माणसातील पशुवृत्तीच्या उच्चाटनासाठी गरज मूल्याधिष्ठित शिक्षणाची!

    31-Aug-2024
Total Views |
education changes for better society


आपल्याला यांसारख्या घटनांवर खरोखर मात करायची असेल तर शिक्षणावर अधिक विसंबून राहावे लागणार आहे. त्यासाठी शिक्षणातील मूल्यांची पेरणी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर त्यातून जो बदल करायला हवा आहे तो कोणता आहे? तर माणसांनी अधिक मूल्याधिष्ठितेची वाट चालण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बदलापूर या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची विदारक घटना समोर आली. त्यानंतर राज्यभर मोठ्या प्रमाणात खळबळ माजली. ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले, त्या मुलीचे वय अत्यंत कमी होते. त्यामुळे समाजमनातून तीव्र संताप व्यक्त झाला. त्यातून आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पोहोचले. सामान्य माणसांच्या मनातही या घटनेबद्दल तीव्र संताप होता. अर्थात, कोणीही सुज्ञ नागरिक संताप व्यक्त करणारच. खरेतर, बालकांसाठी घरापलीकडे सुरक्षिततेचे दुसरे ठिकाण माहीत नाही. अशावेळी एखादी बालिका शाळेत येते तेव्हा शाळा ही तिला आपले घर वाटावे, या दृष्टीने तिच्याशी व्यवहार करण्याची गरज असते. शेवटी, घरात आणि घरातील माणसांवर जितका विश्वास व्यक्त होतो, तितकाच विश्वास शाळेतही प्रतिबिंबित व्हायला हवा. त्यासाठी शाळांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. घरानंतर बालकांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे शाळा असते.

आता या शाळाच विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित बनू लागल्या, तर समाजाने कोणावर विश्वास ठेवायचा? हा प्रश्न आहे. या घटनेनंतर मुलींना सुरक्षेचे धडे दिले जावे, असा विचारही पुढे येतो आहे. पण, सुरक्षेचे धडे देऊन हा प्रश्न सुटणार आहे का, हा मूळ प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो. आजच्या आपल्या भोवतालमध्ये असलेल्या गर्दीचा समाज होणार की नाही, हाच खरा प्रश्न. समाज हा नेहमी एकमेकाला आधारभूत वाटायला हवा असतो. प्रत्येक माणसाबद्दल तेथे विश्वास वाटत असतो. त्या समाजाबद्दल विश्वास वाटला, तरच प्रगतीचे पंख लेवून झेप घेता येते. आपल्याला प्रगती करायची असेल तर शाळांमधून उत्तम नागरिक घडवण्याची गरज आहे. शिक्षणातून नागरिकनिर्मितीसाठी विवेक आणि शहाणपणाची वाटच महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी शिक्षणातून मूल्यांचा विचार अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.

सजीवसृष्टीत मानव हा प्राणी आहे. प्राण्याचे माणूस म्हणून रूपांतर करण्यासाठी शिक्षण आहे. शिक्षण घेतलेला माणूस हा समाजनिर्मितीसाठी महत्त्वाचा घटक असतो. आज शिक्षणाच्या प्रक्रियेतील सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. शिक्षणाचा आलेखही उंचावतो आहे आणि त्याचवेळेस माणसांच्या चांगुलपणावर देखील प्रश्न निर्माण होतो आहे. शिक्षण संस्थांची निर्मिती माणसाचे चांगुलपण निर्माण करण्यासाठी केली जाते. शिक्षणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आणि अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम तयार केला जात असतो. त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला उद्याचा समाज नेमका कसा हवा आहे? यादृष्टीने पेरणी केली जात असते. त्यासाठी अभ्यासक्रमात मूल्यांचा विचार, जीवनकौशल्य, गाभा घटक, एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये यासारख्या अनेक घटकांचा विचार करून अभ्यासक्रम विकसित केला जात असतो. आता इतका सारा विचार करून शिक्षणाची प्रक्रिया पुढे जात असेल, तर आपल्याला यादृष्टीने अपेक्षित फलित प्राप्त होते आहे का? याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

