दिल्लीत ‘वीर सावरकर महाविद्यालया’चे पंतप्रधान करणार भूमीपूजन

    02-Jan-2025
Total Views |

PM MODI 
 
नवी दिल्ली : (PM Narendra Modi) देशाची राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी दिल्ली विद्यापीठाच्या ‘वीर सावरकर महाविद्यालया’चे भूमीपूजन करणार आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील विविध विकासकामांची पायाभरणी आणि उदघाटन करणार आहेत. त्यामध्ये दिल्ली विद्यापीठात ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन नवीन प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यात पूर्व दिल्लीतील सूरजमल विहार येथील पूर्वेकडील आवारातील (ईस्टर्न कॅम्पस) शैक्षणिक वसाहती आणि द्वारका येथील पश्चिमेकडील आवारातील(वेस्टर्न कॅम्पस) शैक्षणिक वसाहतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रोशनपुरा नजफगढ येथे वीर सावरकर महाविद्यालयाचीही पायाभरणीदेखील करण्यात येणार आहे.
 
याविषयी बोलताना दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली विद्यापीठाच्या ईस्टर्न आणि वेस्टर्न कॅम्पससह नजफगढ येथे वीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणी होणार आहे. याद्वारे शिक्षणाचा विस्तार होणार असूव दर्जेदार शिक्षण कमी दरात प्राप्त होणार आहे. येत्या दीड ते दोन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. याद्वारे दिल्ली विद्यापीठाचे कॅम्पस चारही दिशांना असतील, असेही सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.
 
मोदी सरकारची भूमिका स्पष्ट
 
स्वातंत्र्यवीर सावकरांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना वेळोवेळी स्पष्ट केल्या आहेत. एकीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीरांवर सातत्याने अश्लाघ्य आरोप करत आहेत, त्याचवेळी मोदी सरकारने सावरकरांचा सन्मान करण्याची भूमिका अतिशय ठामपणे घेतली आहे. आतादेखील देशाच्या राजधानीमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयास सावरकरांचे नाव देऊन मोदी सरकारने आपली वैचारिक भूमिका ठाम असल्याचे दाखवून दिले आहे.