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना व्यक्त केला. 'नवे शैक्षणिक धोरण आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची मुहूर्तमेढ' याविषयावर विशेष मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी बोलताना ते म्हणाले,"१९८६नंतर यामध्ये काही झालं नव्हतं त्यामुळे ३४ वर्षानंतर हे धोरण बांधण्यात आले आहे. प्रत्येक वयोगटाला अनुसरून विचारपूर्वक हे धोरण आणण्यात आले आहे. यातून सर्वसामान्य विद्यार्थी आणि सर्वच गटातील मुलांपर्यंत पोहोचून त्यांना एक वेगळी दिशा देण्याचे काम या धोरणातून होते आहे. संपूर्ण भारतात हे धोरण टप्याटप्याने लागू झाले आहे आणि अर्थातच महाराष्ट्र यात अग्रेसर आहे."

मातृभाषांविषयक या शिक्षण धोरणात नेमकं काय सांगितलं? याबाबत बोलताना डॉ. सरगर म्हणाले, "भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे यासाठी नव्या शिक्षण धोरणात स्पष्ट गाईडलाईन आहेत. यामध्ये केंद्र सरकारने मातृभाषेत शिक्षणदेण्यावर सर्वाधिक भर दिलेला आहे. पहिली सहा वर्षे जर तुम्ही स्व भाषेत शिकलात तर समजून घेणं सोपं होईल. केंद्र सरकाराच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडे भारतीय भाषा समिती नावाची एक यंत्रणा आहे. ही यंत्रणा उच्च शिक्षणासाठी आवश्यक अभ्यासक्रमासाठी भारतीय भाषांमध्ये साहित्य निर्मितीचे काम करते आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील मुलांना आपले सर्व अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध व्हावे यासाठी साहित्यनिर्मिती सुरु आहे. मराठी भाषासमितीत मराठीतून साहित्य निर्मितीचे काम हे मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन विद्यापीठांच्या माध्यमातून सुरु आहे.

नवी मुंबईत येणारी आंतराराष्ट्रीय विद्यापीठे आणि २०३५मधील महाराष्ट्राची शैक्षणिक वाटचाल याबाबत बोलताना डॉ.सरगर म्हणाले,"भारताला एक मोठी हजारो वर्षांची चांगली ज्ञानपरंपरा आहे. उत्कृष्ट दर्जाचे ज्ञान आपण जगभराला दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आज २०२५मध्ये ज्या पद्धतीने आजही देशाचे नेतृत्व करतोय त्याहीपेक्षा २०३५ मध्ये तो पुढे जाणार आहे. त्याच कारण म्हणजे देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, तेवढ्याच ताकदीने राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. राज्याचे दूरदृष्टी असणारे नेतृत्व ज्यांनी नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची करार केला आहे. ही लीडरशिप १० वर्षांमध्ये महाराष्ट्राला जगामध्ये आणि किमान आशियामध्ये तरी आपण ज्ञानाचे नेतृत्व करणारे राज्य असणार आहे", असा विश्वास सरगर यांनी व्यक्त केला.

तसेच,"मोठ्या प्रमाणावर राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. पनवेलमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. लवकरच म्हणजे यावर्षीच तिथून उड्डाण सुरु होतील. ही एक साखळी आहे. १९९५ मध्ये पुणे मुंबई हे अंतर अगदी २ ते अडीच तासांवर आलं. त्यातही आता मिसिंग लिंक बोगदा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे ते पनवेल,नवी मुंबई हे अंतर अवघ्या १ ते दीड तासांवर येईल. साऊथ मुंबईतून २० मिनिटात अटल सेतूवरून तुम्ही नवीन पनवेल,नवी मुंबई विमानतळाला येणार आहेत. याचमुळे या परिसरात येणारी परकीय विद्यापीठे आणि त्या विद्यापीठांमध्ये येणारा प्राध्यापकांचा वर्ग, तंत्रज्ञ व्यक्ती त्यांना याचा फायदा होईल. त्याच माध्यमातून मोठे औद्योगिक क्षेत्र इथे उभे राहील", असेही डॉ. शिवाजी सरगर म्हणाले.



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.