अद्भूत योगिनी मंदिर

    09-Mar-2025
Total Views |
article on yogini mandir
 

भारतातील मंदिर स्थापत्य कला ही प्रचंड आधुनिक असून, त्यात भारताने प्राचीन काळापासूनच प्रचंड प्रगती केलेली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये आढळणारी मंदिरे ही अचंबित करणारीच असतात. त्याचे स्थापत्यशास्त्र जेवढे उत्तम तेवढेच त्यातील अध्यात्मिक अनुभूतीदेखील उत्कट असते. भुवनेश्वरजवळ असलेल्या अद्भुत योगिनी मंदिराचा हा मागोवा....

नुकताच आपण जागतिक महिला दिन साजरा केला. जगभरातल्या महिला ज्या सर्व क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती करत आहेत, त्यांचे कौतुक व्हावे आणि समाजामध्ये त्यांना समान न्याय मिळावा, यासाठी हा लढा मागच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उभा राहिला. भारत देशाच्या बाबतीत या स्त्रीतत्वाबद्दल विचार करत असताना, खूप वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी आपल्या समोर येतात. भारतीय उपखंडामध्ये सृजनाचे प्रतीक आणि नवनिर्मितीचे कारण म्हणून, स्त्रीतत्वाचे पूजन अगदी आदिम काळापासून चालू आहे. या स्त्रीदेवतांच्या ओबडधोबड आकारांपासून ते अगदी सुंदर साचेबद्ध मूर्तींपर्यंत, माती, टेराकोटा, मिश्रधातू, दगड, लाकूड, इत्यादी वेगवेगळ्या साहित्यात तयार केलेल्या मूर्ती, भारताच्या विभिन्न भागात झालेल्या उत्खननात सापडल्या आहेत.


दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, भुवनेश्वर आणि इंदोर येथील राज्य संग्रहालये, कोल्हापूर येथील टाऊन हॉल, तेर येथील लामतुरे संग्रहालय, औंध आणि नागपूरमधील राज्य संग्रहालये तसेच, अशा अनेक गावातल्या महत्त्वपूर्ण संग्रहालयांमध्ये हे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. या मूर्तींबरोबरच प्राचीन भारतातील अनेक राजघराण्यांनी, आपल्या अधिकृत नाण्यांवर लक्ष्मी, सरस्वती या स्त्रीदेवतादेखील कोरलेल्या दिसतात. एवढेच नाही, तर महाराष्ट्रातल्या प्राचीन सातवाहन घराण्यामध्ये अनेक राजे आपल्या नावाची सुरुवात, आपल्या आईच्या नावाने करतात. गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र सातकर्णी अशी आपल्या आईचे नाव गौरवणारी काही उदाहरणे आहेत. या प्राचीन आदिशक्तीचा वेध घेताना, एक खूप वेगळा घटक आपल्यासमोर येतो तो म्हणजे 64 योगिनी. भारतामधल्या शैव-शिवाचे उपासक, सौर्य-सूर्याचे उपासक, गाणपत्य-गणपतीचे उपासक, वैष्णव-विष्णुचे उपासक यांच्याबरोबरच असलेला एक महत्त्वाचा सांप्रदाय म्हणजे, शक्तीचे उपासक-शाक्त होय.
 
या 64 योगिनींचे मूळ हे ग्रामदेवता म्हणून ग्रामीण आणि आदिवासी जीवनाशी निगडित असावे, असा अनेक अभ्यासकांचा अंदाज आहे. स्थानिक परंपरांमध्येदेखील, या योगिनींना अत्यंत मानाचे स्थान आहे. स्कंद पुराणात योगिनींचे विस्तृत वर्णन केलेले आढळते. तसेच, महिषासुराचा वध करण्यासाठी योगिनींचे वर्तुळ करून, दुर्गेला युद्धात मदत केली असादेखील उल्लेख येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात सरला दास नावाच्या ओडिशामधील प्रसिद्ध कवयित्रीने ‘चंडीपुराण’ नावाचा काव्यसंग्रह लिहून, या योगिनींची ओळख नव्याने सर्वांना करून दिली. स्थानिक कथांच्या मतानुसार, स्वतः देवीच्या आवाज, घाम, नाभी, कपाळ, गाल, ओठ, कान, पायांची बोटं, हात, ओटीपोट आणि तिला येणारा प्रचंड संताप यातून या योगिनींची निर्मिती झाली, अशी विचारधारा दिसते. देवीभागवतात या 64 देवींची नावेदेखील आलेली आहेत.
 
