नेपाळमधला भाई‘चारा’

    04-Jul-2024   
Total Views |
Muslim mob stops road construction nepal


एखाद्या वस्तीचे सोडा, एखाद्या गल्लीचे जरी नाव बदलायचे असले, तरी त्याला खूप सोपस्कार पार पाडावे लागतात. पण, ‘त्यांची’ त्या गावात फक्त दहाच घरे. म्हणून, काय झाले? त्या दहा घरांनी एकत्रित येत गावाचे शतकानुशतकांचे नाव बदलून चक्क ‘इस्लामनगर’ असे केले. हिंदुबहुल नेपाळ मधील ही घटना. त्या गावात केवळ चार टक्के आणि नेपाळमध्ये सध्या पाच टक्के मुस्लीम वास्तव्यास आहेत, हे इथे उल्लेखनीय!

नेपाळच्या रौतहट जिल्ह्यातील पोठियाही जिल्ह्याचे नाव बदलून , गावात त्या नावाची पाटी लावण्यात आली ‘इस्लामनगर.’ अर्थात, पाटी लावेपर्यंत गावातले इतर लोक जसे भारतातले हिंदू, कांदा, गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येच रममाण होतात, तसेच रममाण झाले होते बहुतेक. पण, गावातल्या लोकांचे लक्ष नसेल का? पण, आपल्याला काय? अशी भारतीय हिंदू समांतर वृत्ती कदाचित नेपाळच्या हिंदूंमध्येही असेल. गावाचे नाव बदलले हे कसे कळले? तर गावातल्या एका चाचाने सेल्फी काढली. ती व्हॉट्सअ‍ॅपवर सगळ्यांनी पाहिली. त्यामध्ये या चाचाच्या पाठी ‘इस्लामनगर’ म्हणून नावाची पाटी दिसली. गावातला चाचा कोणत्या गावात गेला, असे गावातल्या गैरमुस्लिमांना वाटले आणि तिथेच कळले की, अरे या लोकांनी तर आपल्याच गावाला ‘इस्लामनगर’ म्हणून घोषित केले.

मग, 23 जून रोजी नेपाळच्या हिंदू सम्राट सेनेच्या सदस्यांनी हा बोर्ड उखडून फेकून दिला. या बोर्डाशी आपले काही देणेघेणे नाही अशा आविभार्वात त्यावेळी या दहा घरांतली माणसं अगदी शांत होती. मात्र, 25 जूनला रात्री दहा घरे ज्या ठिकाणी होती, तिथून तीन हिंदू युवक जात होते.मग या दहा घरातले सगळे लोक रस्त्यावर आले. ‘इस्लामनगर’ नावाचा बोर्ड का उखाडला? असे विचारत त्यांनी या तीन युवकांना शिवीगाळ आणि प्रचंड मारहाण केली. मारहाण करून पुन्हा तो जमाव त्यांच्या त्यांच्या घरी गेला. अगदी काहीच झाले नाही असे. मात्र, या घटनेने नेपाळच्या रौतहट जिल्ह्यातले वातावरण तापले.स्थानिक राजकारणातही याचे पडसाद उमटले. शेवटी, चक्र वेगाने फिरली आणि चाँद दीवान, रफीक, सिराजुल और मंजूर यांना नेपाळ पोलिसांनी अटक केली.


असो. काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये हिंदूंनी यात्रा काढली होती. देवीच्या विसर्जनाची यात्रा. पण, या यात्रेमध्ये खूप आवाज होतो आणि आम्हाला त्रास होतो, असे म्हणत तिथल्या मुस्लिमांनी यात्रेवरच आक्षेप घेतला. याचे पर्यवसान दंगलीत झाले. रामनवमीच्या यात्रेवर आणि या यात्रेवरही दगडफेक करण्याची कारस्थानं नेपाळमध्ये झाली आहेत. नेपाळची राजकीय परिस्थितीही कमालीची अस्थिर. नेपाळ हे राष्ट्र हिंदूबहुल. नेपाळ पुन्हा हिंदूराष्ट्र घोषित व्हावे म्हणून वर्षानुवर्षे तिथे हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. पण, या देशामध्ये कम्युनिस्ट आणि काँग्रेस विचारधारेचे राजकीय पक्ष मजबूत स्थितीत असल्याने तिथे जनतेची मागणी केवळ आंदोलनस्वरूपातच राहते.
 
 काही अभ्यासकांच्या मते, भारत-नेपाळ सीमेवर अचानकपणे मुस्लिमांची लोकसंख्या वाढली आहे. गावेच्या गावे वसली आहेत. तसेच नेपाळ सीमेवर अमली पदार्थांचा व्यापारही जोरदार सुरू आहे. मानवी तस्करी करण्यासाठीही या सीमेचा वापर गुन्हेगार करत आहेत. तसेच धर्माच्या नात्याने भारत आणि नेपाळ एकत्र येऊ शकतात, असे चीनला वाटते. त्यामुळे भारत आणि नेपाळचे संबंध तणावपूर्ण व्हावेत, यासाठी चीन कायमच प्रयत्नशील. जगभरात हिंदूंंचा म्हणून एकही अधिकृत देश नाही. त्या पार्श्वभूमीवर नेपाळ हिंदूराष्ट्र होऊ नये, यासाठी इतर धर्मीय देश उचापती करत असतात. काही लोकांचे म्हणणे आहे की, नेपाळमधल्या पोठियाही गावामध्ये दहा घरांनी गावाचे नामकरण ‘इस्लामनगर’ करणे हा काही योगायोग नाही.

छोट्या स्वरूपात खेळी करायची. डाव यशस्वी झाला तर तेच पॅटर्न राबवत काही दशकांतच हिंदूबहुल नेपाळची अस्मिता आणि ओळख बदलायची. तरीही, अख्ख्या गावाचे नाव आपल्या आवडीप्रमाणे जबरदस्तीने बदलणारे ते लोक काय नेपाळमध्येच आहेत? आपल्याकडेही भिवंडीच्या पडघ्याजवळ असेच काही महिन्यांपूर्वी गावाचे नाव बदलण्याचे षड्यंत्र रचले गेले होतेच. हिंदूबहुल राष्ट्रांचे भवितव्य आता केवळ या दोन्ही देशांतील बहुसंख्य समाजाचे लोकच वाचवू शकतील का? बाकी भाईचारा आणि ‘गंगा-जमुना तहजीब’ वगैरे वगैरे याबद्दल काय म्हणावे?

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.