"उबाठा"मध्ये बंडाळीचे सुर; कृपाशंकर-अमरजित सिंह यांच्यामुळे भाजपची ताकद वाढली
03-Sep-2024
Total Views |
कलिना हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेना अखंड असताना संजय पोतनीस दोनवेळा येथून निवडून आले. परंतु, पक्षफुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पूर्णतः बदलली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत पराभूत झालेले विनायक राऊत 'उबाठा' गटाकडून इच्छुक असल्यामुळे पोतनीसांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे कृपाशंकर सिंह आणि अमरजित सिंह यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची मोठी ताकद या परिसरात असल्यामुळे भाजपला या मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे.
मराठी, उत्तर भारतीय, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा संमिश्र वस्तीचा हा भाग. त्यामुळे कलिना विधानसभेत निवडून येण्यासाठी सामाजिक संतुलन राखणं महत्त्वाचं ठरतं. २००८ मध्ये सांताक्रुझ मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर कलिना मतदारसंघ अस्तित्त्वात आला. पहिल्या वर्षी २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत त्यांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रमुख लढाई झाली. त्यात अवघ्या एक हजार मतांच्या फरकानं संजय पोतनीस विजयी झाले. भाजपच्या अमरजित सिंह यांना पराभव सहन करावा लागला असला, तरी त्यांनी घेतलेली मेहनत भविष्यासाठी फायदेशीर ठरली. २०१९ मध्ये युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे संजय पोतनीस यांना दुसऱ्यांदा लॉटरी लागली. परंतु, शिवसेनेतील फुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पूर्णतः बदलली आहेत.
पोतनीस उद्धव ठाकरेंसोबत राहिले असले, तरी जनमत त्यांच्यासोबत नाही, अशी आजची स्थिती आहे. अॅण्टी-इन्कम्बन्सीचा मोठा फटका यावेळेस त्यांना सहन करावा लागेल, असा सर्वेक्षणांचा अंदाज आहे. ते जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांनी कलिना परिसर स्वच्छ करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज दोन टर्म पूर्ण होत आल्या, तरी अद्याप आश्वासनपूर्ती झालेली नाही. आमदार मतदारसंघात फिरकत नाहीत, अशी इथल्या मतदारांची प्रमुख तक्रार आहे. नगरसेवक नसल्यामुळे गटारांपासून, शौचालये आणि गल्ली बोळातल्या बारीकसारीक कामांसाठी आमदाराला जाब विचारण्याचे प्रमाण मुंबईत वाढलं आहे. अशावेळी अन्य आमदार सतर्क असताना, संजय पोतनीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
मिठी नदीची स्वच्छता, हा इथला ज्वलंत विषय. गेल्या २५ वर्षांत मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी पालिकेचा जितका पैसा खर्च झाला, त्या पैशांत एखादा देश विकत घेता आला असता, असं इथले रहिवासी नाराजीच्या स्वरात सांगतात. दरवर्षी मिठी स्वच्छ होईल असं आश्वासन दिलं जातं. बक्कळ निधी मंजूर होतो. प्रत्यक्षात पहिले पाढे पंचावन्न. अस्वच्छ मिठी नदीमुळे इथल्या नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागतो. साथरोगांमुळे मृत्यू झाल्याच्या दीड हजारांहून अधिक घटना या परिसरात गेल्या १० वर्षांत घडल्या आहेत.
पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींकडे आमदार महोदयांनी कधीच लक्ष दिलं नाही, अशी स्थानिकांची नाराजी. उन्हाळ्यातही गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावदेवी आणि इंदिरानगरमधील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पोतनीसांना १० वर्षांत सोडवता आलेला नाही. पावसाळ्यात इथल्या अनेक लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरते. त्यावर उपाय म्हणून गटार रुंद केले असले, तरी नालेसफाई होत नसल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नाही. त्यामुळे पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन रहावं लागतं.
मुंबई शहरातल्या गिरण्या बंद झाल्यानंतर बहुतांश गिरणी कामगार या भागात स्थलांतरीत झाले. दहा बाय दहाच्या लहान खोल्यांमध्ये कसंबसं जीवन व्यतित करणारा हा कामगार आणि त्याची पुढची पिढी गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्विकासासाठी धडपड करीत आहे. पण, आमदार या प्रश्नाबाबत गंभीर नसल्यामुळे पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. मिठीलगतच्या झोपडपट्ट्यांसह संदेशनगर आणि क्रांतीनगरमधील अनेकांना पुनर्वसनात घर देण्याचं आश्वासन देऊन मूळ घर ताब्यात घेण्यात आलं. परंतु, नवं घर अद्याप मिळालेलं नसल्यामुळे त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संजय पोतनीसांविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येतो.
विलेपार्ले, वांद्रे, कुर्ला अशा विस्तीर्ण सीमा असलेल्या कलिना मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला दिसतो. व्ही. एन. देसाई हॉस्पिटल वगळता एकही मोठं सरकारी रुग्णालय इकडे नाही. त्यामुळे स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. व्ही. एन. देसाई रुग्णालयातही उपचार आणि अन्य सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं नाराजीचा सूर आहे. त्यामुळे या भागात एखादं अद्ययावत रुग्णालय सुरू करावं, अशी स्थानिकांची मागणी आहे.
नागरी समस्यांइतकीच राजकीय आव्हानं मोठी
संजय पोतनीस यांच्यासमोर केवळ नागरी समस्यांचीच आव्हानं नाहीत, तर पक्षांतर्गत इच्छुकांना थोपवण्याचंही मोठं आव्हान आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणेंकडून पराभव झाल्यानंतर विनायक राऊत कलिना विधानसभेत सक्रीय झाले आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत. त्यांचं निवासस्थान आणि शैक्षणिक संस्थाही या परिसरात आहे. उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले असल्यामुळे पोतनीस यांच्याऐवजी यंदा राऊतांना संधी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, २०१४ मध्ये झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप पूर्ण क्षमतेने मैदानात उतरली आहे. त्यांच्याकडून कोणाला संधी मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी कृपाशंकर सिंह आणि अमरजीत सिंह यांचं बळ भाजपच्या विजयाची वाट सुकर करेल, अशी शक्यता आहे.