धरतरी माता मंदिर, संगमनगर
धरतरी माता... कदाचित यापूर्वी आपण हे नाव कधी ऐकले अथवा वाचलेही नसावे. अनेकांसाठी तर हे नाव नवीनच. पण, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात संगमनगर येथे या ‘धरतरी माते’चे छानसे मंदिर आहे. पालघर रेल्वे स्थानकापासून साधारण 40 ते 45 किमी अंतरावर. मंदिराच्या चहुबाजूंना हिरवीगार झाडी. ‘जनजातींची देवता’ म्हणून धरतरी मातेकडे पाहिले जाते. विक्रमगड तालुक्यातील बहुतांश जनजाती बांधव धरतरी मातेला खूप मानतात, तिची मनोभावे पूजा करतात.
इथं नाचू काय कोठं नाचू धरतरीचे पाठीवर, धरतरी माझी ती माय रं, ना तीला पाय गड्या कसा लावू रं...
हे गीत जनजातींमध्ये सणावाराला गायले जायचे. पण, ‘धरतरी’ म्हणजे नेमके काय? हे अनेकांना ठाऊक नव्हते. त्यामुळे गावातील मधुकर मालकरी आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सकाळी उठल्यावर जमिनीला अर्थात भूमातेला पाय लावण्याअगोदर तिला नमस्कार करण्याची पद्धत जनजातींमध्येसुद्धा पूर्वापार चालत आली आहे. पण, मनुष्य हा एखाद्या मूर्तीसमोर किंवा प्रतिकात्मक गोष्टीसमोर नतमस्तक होतो, हे त्या गावकर्यांनी ओळखले आणि त्यांनी ‘धरतरी’चे मूर्तीरूप तयार करण्याचे ठरवले.
मधुकर मालकरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मंदिर निर्माण करायचे ठरवल्यानंतर सर्वप्रथम पालघर जिल्ह्यातील सर्व भगत मंडळींची भेट घेतली. जनजाती बांधव भगत यांना देव आणि मनुष्य यांच्यातील दुवा मानतात. जिल्ह्यातील अशा एकूण 60 भगतांचे एकत्रीकरण जेव्हा करण्यात आले, तेव्हा ‘धरतरी’ म्हणजे काय, तिचे मूर्तीरूप कसे असावे, याबाबत माहिती जाणून घेतली. प्रत्येक भगताने वेगवेगळी माहिती दिली. त्यानुसार एक चित्र रेखाटले गेले. चित्र जेव्हा दुसर्या बैठकीत पुन्हा भगतांना दाखवण्यात आले, तेव्हा देवीच्या हातात काय हवे, यावरही विचार झाला.
आपल्याला ठाऊक आहे की, मनुष्याचा पंचमहाभूतानुसार आकाश, वायु, पृथ्वीप्रमाणेच अग्नी आणि पाण्याशीसुद्धा संबंध आहे. त्यामुळे धरतरी मातेच्या एका हातात पाण्याचे मडके, दुसर्या हातात अग्नी, तिसर्या हातात कणसरी (नाचणीचे कणीस) आणि चौथा हात आशीर्वाद रुपी तयार केला आहे. पाषाणात साकारलेली ही मूर्ती राजस्थानच्या जयपूर येथील कारागिरांनी तयार केली आहे. जनजातींचे होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी धरतरी मातेचे मंदिर नक्कीच फलदायी ठरेल, असा विश्वास येथील गावकर्यांनी व्यक्त केला आहे.
जनजातींचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे धरतरी मातेचाही शेतीशी संबंध येतो. देवीच्या उत्सवाला ‘आखाती’ म्हणतात. या दिवशी मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. जसे की, आसपासच्या गावातील शेतकर्यांनी आपल्या शेतात पेरलेल्या धनधान्याचे त्यादिवशी परीक्षण केले जाते. म्हणजे यावर्षी कोणत्या पद्धतीचे पीक चांगल्या पद्धतीने येणार आहे? रोगराई येणार आहे का? याचा अंदाज घेतला जातो. नुकतेच 94 गावांपैकी 45 गावातील शेतकरी आपल्या शेतातील माती घेऊन या ‘आखाती’ उत्सवात आले होते. मृतावस्थेत चाललेल्या शेतीला पुन्हा नैसर्गिक शेतीच्या रुपाने जिवंत करण्याचे ध्येय या दिवशी ठरवले गेले. त्यामुळे जनजातींचे नववर्ष म्हणून ‘आखाती’ उत्सवाची विशेष ओळख आहे. ‘धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्था’च्या अंतर्गत आज विविध सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत.
मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शके 1945, दि. 09 जानेवारी 2024 रोजी पालघर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते व अखिल भारतीय वारकरी मंडळ, पालघर जिल्हाध्यक्ष धर्मभूषण ह.भ.प.हरिश्चंद्र महाराज कुवरा यांच्या शुभहस्ते मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला होता. अशाप्रकारे पारंपरिक रुढी, परंपरा आणि इतिहास यांना धरूनच या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.
हिरोबा माझा गो धनाचा देव...