आज आपण भुवनेश्वरपासून काही किलोमीटर अंतरावरती असलेले, हिरापूर नावाच्या छोट्याशा गावातले, 64 योगिनींना अर्पण केलेले एक अद्भूत मंदिर बघणार आहोत. संपूर्ण गोलाकार असलेल्या मंदिराला वितान म्हणजेच छत हे बांधलेले नाही. मंदिराचा गोलाकार आकार हा खूप वेगळा अर्थ घेऊन आपल्या समोर येतो. काहीच नाही तरीही सर्व आहे असे हे शून्य. काळ, राशी, डोळे आणि सूर्य यांच्याशी जोडला गेलेला हा गोलाकार आणि तो परिपूर्ण आहे. याला अंत नाही आणि याला सुरुवातही नाही. कदाचित म्हणूनच, या महत्त्वाच्या स्त्रीतत्त्वासाठी मंदिर बांधताना हा आकार वापरला गेला असावा. ओडिशामध्ये इसवी सनाच्या दहाव्या शतकात भूमकर राजांकडून सोमवंशी राजांकडे ज्यावेळेला सत्ता गेली, त्यामधल्या कालखंडात या मंदिराची निर्मिती झाली असावी. विस्मृतीत गेलेले हे मंदिर 1953 साली, ओडिशामधील ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ श्री केदारनाथ मोहपात्रा यांनी नव्याने उजेडात आणले. आपल्या देशाचे संसद भवन, याच मंदिराकडून प्रेरणा घेऊन बांधले गेले असावे.

गोलाकार मंदिराच्या समोरच्या बाजूला, आत प्रवेश करण्यासाठी एक छोटेसे द्वार आहे. इथेच दोन्ही बाजूला काळभैरव कोरलेले आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने नऊ देवाकोष्ठ (देव्हारे) असून, त्यात नऊ कात्यायनी कोरलेल्या दिसतात. आत प्रवेश केल्यावर मधोमध चंडी मंडप दिसतो. इथे कधीकाळी शिवाच्या नटराज रूपाची आराधना होत होती. पण, दुर्दैवाने आज ते शिल्प इथे नाही. या मंडपाच्या एका खांबावरती अत्यंत दुर्मीळ अशी एकपाद भैरवाची सुंदर मूर्ती दिसते. याच्या बाजूला इतर भैरव मूर्ती असून, त्यांचे डोळे, बाहेर आलेले सुळे, विकट हास्य, या गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात. याच चंडी मंडपावर तीन योगिनी असून, बाकीच्या 64 योगिनी गोलाकार देवकोष्टांमध्ये विराजमान आहेत. आज तिथे 63 योगिनींच्या मूर्ती असून, 61 क्रमांकाची योगिनी उपलब्ध नाही. यापैकी 19 योगिनी या चार हातांच्या असून, 43 योगिनी या दोन हातांच्या आहेत. यातली सर्वात महत्त्वाची आणि जिचे पूजन केले जाते अशी महामाया योगिनी ही दहा हातांची आहे.

या योगिनींपैकी काही जणींचे चेहरे हे स्त्रियांचे असून, काही जणींचे प्राण्यांचे असलेले दिसतात. या योगिनींमध्ये कासवावरती उभी असलेली यमुना, मकरावरती उभी असलेली गंगा, नरमुंडमाळा धारण केलेली चामुंडा, पाठीमागे आगीचे लोट कोरलेले आहेत, अशी अग्नेयी, ब्रह्मदेवाची शक्ती ब्रम्हाणी, कोंबड्यावरती उभी असलेली कामयानी, इत्यादींचा समावेश आहे. भारतामध्ये ओडिशामधील हिरापूरबरोबरच राणीपूर झरियाल, भेडाघाट, खजुराहो, हिंग्लजगड, काशी, मितवली याठिकाणीदेखील 64 योगिनी मंदिरांची निर्मिती झाली. यापैकी हिरापूरचे मंदिर सर्वात छोटे असून, याचे प्रवेशद्वार आणि भोवतीच्या कात्यायनी इतर मंदिरांमध्ये दिसत नाहीत. या सगळ्या जागांचा आढावा घेतल्यानंतर, मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांमध्ये 64 योगीनींचे किती महत्त्व होते आणि पर्यायाने शाक्त साधक किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रियाशील होते, याचा आपल्याला अंदाज बांधता येतो.

आदिशक्तीच्या या विशिष्ट रूपाला अर्पण केलेली मंदिरे, ही मुख्य वस्तीपासून बरीच लांब बांधलेली दिसतात. या ठिकाणी तांत्रिक विधी चालत होते, याची पुष्टी अनेक ग्रंथांमधून मिळते. यातल्या अनेक मंदिरांमधल्या मूर्ती खूप मोठ्या प्रमाणात नष्ट केलेल्या असल्या, तरीही कोड्यात टाकणारी मंदिरे आजही तेवढ्याच ताकदीने उभी आहेत. आपल्या भविष्यातल्या प्रवसांमध्ये, यातल्या एकातरी मंदिराला नक्की भेट द्या. हजारो वर्षे चालत आलेली देवीपुजेची पद्धत, योगिनीच्या माध्यमातून किती प्रगल्भ आणि वैश्विक रचनेला स्वीकारणारी, व्यक्त करणारी झाली आहे, याची अनुभूति त्या मंदिरात आपल्याला नक्की येईल.


इंद्रनील बंकापुरे
7841934774