विजयादशमी २०२४ ते विजयादशमी २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताद्बी वर्ष. त्यानिमित्ताने डोंबिवलीतील ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’ने २०२५ या वर्षाची दिनदर्शिका संघ विचारपीठ, संघ व संघ परिवार केंद्रस्थानी ठेवून निर्माण केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झालेल्या अशा या अभिनव उपक्रमाविषयी...
विजयादशमी २०२४ ते विजयादशमी २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताद्बी वर्ष आहे. संघाच्या स्थापनेपासून गेल्या शतकात संघाला उपहास, कडवट टीका वा निषेध, असहमती वा मतभिन्नता, सुधारणा ते ठाम प्रतिपादन आणि अखेर स्वीकार, अशा विविध टप्प्यांतून सामोरे जावे लागले आहे. तीन बंदी काळातून संघविचार तावूनसुलाखून बाहेर पडला आहे. हे सर्व आघात पचवून संघ व संघ परिवार आजपर्यंत नित्य वर्धिष्णु होत गेला आहे.
‘संघमंत्र व शाखातंत्र’ या कार्यपद्धतीच्या माध्यमातून संघात ‘राष्ट्र उभारणीसाठी मनुष्यनिर्माण’ हे कार्य गेली १०० वर्षे सातत्याने सुरू आहे. हे ध्येय कष्टसाध्य व हा मार्ग ‘कंटकाकीर्ण’ आहे, याची जाणीव संघ स्वयंसेवकांना आहे. असे असूनही एकात्म, बलशाली व सुसंघटित हिंदू समाज, समरसतायुक्त व तुच्छतामुक्त हिंदू समाजनिर्मितीचे कार्य व्रतस्थ वृत्तीने संघ स्वयंसेवक करीत आहेत. ‘परं वैभवं नेतुमेतद् स्वराष्ट्रम्’ हे संघाचे ध्येय आहे. अभ्युदय आणि ‘नि:श्रेयस’ यांचा मेळ घालून देशाची प्रगती करणे, हा संघाचा जीवित हेतू आहे. हे हिंदू धर्म, संस्कृती, तत्वज्ञान व जीवनमूल्ये यावर आधारित हिंदूराष्ट्र आहे आणि येथील हिंदू समाज हा या मातृभूमीच्या पुत्ररुप समाज आहे, या विश्वसत्यावर संघाचे काम आधारलेले आहे. परिणामतः संघविचाराने व व्यवहाराने आज समाज व राष्ट्रजीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली आहेत. आज केंद्रातील व अनेक प्रांतांतील राज्यकारभार संघविचाराने प्रेरित झालेल्या मंडळींच्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर संघ विचारपीठातील विविध क्षेत्रांत संघाचे जे योगदान झाले आहे, त्याचे मूल्यमापन व पुढील वाटचालीची दिशा आणि स्वरुप याची उलटसुलट चर्चा होत राहणे स्वाभाविक आहे.
वैचारिक क्षेत्रातील या हालचालींबरोबरच समाजातील सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत संघविचार व व्यवहार नेमकेपणाने पोहोचावा, म्हणूनही व्यापक प्रयत्न, जनजागरण होत राहणे अपरिहार्य आहे. संघविचाराचे व कार्याचे सत्य स्वरुप समाजासमोर ठेवण्याच्या कोणत्याही स्वरुपाच्या प्रयत्नांचे समाज व राष्ट्रहिताच्या दृष्टीने आपण स्वागतच केले पाहिजे. हे प्रयत्न विविध प्रकारचे व विविध पातळ्यांवर होणे स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथील ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’ने २०२५ या वर्षाची दिनदर्शिका संघविचारपीठ, संघ व संघपरिवार केंद्रस्थानी ठेवून निर्माण केली आहे. हे निश्चितच औचित्यपूर्ण व स्वागतार्ह आहे. संस्कारक्षम विद्यार्थी त्यांचे पालक, शिक्षक व एकूण सर्वसामान्य समाजघटकांपर्यंत संघाचे वास्तवदर्शी चित्र उभे करण्याचा या प्रथितयश शिक्षण संस्थेचा उपक्रम केवळ स्तुत्यच नाही, तर अनुकरणीय आहे. या दिनदर्शिकेतील आशयाचा आपण या लेखात परिचय करून घेणार आहोत.
या दिनदर्शिकेत २६ पृष्ठे आहेत. प्रत्येक पृष्ठाच्या पुढील बाजूवर दिनदर्शिका आहे व त्याच्या वरील भागावर विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे आहेत. ही चित्रे आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी काढली असून त्यात डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी व ‘राष्ट्र सेविका समिती’च्या संस्थापिका केळकर मावशी यांची देखणी व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत, तर उरलेल्या पानांत संघ व संघपरिवार यांच्या कार्याची प्रतिकात्मक चित्रे काढली आहेत. त्यामुळे हे प्रत्येक पान अतिशय देखणे व प्रेरणादायी झाले आहे. प्रत्येक पृष्ठाच्या मागील बाजूवर १२ विद्यार्थी व १२ शिक्षक, प्राध्यापकांनी ‘आपले संघ व संघ परिवार’ या विषयावर आपली छोटेखानी, परंतु अभ्यासपूर्ण टिपणे मांडली आहेत. विद्यार्थी इ. सातवी ते प्रथम वर्ष वाणिज्य या अभ्यासगटातील आहेत. प्रत्येक टिपण हे ७५० ते ८०० शब्दांचे आहे. लेखकांनी आपल्याला दिलेल्या विषयांचा भरपूर अभ्यास केला आहे. त्यांनी डोंबिवलीतील संघाच्या ज्येष्ठ व अनुभवी कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून ही टिपणे लिहिली आहेत. विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने माहितीपर विषयांवर लेखन केले आहे, तर शिक्षक-प्राध्यापकांनी या विषयाची तात्विक/वैचारिक बाजू समर्थपणे सांभाळली आहे.
