- ‘कोनगाव-पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती’ची माहिती
03-May-2025
Total Views | 4
मुंबई: ( Kongaon Panvel Mill Workers Complex Unity Committee ) ‘कोन-पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती’च्यावतीने गुरुवार, दि. 1 मे महाराष्ट्र दिन अणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणार्या 11 इमारतींना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत. गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलातील 11 इमारतीना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलाच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्यात आले आहे, अशी माहिती ‘कोनगाव-पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती’ने दिली.
“गिरणगाव आणि गिरणी कामगारांचा इतिहास जपण्यासाठी, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीतील गिरणी कामगारांचे महत्त्वाचे योगदान पुढील भावी पिढीला व्हावे, हा इतिहास जपण्यासाठी कामगार दिनाचे औचित्य साधत हा नामांतर सोहळा केला,” अशी प्रतिक्रिया अध्यक्ष गणेश सुपेकर यांनी दिली.
“आता आमच्या इमारती गिरण्यांच्या नावाने ओळखल्या जातील. यानिमित्ताने पुढच्या पिढीच्या तोंडी ही नावे आणि आपला इतिहास राहणार आहे. इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार, वाचनालय यांनाही येत्या काळात गिरणी, कामगार नेते यांची नावे देण्याचा आमचा मानस आहे,” अशी प्रतिक्रिया कार्याध्यक्ष डॉ. संतोष सावंत यांनी दिली.
“हक्काची घरे मिळावीत, म्हणून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. घरे मिळाल्यानंतरही त्यांची स्थिती, मेंटेनेन्स अशा गोष्टींसाठी आम्ही संघर्ष केला. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला मेंटेनन्स माफीचे आश्वासन दिल्याने आमच्यात आनंदाचे वातावरण आहे,” असे समितीचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष सावंत सांगतात. या कार्यक्रमाला शिवसेना नेते हेमंत खांडेकर, जिल्हाप्रमुख प्रमोद इंगळे, तालुका प्रमुख उदय बहिरा, मनसे नेते योगेश चिले यांची उपस्थिती लाभली.
कशी झाली नावांची निवड?
एकूण 40 ते 65 गिरण्यांची नावे समोर होती. त्यातील एक नाव अनेक गिरण्यांना होते. काही गिरण्यांच्या नावाचा अर्थ एकच होता. काही नावे गिरणी मालकांची होती, अशी नावे यातून वगळण्यात आली. एकूण 15 चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यांपैकी 11 नावे देण्यात आली.
कोणत्या गिरण्यांची नावे?
अपोलो, इंडिया युनायटेड, कोहिनूर, मॉडर्न, स्वदेशी, स्टँडर्ड, श्रीराम, ज्युपिटर, मुंबई, स्वान, गोल्ड मोहर