शिक्षण घेतल्यानंतर, हाती पदवी येऊनही माणसातील हिंस्रता अजूनही कमी होताना दिसत नाहीत. शिक्षण घेतलेली माणसे अधिक हिंस्र बनत चालली असल्याचे चित्र आपल्या भोवतालमध्ये दिसत आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक विकासाचा विचार हरवत चालला आहे. शिक्षणात समतोल विकासाचा विचार फारसा होताना दिसत नाही. त्या पलीकडे माणसांचा विवेक गमावणेदेखील घडते आहे. शहाणपणाची वाटही हरवून बसते. आपण विवेक आणि शहाणपण गमावले की, आपल्यातील मनुष्यत्वाचा विचार हरवणे घडत जाते आणि माणूसपण संपुष्टात आले म्हणून समजावे. माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. जगाच्या पाठीवर प्राण्यांमध्ये मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे, असे समजले जाते. याचे कारण इतर प्राण्यांपेक्षा त्याला अधिक बुद्धीची देणगी निसर्गाने दिली आहे, असे मानले जाते. त्या बुद्धीचा प्रभावी, परिणामकारक आणि सद्विचाराच्या दिशेने विचार केला जात नाही, असेच चित्र दर्शित होते आहे. त्यामुळे बदलापूरसारख्या घटना शिक्षणक्षेत्रात समोर येत आहेत आणि त्यामुळे सारेच शिक्षण क्षेत्र संशयाच्या भोवर्‍यात सापडते आहे.

शिक्षणासारख्या क्षेत्रात एखाद्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग होणे, ही अत्यंत गंभीर गोष्ट मानायला हवी. असे घडत असेल तर आपल्यातील माणूसपण अजूनही जिवंत झालेले नाही, असेच म्हणावे लागेल. मानव म्हणून असलेल्या आपल्यातील अवगुणांचे हनन करून त्याला पैलू पाडण्याचे काम शिक्षणाने करायचे असते. ते शिक्षणाचे काम आहे. मानवप्राण्यांचे मनुष्यत्वात रूपांतर करण्याचा विचार शिक्षणातून घडायला हवा, असे आपण मानत आलेलो आहोत. किंबहुना, तेच शिक्षणाचे कार्य आहे. मात्र, वर्तमानातील अनेक घटना आपण जेव्हा पाहतो, तेव्हा शिक्षण मूलभूतपणे मूल्यांची पेरणी करण्यात अपयशी ठरले आहे, असेच म्हणावे लागेल. आपण अजूनही माणूस निर्माण करण्यात अपयशी ठरलो आहोत, हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. अशा ज्या घटना घडतात, तेव्हा तो प्रवास प्राणी म्हणूनच सुरू आहे, हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षण परिवर्तन करण्यात अपयशी ठरले आहोत, हे वास्तव आता समजून घेण्याची गरज आहे.

