बेस्ट कर्मचार्‍यांच्या प्रश्नांसाठी समिती

    05-Jul-2024
Total Views |

Best
 
मुंबई :“बेस्ट कर्मचार्‍यांची सरळ सेवा भरती, पदोन्नतीसह रखडलेल्या अन्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन केली जाईल,” अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, दि. 4 जुलै रोजी दिली. आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत नियम 97 अन्वये बेस्ट उपक्रम आणि बेस्टच्या कर्मचार्‍यांचे प्रश्न या अनुषंगाने अर्धा तास चर्चेची मागणी केली होती. यावेळी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून श्रमिक उत्कर्ष सभा या कामगार संघनेचे अध्यक्ष आमदार लाड यांनी बेस्ट कर्मचार्‍यांच्या हिताचे काही प्रश्न उपस्थित केले.
 
प्रसाद लाड म्हणाले की, “मुंबईत लोकलनंतर जीवनवाहिनी म्हणून बेस्टकडे पाहिले जाते. एकप्रकारे मुंबई शहराच्या रक्तवाहिनीप्रमाणे बेस्ट वाहतूक सेवा पुरवत आहे. परंतु मुंबई शहर व उपनगरामध्ये प्रवाशांना अविरत परिवहन सेवा तसेच मुंबई शहरात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणार्‍या बेस्ट उपक्रमातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचारी आणि अधिकारी यांची भरती, पदोन्नती करणार का? बेस्ट कर्मचार्‍यांचा कोविडभत्ता कामगारांच्या खात्यावर पुढील 4 दिवसांत वर्ग करणार का? मुंबई हायकोर्टाने ग्रॅज्युएटीची रक्कम कर्मचार्‍यांना प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत,
 
ते 350 कोटी रुपये पुढील 4 दिवसांत त्यांच्या खात्यावर वर्ग करणार का? मुंबई महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 134मधील तरतुदीनुसार तूट भरून काढून, महापालिकेच्या माध्यमातून बेस्टला मजबूत करणार का? प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत तरतूद करून महापालिका हा निधी देणार का? त्याचप्रमाणे म्हाडाच्या माध्यमातून बेस्ट कर्मचार्‍यांच्या वसाहती तसेच 27 डेपोचा पुनर्विकास करून कर्मचारी आणि बेस्ट उपक्रमाला दिलासा देणार का?,” असे सवाल आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात उपस्थित केले आहेत. त्यावर बोलत असताना मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर दिले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी बैठक घेण्याचे निर्देश दिले. या बैठकीला आमदार लाड यांना बोलावण्याच्या सूचना उपसभापतींनी दिल्या. या बैठकीनंतर समिती स्थापन करण्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.