ऑपरेशन सिंदूर – थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेसाठी रवाना
24-May-2025
Total Views |
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर आणि भारताचे दहशतवादाविरुद्धचे धोरण जगासमोर आणण्यासाठी सात शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आली आहेत. याच अनुषंगाने काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ अमेरिकेसह पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात डॉ सरफराज अहमद, शांभवी, जीएम हरीश बालयोगी, शशांक मणी त्रिपाठी, भुवनेश्वर कलिता, तेजस्वी सूर्या आणि मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. अमेरिकेव्यतिरिक्त, हे शिष्टमंडळ गयाना,पनामा, ब्राझील आणि कोलंबियालाही भेट देईल.
शशी थरूर यांनी एक्सवर व्हिडिओसंदेशाद्वारे म्हटले की, भारत दहशतवादाला घाबरत नसल्याचे आम्ही जगाला सांगणार आहोत. भारताचे हे अभियान सत्य बाहेर आणण्यासाठी आणि शांततेसाठी आहे. या मोहिमेद्वारे, आम्ही जगाला हे पटवून देऊ की भारत शांततेच्या मार्गावर आहे आणि दहशतवादाला विरोध करतो. दहशतवादी घटनेबद्दल आमचा अनुभव काय होता आणि आम्ही जे केले ते का केले आणि भविष्यात आमचा दृष्टिकोन असा का असेल हे लोकांना सांगण्यासाठी आम्ही तेथे जात आहोत. भारताचे शिष्टमंडळ वादविवाद करण्यासाठी नव्हे संवाद साधण्यासाठी जात असल्याचेही थरूर यांनी यावेळी नमूद केले आहे.
भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी माध्यमांना सांगितले की, भारताच्या पंतप्रधानांनी आपल्या सर्वांवर एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे की, पाकिस्तानचे दहशतवादास असलेला पाठिंबा जगाला कळावा आणि भारताची भूमिकादेखील समजावून सांगावी. पाकपुरस्कृत दहशतवाद केवळ भारतासाठी धोकादायक नाही तर जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी देखील धोकादायक असल्याचे जगाला सांगण्यात येणार आहे.