कांद्याला मिळतोय यंदाचा उच्चांकी दर !

 क्विंटलला ५ हजार रुपयांपर्यंतचा भाव;अखेरच्या टप्प्यात शेतकरी मालामाल

    26-Sep-2024
Total Views |

onion
 
 
नाशिक : हंगामाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात उन्हाळी कांद्याची दरवाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. सध्या मिळणारा हा दर यंदाचा सर्वात उच्चांकी असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये क्विंटलचे दर पाच हजार रुपयांच्या पुढे गेले असून, कांदा साठवणूक केलेले शेतकरी मालामाल झाले आहेत. त्यातच मागील आठवड्यात केंद्र सरकारकडून किमान निर्यात मुल्य रद्द आणि निर्यात शुल्क निम्म्याने घटविण्याचा निर्णय घेतल्याने कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे हजारो टन कांदा परदेशवारीवर जाण्यास तयार झाला. याचा थेट फायदा कांदा उत्पादक शेतकर्‍यांना झाला आहे.
 
त्याचप्रमाणे, दिवाळीच्या आसपास लाल कांदा बाजारात दाखल होणार आहे. या कांद्यालादेखील असाच उच्चांकी दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजारात २ हजार ५०० क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ५ हजार १८० इतका दर मिळाला. तर लहान आकाराच्या कांद्याला ४ हजार ३०१ इतका दर मिळाला. त्याचप्रमाणे, कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०० वाहनांची नोंद झाली असून, ४ हजार ९६८, देवळा येथील खासगी बाजार समितीमध्ये सर्वाधिक ५ हजार २५० रुपये इतका दर मिळाला. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सायखेडा उपबजारात ५ हजार रुपये, चांदवड बाजारसमिती ४ हजार ८८० आणि नांदगाव बाजार समितीमध्ये १६९ वाहनांचा लिलाव होऊन ४ हजार ६८० इतका दर मिळाला.

अनेक शेतकर्‍यांकडे अजूनही उन्हाळी कांदा उपलब्ध
साधारणपणे जुलै अखेरपर्यंत कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडील उन्हाळी कांदा संपलेला असतो. मात्र, संपूर्ण हंगामात कांद्याचे दर कमी-अधिक असल्याने साठवलेला कांदा शेतकरी वर्गाकडून विक्रीसाठी बाहेर काढला नाही. त्यामुळे लाल कांद्याचा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावरदेखील बर्‍याचशा कांदा उत्पादक शेतकरी वर्गाकडे अजूनही उन्हाळी कांदा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.