सामाजिक ‘विणे’चा मधूर झंकार

    26-Sep-2024
Total Views |
 
Pune Exibition
 
पुण्यात आजपासून एक अनोखे प्रदर्शन सुरू होत आहे. या प्रदर्शनात सामाजिक संस्थांना मदत केली जाते. त्यानिमित्ताने ज्यांनी ही संकल्पना यशस्वी केली, त्या वीणा गोखले यांच्याविषयी...
 
पुण्यातील वीणा गोखले यांचा संघर्ष सर्वार्थाने मन हेलावून टाकणारा. ‘आहारशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर पदवी घेऊन वीणा यांनी ‘एमएससी’ केले. पुढे दिलीप गोखले यांच्याशी विवाहानंतर त्यांना जुळ्या मुली झाल्या. सावनी आणि पूर्वी यांचा सांभाळ करीत असतानाच, पूर्वीच्या आयुष्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या. त्या संकटावर मात करताना वीणा यांच्या सामाजिक जाणीवाही प्रगल्भ झाल्या. गतिमंद असलेल्या आपल्या लेकीच्या आरोग्यावर होणारा खर्च, तिचा सांभाळ करताना होणार्‍या वेदनांमधूनच वीणा यांचे समाजभान जागृत होत गेले. काही सामाजिक संस्थांशी त्यांचा अगदी संबंध आला. समाजात कितीतरी चांगल्या संस्था अव्याहत सर्वोत्तम कामे करीत असल्याची प्रगल्भ जाणीव त्यांना झाली. या संस्थांसाठी कार्य करण्याची आपले पती दिलीप गोखले यांची संकल्पना अंमलात आणण्याचा वीणाताईंनी धाडसी निर्णय घेतला आणि मग काय, त्या या समाजकार्यात त्यांनी स्वत:ला अक्षरश: झोकून दिले.
 
नकारात्मकता निर्माण करणारे प्रसंग पावलोपावली आव्हान देत असताना, जीवनात सकारात्मक कसे राहायचे, हे शिकायला लावणार्‍या वीणा गोखले यांच्या आयुष्याचा प्रवास समजून घेतला, तर नैराश्यात वावरणार्‍या कित्येकांसाठी त्या आदर्श ठरू शकतील, एवढी ताकद त्यांच्या कार्यात आहे.
 
सामाजिक संस्थांना केवळ निधीच नव्हे, तर आवश्यक कौशल्ये, मानवी बळ, अन्य संसाधनेदेखील उपलब्ध करुन देण्याचे कार्य वीणाताई परोपकाराच्या भावाने करीत आहेत. वीणा यांनी आपले पती दिलीप गोखले यांच्या संकल्पनेतून ही कामगिरी साकारली आणि मदतीचे हजारो हात पुढे येत असल्याचे त्या सांगतात.
 
‘देणे समाजाचा’ हा उपक्रम पुण्यातील ’आर्टिस्ट्री’ संस्थेतर्फे २००५ सालापासून पितृपक्षात समाजऋण फेडण्यासाठी आयोजित केला जातो. जवळपास पावणेतीनशे संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या असून, किमान १५ कोटी रुपयांच्या निधीची भरीव मदत सेवाभावी संस्थांना वीणाताईंनी आजवर मिळवून दिली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रदर्शनात सहभागी होणार्‍या संस्थांकडून वीणाताई कोणतीही शुल्क आकारणी करीत नाहीत. तसेच, हे कोणत्याही खरेदी-विक्रीचे देखील प्रदर्शन नसते. हे प्रदर्शन बघायला येणारा एखादा शाळकरी मुलगादेखील प्रेरित होतो आणि या संस्थांचे कार्य बघून आपल्या सिटी बस प्रवासाचे अवघे ३० रूपये उत्स्फूर्तपणे देणगी देऊन जातो. हे काम बघून सामान्य घरातील महिला आपल्या छोट्या कर्जाचा हप्ता थकित ठेवून या संस्थांना ५०० रुपये का असे ना, देणगी देतात, हे वीणाताईंच्या कार्याचे यश म्हणावे लागेल. देशभरात असे प्रदर्शन कुठेच भरत नाही. असा हा भव्य उपक्रम व्रतस्थपणे राबविला जातो. देणगीदार आणि सामाजिक संस्था, यामध्ये एक विश्वासार्ह दुवा ठरलेल्या ’देणे समाजाचे’ या उपक्रमाला यथाशक्ती मदतीचे विनम्र आवाहन वीणा गोखले करतात.
 