माणूस हिंस्र आहे आणि ते अनेक घटनांमधून समोर येते. एक प्राणीसंग्रहालय होते. त्या संग्रहालयामध्ये प्रत्येक प्राण्यासाठी स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आलेले होते. माणसं प्राणी संग्रहालयात प्राणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने यायचे. प्रेक्षक आत गेले की, त्या प्रत्येक कप्प्यामध्ये कोणता प्राणी आहे आणि त्या प्राण्याची कोणती वैशिष्टये आहेत, ती तेथील फलकावर नोंदवलेले होते. संपूर्ण संग्रहालय पाहून झाले की, शेवटी एक कप्पा होता आणि त्या शेवटच्या कप्प्यामध्ये मात्र कोणीही प्राणी नव्हता. तेथे एक आरसा लटकवलेला होता आणि त्याखाली लिहिलेले होते की, जगातील सर्वाधिक हिंस्र आणि अविश्वासू प्राणी. खरेतर, जेथे हे लिहिले होते तेथे कोणताही प्राणी नव्हता. मात्र, येथे असलेल्या आरशात येणार्‍या प्रत्येकालाच स्वतःचा चेहरा दिसायचा. जो मानव उभा राहून तेथे पाहतो आहे, त्याचा चेहरा दिसत होता. याचा सरळ अर्थ होता मानव हा अत्यंत अविश्वासू, अप्रामाणिक आणि त्याचबरोबर हिंस्रदेखील होता. अर्थात, हे अनेकदा समोर येतेच आहे. बदलापूरची घटना ही त्याची साक्ष देते. अजूनही आपण मानवाचे माणसांत रूपांतर करण्यात पुरेसे यशस्वी होऊ शकलो नाही, हे सातत्याने अधोरेखित होते. आपल्या समाजातील वाढता भ्रष्टाचार, वाढता हिंसाचार, वाढते विनयभंगाचे प्रकार, वाढते बलात्कार, लैंगिक हिंसेच्या घटना त्याची साक्ष देत आहेत. गेल्या काही वर्षांत देशातील गुन्हेगारीचा आलेख पाहता, आपल्या महाराष्ट्राचे स्थान उंचावते आहे. त्यात बालगुन्हेगारीतील आलेखही चिंताजनकच आहे. त्यामुळे आपल्या संतांचा महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवला आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

आपल्याला यांसारख्या घटनांवर खरोखर मात करायची असेल तर शिक्षणावर अधिक विसंबून राहावे लागणार आहे. त्यासाठी शिक्षणातील मूल्यांची पेरणी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर त्यातून जो बदल करायला हवा आहे तो कोणता आहे? तर माणसांनी अधिक मूल्याधिष्ठितेची वाट चालण्याची गरज आहे. अशा घटना समोर आल्या की, तात्पुरत्या स्वरूपात उपचार करण्यासाठी उपाययोजना राबवल्या जातात. मात्र, त्या उपाययोजना फारशा परिणामकारक होत नाही, हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. आपल्या शिक्षणाच्या प्रक्रियेतून मूल्यांचा विचार जणू हरवत चालला आहे, असे दिसू लागले आहे. पालक म्हणून शाळांकडून फारशा अपेक्षा नाहीत. त्यांना केवळ आपल्या पाल्याला मार्क हवे आहेत. मात्र, मार्कांच्या पलीकडे शिक्षणाचा विचार असतो, त्यातून संस्कार मूल्यांची पेरणी करायची असते. शिक्षणाची ती जबाबदारी आहे, हाच विचार आपण जवळपास हद्दपार केला आहे. प्रत्येक जण शाळेमध्ये केवळ मार्क मिळवण्यासाठी येत असेल, तर ते मार्क मुलांना मिळतील. मात्र, मार्काच्या जोरावर उद्या तो विद्यार्थी ज्या क्षेत्रात भरारी घेणार आहे, त्या क्षेत्रामध्ये माणूस म्हणून हवा असलेला विचार त्याच्यात सामावलेला नसेल.

माणूस म्हणून जगण्याचा विचार नसेल तर व्यक्ती जीवनामध्ये सुखी, समाधानी होऊ शकणार नाही. त्याला स्वतःला हवा तितका पैसा मिळेल. त्याची आर्थिक प्रगती, भरभराटही होईल. पण, समाज, राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेत त्याचे योगदान शून्य असणार आहे. त्याच्या वाटचालीचा समाजालाही तसा फारसा उपयोग होणार नाही, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. असे काही प्रसंग घडले की उपाययोजना केल्या जातात, पण त्या सार्‍याच मलमपट्ट्या ठरतात. शिक्षणातून मूल्यांची पेरणी झाली आणि ती रुजली तरंच बरेच काही हाती लागेल. मात्र, त्याचवेळी घरीदेखील संस्कार करण्याची जबाबदारी पालकांनी घ्यायला हवी. आजच्या धकाधकीच्या काळात पालकांना आणि विशेषतः दोघेही पतीपत्नी नोकरी करत आहेत. त्यांची धावाधाव सुरू असते. नोकरीच्या निमित्ताने कुटुंबं छोटी होत आहेत. घरातील संस्काराची विद्यापीठे म्हणजे आजीआजोबा. मात्र, आता ती विद्यापीठे अधिक दुरावत आहेत. परिस्थितीचा तो परिणाम असला तरी त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. त्या उणिवांचे भरण करण्यासाठी पालकांचा शोध सुरू आहे. अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात संस्कार शिबिरे सुरू आहेत.

