दिशा

    31-Jan-2025   
Total Views |
Rohit Pawar

‘करून करून भागला, देवपूजेला लागला’ ही म्हण, जणू रोहित पवारांसाठीच तयार झाली असावी. काल-परवा त्याचे प्रत्यंतर आले. सनातन धर्माच्या रुढी, परंपरांवर अत्यंत खालच्या पातळीत विधाने करून झाल्यानंतर, हे महाशय थेट दिसले ते कुंभमेळ्यात! ब्रिगेडींचे शिरोमणी, थोरल्या पवारांच्या नातवाला या पवित्रस्थळी पाहून, अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आयुष्यभर पवारांनी हिंदूंना ‘अंधश्रद्धाळू’ म्हणून हिणवले आणि पुरोगामित्वाची ‘हिरवी’ शाल पांघरली. पुढे त्यांच्या राजकीय वारसदारांनीही तीच री ओढली. विशिष्ट धर्मीयांच्या मत बेगमीकरिता, लांगूलचालनरुपी गालिचे अंथरले. 30-40 वर्षे हे राजकारण चालले खरे, पण ‘एक हैं तो सेफ हैं’चे महत्त्व पटलेल्या हिंदूंनी, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ताकद दाखवून दिली. त्यामुळे बिथरलेल्या रोहित पवारांनी, बहुदा पापक्षालनासाठी महाकुंभात अमृतस्नान केले असावे. त्यांना अशीच सुबुद्धी मिळत राहो!

पण, प्रयागराजला जाण्याआधी त्यांनी आजोबांची परवानगी घेतली होती का? परवानगी घेतलीच असेल, तर आजोबांसह आत्याला सोबत घेऊन का गेले नाहीत? त्यांनी बहुतेक नकार कळवला असेल. कारण, स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवणारा देशातील सर्वात ज्येष्ठ नेता महाकुंभात दिसला, तर पारंपरिक हिरवे आणि ब्रिगेडी मतदार नाराज होतील. असो! आजोबा नाही, पण नातू शहाणा निघाला. त्याने सपत्निक अमृतस्नान केलेच, शिवाय 15 बाटल्या पवित्र जल सोबतही आणले. वर समाजमाध्यमांवर निधड्या छातीने पोस्टही लिहिली, “प्रयागराजमध्ये अमृतस्नानानंतर त्रिवेणी संगमावरील पवित्र जल भरून सोबत घेतलं! मित्रमंडळी, सहकारी, काही नेते आणि लोकप्रतिनिधी यांनाही अमृतस्नान करण्याचं पुण्य मिळावं, या भावनेतून हे जल त्यांना पाठवून देण्याचं प्रयोजन आहे!”

पुरोगामी आजोबांच्या नातवाचा हा बदललेला सूर ब्रिगेडींना मात्र पाहावला नाही. त्यांनी पोस्टवर शाब्दिक हल्ला चढवला. त्रिवेणी संगमातील पाणी प्रयोगशाळेत तपासा अशी मागणी करणार्‍या एका पवारभक्ताने तर, ‘तुझ्या हातात भविष्य देणे म्हणजे मूर्खपणाच!’ अशा शब्दात निषेध नोंदवला. दोन-अडीचशे ब्रिगेडींनी त्यांना ‘अनफॉलो’ केले. तरीदेखील रोहितने पोस्टचा रतीब कायम ठेवला. याचा अर्थ त्याला भविष्यातील राजकीय दिशा कळलेली दिसते!

दशा
‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी गर्जना करीत, शिवसेनेने महाराष्ट्रभर विस्तार केला. बाळासाहेबांनी हा जयघोष प्रत्येक शिवभक्ताच्या मनात रुजवला. त्या जोरावर शिवसेना वाढली. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरेंना मात्र, तो विचार जागवता आला नाही. आधी त्यांनी बाळासाहेबांच्या घोषवाक्यामधील ’हिंदू’ शब्द गाळून टाकला. आता ‘जय भवानी, जय शिवाजी’ हे ब्रीदवाक्यच. मातोश्रीच्या ‘किचन कॅबिनेट’चे सदस्य अंबादास दानवे यांनी, ‘उबाठा’ गटाच्या कर्जतमधील संवाद मेळाव्यात याबाबत अधिकृत भाष्य केले. जुना काळ गेला, ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणून मत मिळवायचे दिवस गेले, असा सूर त्यांनी आळवला. पक्ष प्रमुखाने सांगितल्याशिवाय दानवेंसारखा माणूस जाहीरपणे अशी भूमिका मांडतो, हे हास्यास्पद. किती ते लांगूलचालन?बाळासाहेबांचा पूत्र म्हणून उद्धवरावांनी मानसन्मान पदरात पाडून घेतला खरा; पण त्यांना तो फारकाळ टिकवता आला नाही. ‘किचन कॅबिनेट’च्या नादाला लागून त्यांनी, बाळासाहेबांच्या विराचांना तिलांजली दिली. असंगाशी संग केला आणि पायावर धोंडा मारून घेतला. तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ‘हिरव्या’ मतांना खुश करण्यासाठी त्यांनी, ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा बंद करण्याचे सूचित केले. अंबादास दानवेंनी हे विधान केले असले, तरी त्यामागे उद्धव ठाकरेच आहेत, हे कळायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. विरोधक कितीही टीका करीत असले, तरी आपल्या पक्षप्रमुखांनी हिंदुत्व सोडलेले नाही अशी भाभडी आशा बाळगून असलेल्या शिवसैनिकांचा मात्र, यामुळे पुरता भ्रमनिरास झालाय. काहींनी नाराजीही व्यक्त केली. पण, त्यांचे ऐकणार कोण? ’हिंदुहृदयसम्राट’ हयात असते, तर सुपुत्राच्या या कुकर्मांसाठी कानाखाली जाळच काढला असता.

दाढ्या कुरवाळल्या की हमखास मते मिळतात, या भ्रमाचा भोपळा विधानसभेलाचा फुटला, आता पालिका निवडणुकीत दुहेरी दणका बसेल. उद्घव ठाकरे अजून शहाणे झाले नसले, तरी माजी नगरसेवकांनी त्यापासून पुरता धडा घेतलाय. म्हणूनच एकेक करून ते ‘कुस’ बदलताना दिसतात. आतापर्यंत 47 जणांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे, उरले 45. त्यातील निम्मे पुढच्या दोन-तीन महिन्यांत पक्षांतर करतील. मग जळतं घर भाड्याने कोण घेणार?, याचा विचार उद्धवरावांनी करावा!

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.