पण, या सगळ्यात आक्रित घडले. एका प्रदर्शनाला अवघे १५ दिवस उरले असताना वीणाताईंचे पती दिलीप गोखले हे जग सोडून गेले आणि त्यांना आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागले. मात्र, तरीही वीणाताई डगमगल्या नाहीत. ते प्रदर्शन त्यांनी भरविले आणि त्या प्रदर्शनाला पुणेकरांनी अमाप प्रतिसाद दिला. पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांच्या गिरीसागर टुर्सची तयारी सुरू असताना, एकेदिवशी त्यांची आजारी लेकही एकाएकी देवाघरी गेली. तरीही, वीणाताईंनी दोन दिवसांत ही गुहागरची सहल यशस्वी करून दाखविली. त्यावेळी सहलीतील कुणालाही कल्पना नव्हती की, वीणाताईंनी आपली लेक कायमची गमावली आहे.
वीणाताईंचे असे हे अनोखे प्रदर्शन पाहायला येणार्‍यांमध्ये दातृत्वाची प्रामाणिक भावना आपसूकच प्रसवते. यामुळे अनेक संस्था पुनरुज्जीवित झाल्या, काही संस्थांचे निधीअभावी खोळंबलेले प्रकल्प मार्गी लागले, अनेक कार्यकर्ते संस्थांना मिळाले आणि अशीच अनेकविध कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्ती या सामाजिक संस्थांशी कायमस्वरुपी जोडल्या गेल्या. मागील पाच वर्षांपासून वीणाताई मुंबईमध्ये आणि तीन वर्षांपासून ठाण्यात या उपक्रमाचे आयोजन करीत आहेत. यामुळे त्यांना जो पुणे, मुंबई आणि ठाणेकरांनी प्रतिसाद दिला, त्यांच्या दातृत्वाला त्यांनी मनापासून सलाम असल्याची भावना व्यक्त केली. अशा या अत्यंत समाजोपयोगी उपक्रमावर ‘क्राऊडफंडिंग’च्या माध्यमातून लघुपट देखील आता साकारला आहे.
 
वीणा गोखले यांची ‘गिरीसागर टुर्स’ ही स्वतःची पर्यटन कंपनी. मागील २७ वर्षांपासून त्या ‘गिरीसागर टुर्स’तर्फे, ‘स्वरांबरोबर विहार’ ही अनोखी पर्यटन संकल्पना राबवित आहेत. त्याबरोबरीनेच श्रीलंका, मॉरिशस, बाली, दुबई या परदेशी सहलीही त्यांनी यशस्वीरित्या आयोजित करतात.
 
वीणाताईंच्या या कार्याबद्दल त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरवदेखील करण्यात आला आहे. ‘बाबा आमटे सेवा स्मृती पुरस्कार’, ‘रोटरी क्लब-पुणे वेस्ट साईड’ चा ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’, ‘लायन्स क्लब’चा डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ‘सेवाव्रती पुरस्कार’, ‘स्नेहालय’ संस्थेचा ‘स्नेहधार गौरव पुरस्कार’, ‘लायन्स क्लब ऑफ पुणे इलाइट’चा ‘स्वयंसिद्धा पुरस्कार’, तसेच ‘पुष्पलता रानडे संघर्ष साहस-राष्ट्रीय पुरस्कारा’ने देखील त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरूण भारत’ कडून शुभेच्छा!
 
लेखक - अतुल तांदळीकर