अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा दि. १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. तीन दिवसांनंतर डीएनए चाचणीमुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११.१० वाजता दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे दिले. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार "आतापर्यंत ३२ जणांचे डीएनए जुळले आहेत, तर १४ कुटुंबीयांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे पार्थिव दिले आहे. अनेक मृतदेह भीषण जळालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे डीएनए चाचणी करूनच ते त्यांच्या नातेवाईकांना दिले जात आहेत,” असेही पटेल यांनी स्पष्ट केले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी म्हणाले की, "मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे आणि राज्य सरकारकडून बाधित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.”
फक्त ३२ मृतदेहांचीच ओळख पटलीअहमदाबाद विमान अपघाताला तीन दिवस झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की, मृतदेहांची ओळख पटवणेदेखील कठीण झाले आहे. आतापर्यंत डीएनए टेस्टिंगच्या मदतीने फक्त ३२ मृतदेहांचीच ओळख पटू शकली आहे. १४ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. अतिरिक्त सिव्हिल अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी रविवारी सांगितले की, "गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याही मृतदेहाची डीएनए टेस्टिंग करण्यात आले आहे. दि. १२ जून रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला होता. विमान अपघातातील मृतांपैकी बहुतेकजण गुजरात आणि राजस्थान येथील आहेत. मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे सर्व मृतदेहांची डीएनए टेस्टिंग केले जात आहे.”
१४ मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द
डॉ. रजनीश पटेल यांच्या मते, "आतापर्यंत फक्त ३२ डीएनए नमुनेच जुळू शकले आहेत. १४ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. हे मृतक उदयपूर, वडोदरा, खेडा, मेहसाणा, अरावली आणि अहमदाबाद येथील आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा डीएनए जुळला आहे. तसेच, पीडित कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी २३० टीम्सची स्थापना करण्यात आली आहे.