मात्र, अशा संस्कारांच्या वर्गाने किती परिणाम साधला जाणार, हाच खरा प्रश्न. मुळात अन्न खाल्ल्यावर शरीराचे भरण होते, तसे भरण फास्ट फूड खाल्ल्याने घडत नाही. तसे या संस्कारवर्गाने मस्तक आणि हृदयाचे भरण होण्याची शक्यता नसते. संस्कार असे सांगून आणि तात्पुरत्या स्वरूपातील वर्ग घेऊन होण्याची शक्यता नसते. विद्यार्थी जे पाहतात तोच मार्ग अनुसरत असतात. त्यामुळे संस्कारांसाठी घर आणि शाळा दोन्ही केंद्रे अधिक महत्त्वाची असतात, हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याला मूल्यांच्याशिवाय परिवर्तनाची वाट सापडण्याची शक्यता नसते. काही काळ गेला की अशा घटना थांबतात. पुन्हा नव्याने त्या घडू लागतात. याचे कारण समाज म्हणून आपल्याला ज्या मूल्यांची वाट चालण्याची गरज असते, त्या वाटा चालणे घडत नाही. त्या मूल्यांपेक्षा केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्यांनी आपण उपाययोजना करू पाहत आहोत. त्यामुळे फार काही हाती लागत नाही. आपण मुलींना समाजात सुरक्षितता वाटावी. त्यांना आलेला संकटांचा सामना करता यावा म्हणून त्यांना कराटे शिकवले जातील. स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणखी काही वेगळे प्रयत्न केले जातील. संकटावर मात करण्यासाठी पोलिसांचा क्रमांक दिला जाईल. आरोपीला शिक्षा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. न्यायालय शिक्षा करेल. या वाटा चालल्यानंतर समाज चांगला आहे असे कसे म्हणता येईल? मुळातच घटना घडल्यानंतर त्या सर्व उपाययोजना आहेत त्या होत राहतील.

मात्र घटनाच घडू नये, या दृष्टीने शिक्षणातून प्रयत्न करण्याची गरज आहे. वर्तमानात शिक्षणातून केवळ अक्षर साक्षरतेची वाट चालतो आहोत. त्या पलीकडे असलेला मनःपरिवर्तनाचा विचार अधिक महत्त्वाचा आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारी मूल्ये रुजवण्याचा विचार आपल्या शिक्षणातून करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. आपण शिक्षणात निर्माण करत असलेली स्पर्धा एक ना एक दिवस माणूसपणाचा बळी घेईल यात शंका नाही. त्यामुळे शिक्षणातून अपेक्षित केलेल्या मनुष्य विकासाचा मार्ग अनुसरल्याशिवाय आपल्याला आज तरी पर्याय नाही. आज आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जाते आहे. आरोपीला फाशी दिली म्हणजे गुन्हे थांबतील असे कधी घडत नाही. आजवर अनेक गुन्ह्यांत फाशी झाली म्हणून तसे गुन्हे थांबले आहेत, असे घडले नाही. त्यासाठी मानसिक परिवर्तन आवश्यक आहे. त्यामुळेच शिक्षणातूनच मूल्यांची पेरणी महत्त्वाची ठरणार आहे. त्याशिवाय गर्दीचे समाजात रूपांतर होणार नाही आणि समाज निर्माण झाल्याशिवाय अशा घटनाही थांबणार नाही.
संदीप वाकचौरे