आज ‘जागतिक ब्रेल लिपी’ दिवस. वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षी लुई ब्रेल यांना अपघाती अंधत्व आले. डोळ्यांनी दिसत नसले तरीही स्पर्शज्ञान अतिशय तीव्र असते, याची जाणीव त्यांना होती. याच स्पर्शज्ञानाच्या मदतीने त्यांनी ब्रेल लिपी विकसित केली. त्यांनी तयार केलेल्या या लिपीमुळे जगभरातील अंध व्यक्तींच्या वाटा प्रकाशमान झाल्या. या लिपीमुळे त्यांना लिहिता, वाचता येणे शक्य झाले. लुई ब्रेल यांचा संघर्षावर मात करून आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करत इतरांना प्रेरणा देण्याचा वारसा पुढे चालविणार्या अनेक अंध व्यक्ती आहेत. त्यांना ‘लुई ब्रेल यांचे वंशज’ म्हटले, तरी ते वावगे ठरणार नाही. साहित्य आणि कला क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमटविणार्या लुई ब्रेल यांच्या अशाच काही उल्लेखनीय कामगिरी करणार्या मराठमोळ्या वंशजांचे हे मनोगत...
दृष्टीपल्याडची संगीतसृष्टी...
मला अगदी लहानपणापासूनच संगीताची खूप आवड होती. वयाच्या पाचव्या ते सहाव्या वर्षी मी तबला वाजवायला शिकले. आता मला जवळपास 85 ते 86 तालवाद्ये वाजवता येतात. सुदैवाने मला खूप चांगले गुरू लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी संगीत शिकू लागले. सुरुवातीला काही अडचणी यायच्या. नाद समजून घेणे आणि बोटांचे तंत्र आत्मसात करणे या दोन्ही गोष्टी कोणतेही वाद्य वाजवताना खूप महत्त्वाच्या असतात. नाद निर्माण करताना बोटांचा चुकीचा वापर केला, तर इजा होण्याची शक्यता असायची. पण, नंतर बोटांचे तंत्र पण मी आत्मसात करत गेले. 2012 साली मी संगीत शिकवायला सुरुवात केली. अस्मिता विद्यालय, जोगेश्वरी आणि श्री गोविंद बालमंदिर, अंधेरी या मुंबईतील दोन विद्यालयांमध्ये मी संगीत शिकवते. अंध मुलांना शिकवणे मला थोडे सोपे गेले. कारण, मी स्वतः अंध असल्यामुळे त्यांच्या अडचणी, त्यांच्या समोरील आव्हाने मी समजून घेऊ शकत होते. पण, अंध नसणार्या मुलांना शिकवताना मला थोडे कठीण जाते. अशा वेळी मला माझे सहकारी शिक्षक मदत करतात.
संगीत, अभिनय ही माझी आवड आहेच, पण मी इतिहास हा विषय घेऊन माझे ‘एम.ए.’ पूर्ण केलेले आहे. लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त मला हे सांगावेसे वाटते की, ब्रेल लिपीमुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकले. ब्रेल लिपी ही अंध व्यक्तींसाठी खूप महत्त्वाची आहे. सोबतच माझ्या घरच्यांनी मला माझ्या प्रवासात खूप मदत केली. त्यांच्यामुळेच आज मी जे काही करत आहे, ते करू शकले.
योगिता तांबे, संगीत वादक, संगीत शिक्षिका
शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले...
मला पत्रकारितेत करिअर करायची खूप इच्छा होती. त्यासाठी मी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत ‘एम.ए.’चे शिक्षण घेतले. शिक्षण घेणे तुलनेने सोपे होते, पण या क्षेत्रात नोकरी मिळवणे तसे अवघडच. अंधत्वामुळे मला या क्षेत्रात नोकरी मिळवणे अवघड गेले. त्यामुळे प्रत्यक्ष पत्रकारिता करता आली नाही, पण माझे लिखाण सुरूच होते. मी लिहित असल्यामुळे माझ्या लिखाणाची नोंद बर्याच लोकांनी घ्यायला सुरू केली होती. ‘संपर्क’ नावाची संस्था चालवणार्या आणि ‘नवी उमेद’ नावाचे फेसबुकवर एक पेज चालवणार्या मेधा कुलकर्णी यांनी मला लिहिण्याची एक संधी दिली. एक अंध मुलगी म्हणून माझे बालपण कसे गेले आणि अंध आई म्हणून मी माझ्या लहान डोळस मुलाला कशी सांभाळते, अशा दोन बाजू घेऊन मी त्या पेजसाठी 17 भागांची एक मालिका लिहिली. ‘पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं’ या शीर्षकाखाली मी ते लिखाण केले. त्यानंतर मला लिहिण्यासाठी अनेक संधी मिळत गेल्या. ‘कोविड’ काळात एका दैनिकात एक सदर लिहायची संधी मला मिळाली. जवळपास वर्षभर मी ते सदर लिहिले. देशभरातील 52 अंध व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांचे रोजचे जगणे कसे असते, त्यांचा संघर्ष आणि त्यांनी त्या संघर्षावर केलेली मात अशा गोष्टींवर आधारित ते सदर होते. त्याच सदरावर आधारित माझे ‘कवडसे’ हे पुस्तक प्रकाशित झाले. आशुतोष जावडेकरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले. दिग्दर्शिका सई परांजपे यांनी त्याला प्रस्तावना आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुजा संखे, लेखिका
रंग माझा वेगळा...
2010 साली मी माझे ‘संगीत विशारद’ पूर्ण केले. साहित्यातही मला तितकाच रस आहे. अनेकांचे साहित्य मी ऐकतो आणि वेळोवेळी मी ते माझ्या निवेदनाच्या माध्यमातून मांडतो. मी एक निवेदक आहे आणि सोबत आयोजकही आहे. कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यापेक्षा मला कार्यक्रम आयोजित करायला अधिक आवडतात. त्यामुळे अनेकांना आपले विचार, आपली कला सादर करायची संधी मिळते. शालेय जीवनापासूनच मला कार्यक्रमांची खूप आवड होती. आमच्या शाळेत खूप कार्यक्रम आयोजित केले जायचे. त्यावेळी आमच्या शाळेत वर्गावर्गामध्ये वर्ग सांभाळण्यासाठी विद्यार्थ्यांची मंत्रिमंडळे स्थापन केली जायची. त्यावेळी मी सांस्कृतिक मंत्री असायचो. त्यामुळे तेव्हापासूनच कार्यक्रम आयोजित करायची खूप आवड होती आणि त्यात मग भर पडत गेली. अलिबाग येथे पार पडलेला ‘अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह’ मी खूप जवळून पाहिला. त्या सप्ताहात रघुनाथ बारड सरांचे भाषण झाले होते. त्यांच्या भाषणाने मी खूप प्रभावित झालो आणि इतरांना संधी मिळवून देण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असे मला वाटले आणि मी कार्यक्रम आयोजित करू लागलो. मी आजवर अनेक कवितांचे, संगीताचे आणि इतरही कार्यक्रम आयोजित केले आहेत. मी त्या कार्यक्रमांमध्ये निवेदन करतो. मला एक गोष्ट सांगायला खूप आवडते की, मी अशाच व्यासपीठांवर निवेदन करायला उभा राहतो, जे व्यासपीठ उभे करण्यासाठी मी स्वतः मेहनत घेतलेली आहे.
ज्ञानेश्वर आहेरकर, निवेदक, आयोजक
दिपाली कानसे