ग्रेग्रोरियन नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या वर्षासोबतच एका नव्या पिढीच्या जन्मालासुद्धा. ही पिढी म्हणजे ‘जनरेशन बीटा किंवा जेन बीटा.’ दि. १ जानेवारी २०२५ रोजीपासून जन्माला आलेली बालके, ‘जेन बीटा’ म्हणून ओळखली जाणार आहेत. पूर्वीच्या काळी ‘मुलगा-वडील-आजोबा-पणजोबा’ अशा नात्यांच्या क्रमावर आधारित पिढ्या ओळखल्या जायच्या. पण, आताच्या काळात एका ठराविक काळात जन्माला आलेल्या पिढ्यांना, त्या काळाच्या वैशिष्ट्यांनुसार काही ठराविक नावे दिली जातात. या नावांना ‘पिढीनामे’ म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
या पिढीनामांना सुरुवात झाली ती १९०१ साली जन्माला आलेल्या पिढीपासून. १९०१ साली जन्मलेल्या पिढीने, पहिल्या महायुद्धाचा संहार पाहिला आणि दुसर्या महायुद्धात सहभाग घेतला. म्हणून १९०१ ते १९२७ या काळात जन्माला आलेली पिढी , त्यांच्या त्याग आणि संघर्षमयी जीवनासाठी ‘द ग्रेटेस्ट जनरेशन’ म्हणून ओळखली जाते. त्यानंतर म्हणजे १९२८ ते १९४५ या काळात जन्मलेली पिढी, द्वितीय विश्वयुद्ध आणि शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात मोठी झाली. या काळात जन्मलेल्या पिढीने धारण केलेल्या काहीशा शांत पावित्र्यामुळे, ही पिढी ‘सायलन्ट जनरेशन’ म्हणून ओळखली जाते. १९४६ ते १९६४ या काळात जन्मलेल्या पिढीचा, जन्मदर आधीच्या पिढ्यांपेक्षा अधिक होता. त्यामुळे या काळातील पिढी ‘बेबी बूम जनरेशन’ म्हणून ओळखली जाते. ‘बेबी बूमर्स जनरेशन’ नंतर, १९६५ ते १९८० या काळात जन्माला आलेली ‘जनरेशन एक्स’ या नावाने ओळखली जाते. या पिढीला ‘एक्स’ हे नाव का पडले, याबद्दल काही ठोस माहिती उपलब्ध नाही. पण, ही पिढी इंग्रजी वर्णमालेतील ‘एक्स’ या नावाने ओळखली गेली. त्यामुळे तिच्या पुढच्या म्हणजे १९८१ ते १९९६ या काळातील आणि १९९७ ते २०१० या काळातील पिढी, अनुक्रमे ‘जनरेशन वाय/मिलेनियल’ आणि ‘जनरेशन झेड’ म्हणून ओळखल्या जातात. २०१० ते २०२४ या काळात जन्माला आलेली पिढी ग्रीक वर्णमालेतील अक्षर ‘अल्फा’ या नावाने, म्हणजेच ‘जनरेशन अल्फा’ म्हणून गेली.
ग्रीक वर्णमालेत ‘अल्फा’ नंतर क्रमाने येणारे दुसरे अक्षर म्हणजे, ‘बीटा.’ त्यामुळे ‘जनरेशन अल्फा’ नंतर २०२५ सालापासून जन्माला येणारी पिढी, ‘जनरेशन बीटा’ म्हणून ओळखली जाणार आहे. ‘जनरेशन बीटा’चा काळ २०२५ ते २०३९ असा असणार आहे. ही पिढीनामे ठरवणारी पूर्वी कोणतीही अधिकृत संस्था नाही. ती काळाच्या ओघात ठरवली गेली. नील होव आणि विल्यम स्ट्रॉस यांनी १९९१ साली लिहिलेल्या ‘जनरेशन्स’ या पुस्तकात, सर्वप्रथम या पिढीनामांचा उल्लेख केला होता. मात्र ‘जेन अल्फा’ या पिढीचे नाव या विषयावर संशोधन करणारे अभ्यासक मार्क मैंक्रिडल यांनी ठरवले आहे. ‘पिढ्या आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या विषयावर त्यांचा अभ्यास सुरू असताना, २०१० सालापासून जन्माला येणार्या पिढीसाठी काय नाव असावे, याचा विचार त्यांची टीम करत होती. त्यावेळी अनेक नावे सुचवली गेली. पण, नव्या पिढीपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात होते, असे मार्क मैंक्रिडल यांचे मत असल्यामुळे, त्यांनी २०१० सालापासून जन्मलेल्या पिढीसाठी शास्त्रीय पद्धतीने पुढे जाऊ शकते, असे ‘जनरेशन अल्फा’ हे नाव निवडले. त्यावरूनच २०२५ सालापासून जन्माला आलेल्या पिढीला, ‘जेन बीटा’ हे नाव मिळाले. यापुढच्या पिढ्या ग्रीक वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसारच ओळखली जाण्याची आणि जगाच्या पाठीवर सर्वत्र ते मान्य होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक पिढी ही तिच्या काळात घडणार्या सामाजिक, नैसर्गिक, राजकीय, वैज्ञानिक, चांगल्या-वाईट बदलांची साक्षीदार असते. ‘जनरेशन बीटा’ ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘वर्च्युअल रिअॅलिटी’ या दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी ओळखली जाणार आहे. तंत्रज्ञानातील होणार्या बदलामुळे या पिढीचे जगणे तर सोईस्कर होईल. पण, त्यांच्यासमोरील आव्हानांमध्येही कमालीची वाढ होईल, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. सोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अधिक आहारी जाऊन नैसर्गिक गुण आणि कलात्मकतेचा या ‘जनरेशन बीटा’ मध्ये अभाव निर्माण होण्याची धोक्याची सूचनाही, शास्त्रज्ञांनी दिलेली आहे. त्यामुळे नव्या वर्षात नव्या पिढीसोबत नवी आव्हानेही जन्माला आलेली आहेत. ‘जनरेशन बीटा’ या आव्हानांना कसे सामोरे जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दिपाली कानसे