दिल्लीत घडलं तसं मुंबईत पालिका निवडणूकीत होऊ शकतं!
संजय राऊतांचं विधान : महापालिका स्वतंत्र लढण्याचे संकेत
09-Jan-2025
Total Views |
मुंबई : दिल्लीत जसे घडले तसे मुंबईत पालिका निवडणूकीत होऊ शकते, असे विधान संजय राऊतांनी केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा झाली असून दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची माहिती आहे. यावर राऊतांनी प्रतिक्रिया देत मुंबई महापालिका निवडणूका स्वतंत्र लढण्याचे संकते दिले.
संजय राऊत म्हणाले की, "पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दोन्ही इंडीया आघाडीत आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आमच्यासाठी निर्णय घेणे सोपे नाही. आमच्यासाखे असे अनेक पक्ष आहेत ज्यांना आपण कुणाला समर्थन द्यायचे हा निर्णय घेणे अवघड आहे. देशात काँग्रेस मोठा पक्ष आहे आणि दिल्लीत आम आदमी पक्ष मोठा पक्ष आहे, हे आम्ही वारंवार सांगितले. त्यामुळे विशेषत: विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूका लढताना कार्यकर्त्यांचा एक दबाव असतो. परंतू, दिल्लीत आम आदमी पक्ष आणि केजरीवालांची ताकद सर्वात जास्त आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष निवडणूक जिंकणार असे सध्याचे वातावरण आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष इंडीया आघाडीचे सदस्य आहेत. परंतू, केजरीवालांसारख्या नेत्यांना देशद्रोही करणे, तशी मोहीम चालवणे याच्याशी आम्ही सहमत नाही. काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर आम्हाला आनंद झाला असता."
"दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळवू शकेल अशी स्थिती आहे. पण दुर्देवाने महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्लीसारख्या लहान विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आणि ईश्येमुळे या गोष्टी शक्य होत नाहीत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात जे घडले ते उद्या कदाचित मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतदेखील होऊ शकते. कारण शेवटी लहान निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणे महत्वाचे असते," असे ते म्हणाले.
कुणाला पाठींबा द्यायचा हे अद्याप निश्चित नाही!
"दिल्ली विधानसभा निवडणूकीत कुणाला पाठींबा द्यायचा याबाबत अद्याप आम्ही कोणताही निर्णय घेतला नाही. महाराष्ट्रात आणि लोकसभेत आम्ही काँग्रेसोबत आहोत. आम आदमी पक्षसुद्धा आमचा मित्र आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात समन्वय ठेवला पाहिजे. उद्धव ठाकरेंशी आमची चर्चा झाल्यानंतर याबाबत ते निर्णय घेतील," असेही संजय राऊत म्हणाले.