शिवाजी पार्कमधील धुळीबाबत १५ दिवसांत आराखडा तयार करा!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या महापालिकेला सूचना
07-Jan-2025
Total Views |
मुंबई : शिवाजी पार्कमधील धुळीच्या समस्येवर १५ दिवसांत आराखडा तयार करा, अशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिकेला दिल्या आहेत. सोमवार, ६ जानेवारी रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पाहणी दौरा केला.
सिद्धेश कदम म्हणाले की, "शिवाजी पार्कमध्ये लोकांना धुळीचा त्रास होतो. महानगरपालिकेने त्यांना आश्वासने दिली, परंतू, काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मैदानाची पाहणी करण्याचे आणि कारवाई करण्याबाबतचे निवेदन सदा सरवणकर यांनी मला दिले. लहानपणी मीसुद्धा शिवाजी पार्क मैदानात क्रिकेट खेळलो आहे. परंतू, आजची इथली परिस्थिती लहान मुलांसाठी घातक आहे. मागच्या आठवड्यात घसरलेला मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा दर या आठवड्यात बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. पण आज शिवाजी पार्कची परिस्थिती तशी दिसत नाही. यात कुणाचा दोष आहे हे न बघता यावर काय उपाययोजना करता येतील, याकडे लक्ष द्यायला हवे. त्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, स्थानिक रहिवासी, प्रदूषण मंडळाचे अधिकारी आणि सदा सरवणकरजी आम्ही सर्वांनी मिळून प्राथमिक चर्चा केली."
"मागच्या वर्षी मंडळाच्या मार्फत महानगरपालिकेला काही निर्देश देण्यात आले होते. आज एक वर्ष उलटून गेल्यानंतरही यावर काही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे मी आज महापालिकेला शेवटच्या सूचना दिल्या आहेत. हे धुळीचे प्रदूषण १०० टक्के थांबवण्यासाठी काय उपाययोजना करणार याबाबतचा आराखडा पुढच्या १५ दिवसात देण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. या १५ दिवसात काही आराखडा न आल्यास आमच्या अधिकारात कलम ५ अंतर्गत नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करू. आम्ही केवळ महानगर पालिकेवर अवलंबून न राहता मंडळामार्फत उपाययोजना करू. परंतु, ही समस्या सोडवण्यास मुंबई महानगरपालिका सक्षम आहे, अशी मला खात्री आहे. हा जनतेच्या आणि लहान मुलांच्या स्वास्थ्याचा प्रश्न असल्याने याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, "या मैदानावर लाल माती कुणी टाकली, का टाकली यात मी पडणार नाही. पण लाल माती ही कोकणातली माती आहे. ही खेळाच्या मैदानातील माती नाही. खेळाची माती चिकट असते. त्यामुळे आता या मातीत काही रासायनिक पदार्थ मिसळून ती चिकट करू शकतो का? याबाबतचा विचार आम्ही करतो आहोत. ही माती मैदानावर टाकत असताना प्रचंड विरोध करण्यात आला पण तेव्हा कुणी ऐकले नाही. परंतु, ही जागा जनतेची आहे कुणाची खाजगी जागा नाही. त्यामुळे जनतेशी चर्चा करून त्यांना अपेक्षित उपाययोजना आम्ही करू. तसेच यासाठी लागणारा खर्चात कमतरता येणार नाही," असे त्यांनी सांगितले.
शिवाजी पार्कात अतिरिक्त माती टाकल्याने आजूबाजूच्या लोकांना श्वसनाचे त्रास जाणवत आहेत. गेल्या चार वर्षांपासून आम्ही महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदन करत आहोत. इथली अतिरिक्त टाकण्यात आलेली माती काढून टाकावी अशी आमची मागणी आहे. आता कुठेतरी यावर कार्यवाही होत असल्याचे दिसत आहे.
- वैभव रेगे, स्थानिक रहिवाशी
या मैदानात मुले खेळायला येतात. ज्येष्ठ मंडळी फिरायला येतात. इथे लोक आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून येतात. पण इथे उलटे आहे. या मैदानातील धुळीमुळे मुलांमध्ये आणि जेष्ठ मंडळींमध्ये फुफ्फुसाचे आजार निर्माण होत आहेत. इथे लोक तब्येत चांगली करण्यासाठी येत असताना इथे येऊन त्यांची तब्येत बिघडत आहे. गेल्या आठ दहा वर्षांपूर्वी इथे ही समस्या नव्हती. पण वाळूवर माती आणून टाकल्यामुळे धुळीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. निर्णय घेणाऱ्या व्यक्तींकडून वेळ काढू धोरण सुरू असल्याने यावर उपाय होत नाही.