मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Violence in Bangladesh) बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार घडल्याचे निदर्शनास आले आहे. रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी ढाकामध्ये संध्याकाळपासून रात्रीपर्यंत हिंसक निदर्शने करण्यात आली. अंतरिम सरकारमध्ये समाविष्ट भेदभाव विरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांसोबत अन्सार सिक्युरिटी एजन्सीच्या कामगारांशी झालेल्या भांडणामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. अन्सार सिक्युरिटी एजन्सी हसीनाची समर्थक मानली जाते. नियमितीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या अन्सार एजन्सीच्या कामगारांनी सचिवालयातील अनेक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवले. या काळात झालेल्या हिंसाचारात किमान ४० जण जखमी झाले आहेत.
हे वाचलंत का? : झारखंडमध्ये एकही बांगलादेशी घुसखोर नाही...
बांगलादेशातून प्रकाशित होणाऱ्या ढाका ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार, भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलनाचे नेते हसनत अब्दुल्ला हे सायंकाळी सचिवालयाजवळ विद्यार्थी आणि अन्सार सदस्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात जखमी झाले. या चकमकींमध्ये विद्यार्थी, अन्सार सदस्य, प्रवासी आणि पत्रकारांसह किमान ४० जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्र जसजशी वाढत गेली, तसतशी सचिवालयाजवळ विद्यार्थी आणि अन्सार सदस्यांमध्ये चकमकही वाढत गेली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने रात्री दहाच्या सुमारास लष्कर दाखल झाले. सैनिकांची उपस्थिती असूनही विद्यार्थी आणि अन्सार सदस्यांमध्ये गोळीबार सुरूच होता. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
सचिवालयाच्या गेटवर लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. कोणत्याही षड्यंत्राला विरोध करण्याची शपथ घेत विद्यार्थी घोषणा देत होते. ढाका विद्यापीठातील अतिक हुसेन या विद्यार्थ्याने सांगितले की, अन्सार सदस्यांच्या सुरुवातीच्या मागण्या पूर्ण झाल्या होत्या, परंतु आता ते अवास्तव मागणी करून परिस्थिती गुंतागुंतीत करत आहेत. विशेषत: देशात सध्या सुरू असलेले संकट पाहता त्यांच्या कृतीमागे षडयंत्र असू शकते, असे ते म्हणाले. रात्री १०.३० च्या सुमारास सल्लागार नाहीद इस्लाम आणि आसिफ महमूद सचिवालयातून बाहेर आले आणि त्यांनी संतप्त विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्सार सदस्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
अंतरिम सरकारचे गृह व्यवहार सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर अन्सार सदस्यांनी आंदोलन मागे घेतले. आपल्या नोकऱ्या राष्ट्रीयीकरणाच्या मागणीसाठी अन्सार सदस्य दोन दिवसांपासून आंदोलन करत होते. दरम्यान, अन्सारच्या काही सदस्यांनी सचिवालयात प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुमारे दहा तास ओलीस ठेवल्याची माहिती आहे. पोलीस आणि लष्कर घटनास्थळी पोहोचल्यावर रात्री साडेदहा वाजता सचिवालयाचे तीन क्रमांकाचे गेट उघडल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.