मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Drone Movement in Samba) दहशतवाद विरोधात ऑपरेशन सिंदूर हेच भारताचे धोरण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांना संबोधताना म्हटले. ऑपरेशन सिंदूरमध्ये दारुण पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानने स्वतः युद्धबंदीची विनंती केली. मात्र 'कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी' ही म्हण पकिस्तानला तंतोतंत लागू होते. कारण युद्धबंदीच्या निर्णयानंतरही पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन होताना दिसते आहे. मंगळवार, दि. १२ मे रोजी पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या दिशेने सोडले. जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने काही वेळातच नष्ट केले.
हे वाचलंत का? : दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ हेच भारताचे धोरण – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मिळालेल्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास, पाकिस्तानने पाठवलेल्या ड्रोनद्वारे जम्मू-काश्मीरमधील सांबा, राजस्थानमधील बारमेर आणि झुनझुनू जिल्ह्यातील चिडवा आणि पिलानी येथे आकाशात ड्रोनच्या हालचाली जाणवल्या. यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून जिल्ह्यात ब्लॅकआउट लागू करण्याचा आदेश जारी केला. पंजाबमधील पठाणकोट आणि जालंधरमध्येही पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी केली. दुसरीकडे, पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात एकाच वेळी ५-७ स्फोटांचे आवाज ऐकू आले. सध्याची परिस्थिती पाहता, पठाणकोट, अमृतसर आणि तरनतारन येथील जिल्हा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
डीजीएमओ चर्चेनंतरही पाकिस्तानमध्ये सुधारणा होत नाही
हे उल्लेखनीय आहे की सोमवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये डीजीएमओ स्तरावरील चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी सीमेवरून आपले सैन्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध कोणतेही शत्रुत्वाचे पाऊल उचलणार नाही. पण, काही तासांतच, पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.