पोर्ट ब्लेअर :अंदमानच्या सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे, असा महाराष्ट्र शासनाचा मानस असून, त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवार, दि. १६ मे रोजी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉ. चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली.
आशिष शेलार शुक्रवारी सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ज्या काळ कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आले होते, तेथे जाऊन शेलार नतमस्तकही झाले. दरम्यान, त्यांनी या दौऱ्यात अंदमान निकोबारचे मुख्य सचिव चंद्र भूषण कुमार यांची भेट घेऊन सावरकर स्मारकाबाबतची महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली.
ज्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी कारावास भोगला त्या सेल्युलर जेलचा परिसर आणि अंदमान निकोबार या बेटाशी महाराष्ट्रातील तमाम सावरकर प्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात सावरकरांचे उचित स्मारक व्हावे, अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा आहे. यापूर्वी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती पत्र लिहून शेलार यांनी हा विषय केंद्र सरकारकडे मांडला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि संकल्पना अधिक स्पष्टपणे विशद करता यावी, या हेतूने त्यांनी अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांची भेट घेतली.