मुंबईतील ८ रेल्वेस्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

विधिमंडळात ठराव मंजूर; नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार

    09-Jul-2024
Total Views |

mumbai
 
मुंबई : पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील आठ स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा ठराव मंगळवार, दि. ९ जुलै रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांची नावे ब्रिटिशकालीन आहेत.
 
ही नावे वसाहतवादाचा नकारात्मक वारसा सांगतात. त्यामुळे त्यांची नावे बदलण्यात यावीत, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पुढे येत होती. तिचा सकारात्मक विचार करून, करी रोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड रोड, किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राची मोहोर उमटल्यानंतर या ठरावाला अंतिम स्वरूप प्राप्त होईल.
 
कोणत्या स्थानकाचे नाव बदलणार :
करी रोड - लालबाग
सँडहर्स्ट रोड - डोंगरी
मरीन लाईन्स - मुंबादेवी
चर्नी रोड - गिरगाव
कॉटन ग्रीन - काळा चौकी
सँडहर्स्ट रोड (हार्बर) - डोंगरी
डॉकयार्ड रोड - माझगाव
किंग सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