मुंबई, 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करणार असल्याची माहिती मिळते आहे.
मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेचे काम सुरु आहे. या मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा आॅक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या टप्प्यामुळे आरे ते बीकेसी प्रवास गारेगार आणि अतिजलद झाला आहे. आरे ते बीकेसी दरम्यानचा प्रवासाचा वेळ रस्त्याने एका तासापेक्षा जास्त असून, मेट्रो ३ने तो फक्त ३० मिनिटांत पूर्ण होतो. या मार्गावरील तिकिटांचे दर १० ते ५० रुपयांच्या दरम्यान आहेत. फेज २ए नंतर, फेज २ बी (वरळी ते कफ परेड) जुलै २०२५पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई मेट्रो-३ लाईन पूर्ण झाल्यावर, ३३.५ किमी लांबीचा हा भूमिगत कॉरिडॉर सहा प्रमुख व्यवसाय केंद्रे, ३० प्रमुख कार्यालय क्षेत्रे, १२ शैक्षणिक संस्था, ११ रुग्णालये, १० प्रमुख वाहतूक बिंदू आणि २५ सांस्कृतिक आणि मनोरंजन स्थळांना जोडेल. यासह ही लाईन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल्सपर्यंत थेट प्रवेश प्रदान करेल. भूमिगत स्थानकांमध्ये मोबाइल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी एअरटेल, जिओ, व्होडाफोन आणि एमटीएनएल यांच्या सहकार्याने अँटेना आणि रिपीटर्स बसवले जात आहेत.
मेट्रो ३ २ अ : बीकेसी ते वरळी
लांबी : ९.७७ किमी
स्थानक :
बीकेसी
धारावी
शीतलादेवी मंदिर
दादर
सिद्धिविनायक
वरळी