डॉ. हेडगेवार यांच्या मनात बालपणापासून राष्ट्रभक्तीचे बीज कसे रुजले होते, हे अधोरेखित करणार्या तीन आठवणी विद्यार्थ्यांनी फार सुरेखपणे जागविल्या आहेत, तर एका विद्यार्थ्याने त्यांच्या क्रांतिकार्याचा आढावा घेतला आहे. श्रीगुरुजी व सध्याचे सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांची नेटकी व्यक्तिचित्रे चक्क सातवीत शिकणार्या विद्यार्थिनींनी रेखाटली आहेत. भगवा ध्वज, संघाचे उत्सव, संघगीते हे विषय विद्यार्थ्यांनी योग्यरित्या हाताळले आहेत. ‘रा. स्व. संघाची प्रचारक संकल्पना’, ‘दैनंदिन शाखा-व्यक्तिनिर्माणाचे केंद्र’, ‘परदेशातील संघकार्य’, ‘रा. स्व. संघाचे सेवाकार्य’, ‘रा. स्व. संघाची कार्यपद्धती व सद्यस्थिती’ हे तसे आव्हानात्मक व अवघड विषय. पण, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून त्या त्या विषयाची नेटकी मांडणी केली आहे. संघ समजून घेण्याचा व संघ समजावून सांगण्याचे विद्यार्थ्यांनी केलेले हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद व दखलपात्र आहेत.
या उपक्रमातील शिक्षकांचा सहभाग मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. अभ्यासेतर व चौकटीबाहेरच्या विषयांचा अभ्यास करणे हे तसे आव्हानात्मक, पण शिक्षकांनी त्यात मनापासून सहभाग घेतला आहे. त्यांनी प्रामुख्याने संघसंबंधित तात्त्विक व वैचारिक विषयांची मांडणी केली आहे, हे महत्त्वाचे. ’संघ प्रार्थना’, ’रा.स्व.संघ प्रशिक्षण प्रणाली’, ’१९७५ची आणीबाणी आणि संघकार्य’, ‘संघप्रेरणेने चालणार्या संघटना’,‘स्वातंत्र्य लढ्यातील संघाचा सहभाग’, ‘संघ स्वयंसेवकांचे आपत्ती काळातील कार्य’, ‘रा. स्व. संघ-कार्यविभाग व आयाम’ हे विषय शिक्षकांनी नेटकेपणाने शब्दबद्ध केले आहेत. ‘विद्याभारती’, ‘वनवासी कल्याण आश्रम’, ‘राष्ट्र सेविका समिती’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, ‘सहकार भारती’, ‘भारतीय मजदूर संघ’ या संघपरिवारातील संस्था-संघटनांच्या कार्याचाही शिक्षकांनी सटीक परिचय करून दिला आहे. या सर्व लेखकांतील सर्वच विद्यार्थी व शिक्षक इ. संघाशी प्रत्यक्ष संबंधित असतील, असे नाही. तरी त्यांनी वाचन अभ्यास व चर्चा करून आपले लेख सजवले आहे, हे विशेष! हे सर्वजण समाजातील सर्वसामान्य घटकांचे प्रतिनिधित्व करतात, हे महत्त्वाचे.
या शिक्षण संस्थेतर्फे ’तेजस पुरस्कार’ दिला जातो. यंदा तो ‘ज्ञान प्रबोधिनी, पुणे’ या शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. गिरीश बापट यांना डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते देण्यात आला. त्याच समारंभात या उभयतांच्या हस्ते या उत्कृष्ट स्मरणिकेचे विधिवत विमोचन करण्यात आले. समारोपादाखल या दिनदर्शिकेच्या संपादकांनी जे मनोगत व्यक्त केले आहे, ते मला दखलपात्र वाटते. ते म्हणतात, “लेख वाचताना व चित्रे बघताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, यांचे चित्रकार व लेखक हे संघाचे वा संघविचारी, संघटनांचे कार्यकर्ते नाहीत. त्यांनी केलेले अभिव्यक्तीचे प्रकटीकरण हे त्यांना ज्या स्वरुपात संघ समजला, जी प्रतिमा त्यांच्या मनात तयार झाली, त्याचे आहे. त्यामुळे ते यथार्थ असेलच असा आमचा दावा नाही. पण, संघविचार आत्मीयतेने समजून घेण्याचा प्रयत्न करून सकारात्मक दृष्टीने त्यावर चिंतन करून प्रकट केलेले हे लेखन व या कलाकृती आहेत. समाजाला संघाबद्दल काय वाटते हे समजून घेण्याची संधी यातून आपल्याला मिळत आहे.” संपादकांच्या या विश्वासाला मार्ग ठरविणारा हा उपक्रम यशस्वी झाला आहे, असेच या निमित्ताने म्हणावेसे वाटते.
प्रा. श्याम अत्रे