ऊर्जा क्षेत्र, पायाभूत सुविधा क्षेत्रांत जोरदार उसळी
05-Mar-2025
Total Views |
मुंबई : भारतीय शेअर बाजाराची (Share Market) गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेली घसरण साखळी बुधवारी अखेर खंडित झाली. ७४० अशांची उसळी घेत अखेरिस बाजाराने ७३ हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टीमध्येही वाढ होत २२,३०० अशांचा टप्पा गाठला. निफ्टीमध्ये बुधवारी २५४ अंशांची वाढ झाली. त्यामुळे बुधवार हा सर्वच गुंतवणुकदारांसाठी दिलासा वार ठरला. प्रामुख्याने ऊर्जा क्षेत्र तसेच पायाभूत सुविधा क्षेत्र या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सनी उसळी घेतली.
अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, अदानी इंटरप्राईजेस ,महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन या महत्वाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. याउलट श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, इंडियन बँक या महत्वाच्या बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे बाजारात आज संमिश्र वातावरण दिसले. क्षेत्रांच्या दृष्टीने विचार केला असता, टेलिकॉम, मिडिया, मेटल, ऊर्जा या क्षेत्रांतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
या सर्व तेजीच्या वातावरणातही जागतिक पातळीवर होणाऱ्या सर्वच घडामोडींचे पडसाद उमटत आहेत. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणुक दारांकडून भारतातील गुंतवणुक काढून घेण्याचा सिलसिला चालूच आहे. जागतिक बाजारात घडणाऱ्या प्रमुख घटना म्हणजे आयातशुल्क वाढीमुळे छेडले गेलेले अप्रत्यक्ष युध्द यांचाही परिणाम शेअर बाजारातील चढ – उतारांवर होत आहे. या अघोषित व्यापारयुध्दाच्या जोडीला घटता रुपया, घसरत्या खनिज तेलांच्या किंमती या सर्वाचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार आहे, असे मत शेअर बाजारातील तज्ज्ञांकडून मांडले जात आहे.