हिरोबा म्हणजेच हिरवा देव. ‘गोधनाचा देव’ याचा अर्थ गायींचा सांभाळ करणारा देव. श्रीकृष्णाशी ज्याचा संबंध येतो असा देव. ज्याप्रमाणे जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरची महालक्ष्मी अनेकांचे कुलदैवत असते, तसेच ‘हिरवा देव’ यास जनजातींचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. वास्तविक तो प्रत्येक कुळाचा वेगवेगळा असतो आणि कुळानुसार तो बांधला जातो. दरवर्षी लाल रंगाचे एक नवीन कापड त्यावर गुंडाळले जाते. यावरून तो किती जुना आहे, हे लक्षात येते. म्हणजेच जितके जास्त लाल कापड, तितका तो अधिक जुना. किती पिढ्यांपासून तो बांधलेला आहे, हे यावरून ओळखता येते. मोठ्या घराचा किंवा कुळाचा एखादा कार्यक्रम असेल तसेच, कुठल्याही शुभकार्याप्रसंगी त्याचे पूजन केले जाते. वर्षभर माळ्यावर तो ठेवलेला असतो. वर्षातून एकदा तो अशा शुभकार्याप्रसंगी खाली उतरवला जातो. यानिमित्ताने नव्या पिढीला त्याचे दर्शन होते. वर चांदीची तोटी, मध्यभागी लावलेल्या फडक्यामध्ये गुंडाळलेली मोरपिसे असे साधारण ‘हिरवा देव’चे स्वरूप असते.
हनुमान मंदिर, आयरे गाव
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक छोटेसे जनजातींचे गाव म्हणजे आयरे गाव. या गावात कर्मयोगी कै. सोनू बाबा नावाचे एक वैद्य (वैदू) होते. पंचक्रोशीतील मंडळी त्यांच्याकडे उपचारासाठी यायची. या गावात एक दगड-मातीचे हनुमानाचे मंदिर होते. ते मोडकळीला आले होते. सोनू बाबांनी आपल्या सहकार्यांच्या साथीने पै अन् पै जमवून गावात हनुमानाचे मंदिर पुन्हा नव्याने निर्माण केले.
हळूहळू या मंदिराची महती सर्वदूर पसरली. हा मारुती इच्छापूर्ती करणारा आहे, अशी माहिती वार्यासारखी आसपासच्या गावात पसरली. सोनूबाबा मंदिराच्या पायरीशी बसून आलेल्या लोकांना औषधे द्यायचे आणि त्यांचा आजार लिलया बराही व्हायचा. कालांतराने गावात जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून एकल विद्यालय सुरु झाले. तेव्हा तरुणांचे शिबीर वर्ग होऊ लागले. त्यामुळे एक चांगले वातावरण या गावात अधिक दृढ होत गेले. कालांतराने सोनू बाबांचे देहावसान झाले. गावच्या तरुणांनी मोडकळीस आलेले मंदिर पुन्हा बांधण्याचा आणि भग्न झालेली मूर्ती बदलून तशाच नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायचा संकल्प केला. एप्रिल 2024 सालच्या दरम्यान केलेला संकल्प आज पूर्ण झाला आहे. ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या सहकार्यातून वर्षभरात उभ्या राहिलेल्या या मंदिरामुळे गावात सुख-शांती नांदू लागल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे.
मयूर आंबेकर यांचे मंदिर निर्मितीच्या कार्यात मोठे योगदान आहे. विदर्भातील काही मंडळींच्या नेतृत्वात मंदिराच्या घुमटाचे काम झाले आहे. अशा या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा दि. 26 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बंगळुरुचे बालयोगी महंत श्रीगणेशदासजी (उदासीन) यांच्या शुभहस्ते हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरात करण्यात आली.
सप्तश्रृंगी मंदिर, बोंडारपाडा
वणी येथे असलेले सप्तश्रृंगी मातेचे मंदिर तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. महाराष्ट्रातील एकमेव मंदिर म्हणून त्याची ओळख आहे. परंतु, वणीनंतर सप्तश्रृंगी मातेचे आणखी एक मंदिर पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात बोंडारपाडा या जनजाती गावात आहे.
दरी-खोर्यात वसलेले हे गाव तसे जव्हारपासून 18 ते 19 किमी अंतरावर. बोंडारपाड्यात देवधर्म मानणारे लोक जास्त. सप्तश्रृंगी मातेचे ते निस्सिम भक्त. त्यामुळे चैत्र महिन्यात गावातील लोक गाड्या करून वणीला देवीच्या दर्शनासाठी जायचे. बोंडारपाडा प्राथमिक शाळेतील शिक्षक दामोदर थाळकर यांनी जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्यांनी गावकर्यांना एकत्रित करून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या पुढ्यात मंदिर उभारण्याची संकल्पना मांडली. गावकर्यांनी सर्वानुमते यास सहमती दर्शवली आणि सप्तश्रृंगीची स्थापना बोंडारपाड्यात करायचे ठरवले. गावरकर्यांच्या श्रमदानातून वर्षभरात मंदिर उभेही राहिले. पूर्वी प्रवासखर्च जास्त व्हायचा. त्यामुळे गावातील ठरावीक लोक वणीला जायचे. मात्र, आता गावातच मंदिर आल्यामुळे सबंध गाव आणि आसपासची गावेसुद्धा याच मंदिरात दर्शनासाठी येऊ लागली आहेत.
दररोज सकाळी 7 व संध्याकाळी 7 वाजता मंदिरात देवीची आरती होते. मंगळवारी जागरणाचा कार्यक्रमही आयोजित केला होतो. ज्याप्रमाणे वणीला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, तसाच इथेही आहे. मंदिराच्या मागील बाजूस नाग्या डोंगर आहे. मंदिरापासून साधारण 200 फूट अंतरावर एक नदी आहे. त्यामुळे हे गावसुद्धा प्रेक्षणीय स्थळ म्हणून उदयास येऊ शकते, असा विश्वास बोंडारपाड्यातील गावकर्यांना आहे. विशेष म्हणजे, गावातील सरपंच रेखा फुफाणे यांनी आपले घर मंदिराच्या आड येत होते म्हणून ते जमीनदोस्त केले. त्या सध्या बाजूला एका लहानशा झोपडीत राहात आहेत.