मुंबई : लहान वयापासूनच मुलांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करण्यावर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका भर देत असून शालेय स्तरावर शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळा शाळांमध्ये घेण्यात येत आहेत. अशाच प्रकारच्या कार्यशाळा आज कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ २ उपायुक्त संजय शिंदे व घनकचरा व्यवस्थापन परिमंडळ २ उपायुक्त स्मिता काळे यांच्या माध्यमातून राबविण्यात आल्या.
यामध्ये कोपरखैरणे विभागात कोपरखैरणे गाव शाळा क्र.३६ व १२२ मध्ये लर्निंग लिंक फाऊन्डेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये मोठया संख्येने सहभागी विदयार्थी – विदयार्थिनी यांनी अत्यंत आवडीने स्वत:च्या हातांनी गणपती बाप्पा साकारला. कोपरखैरणे विभागाचे सहाय्य्क आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या पुढाकारातून मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी अतिशय उत्साहात हा उपक्रम राबविला.
घणसोली विभागातही सहाय्य्क आयुक्त उत्तम खरात व स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांनी टिळक इंटरनॅशनल स्कूल, घणसोली याचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्याने १०० हून अधिक विदयार्थ्यांनी श्री गणेशमूर्ती निर्मितीचे धडे घेतले.
ऐरोली विभागात शाळा क्र.५३ चिंचपाडा येथेही सहाय्यक आयुक्त सुनिल काठोळे व मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून मुख्याध्यापक रमेश तेली व शिक्षक यांच्या सहयोगाने उत्साहात कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये लर्निंग लिंक फाऊन्डेशन या संस्थेच्या सहयोगातून मोठया संख्येने सहभागी विदयार्थ्यांनी गणेशमूर्ती साकारल्या.
दिघा विभागातही शाळा क्र.५२ दिघा या ठिकाणी सहाय्यक आयुक्त नैनेश बदले यांच्या माध्यमातून मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने हा उपक्रम यशस्वी केला.
श्रीगणेशोत्सव हा राज्यातील सर्वाधिक उत्साहात साजरा होणारा उत्सव असल्याने मुख्यमंत्री महोदयांनी श्रीगणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या गणपती बाप्पाच्या आकर्षणाला पर्यावरणाची जोड देत शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती बनविणेची कार्यशाळा विदयार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये आयोजित केली जात आहे व त्याला विदयार्थ्यांचया मोठया संख्येने उत्साही सहभाग लाभत आहे.