महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना सुरु करण्यास मंगळवार, दि. ६ मे रोजी मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

    06-May-2025   
Total Views | 10


Introduction of Adishakti Abhiyan for women


अहिल्यानगर (चौंडी)
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. महिलांचे आरोग्याबाबत समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे
, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे. मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करणे, पंचायत राज पध्दतीत महिला नेतृत्वाचा सहभाग वाढविणे, महिलांना आर्थिक सक्षम करणे आदी या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

आदिशक्ती अभियान राबविण्यासाठी सुमारे साडे दहा कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार वितरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही बदल अथवा काही सुधारणा करणे अपेक्षित असेल तर महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीस अधिकार प्रदान करण्यासही मान्यता देण्यात आली.


अहिल्यादेवींनी बांधलेल्या घाटांच्या जतनासाठी विशेष योजना

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारलेल्या तलाव, बारव, कुंड, घाट विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीच्या जतनासाठी विशेष योजना राबविण्यास मंत्री परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

- मृद व जलसंधारण विभागामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानुसार राज्यातील ३४ योजनांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त सर्व्हेक्षणात आढळून येणाऱ्या पाणी वाटप प्रणालीचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये जलाशयातील गाळ काढणे, जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. - राज्यात असे ३ ऐतिहासिक तलाव (चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी) आहेत. या योजनेत राज्यातील अशा १९ विहिरी, ६ घाट, ६ कुंड अशा एकूण ३४ जलाशयांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभिकरण इत्यादी कामे करण्यात येतील.


वसतीगृह योजनेस अहिल्यादेवी होळकर यांचे नाव

- धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव देण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली.

- राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

- प्रत्येकी २०० विद्यार्थी क्षमतेची ही वसतीगृह असणार आहेत. यात मुलांसाठी १०० क्षमतेचे तर, मुलींसाठी १०० क्षमता आहे. नाशिक येथे काम सुरु, पुणे, नागपूर येथे लवकरच सुरु होणार आहे.


अहिल्या नगरमध्ये मुलींसाठी आयटीआय

अहिल्या नगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक २७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची १२ अशा एकूण ३९ पदांना मान्यता देण्यात आली. या पदासाठी आवश्यक वेतनासाठी दरवर्षी २३२.०१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या खर्चासाठीही मान्यता देण्यात आली. या पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यासही आज मंजुरी देण्यात आली. संस्थेकरिता आवश्यक यंत्रसामग्री, हत्यारे आणि इतर खर्च यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात ११ कोटी ८० लाख १९ हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.


सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121