विधान परिषदेतून १५ आमदार निवृत्त!

    04-Jul-2024
Total Views |
 
Vidhan parishad
 
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेतून १५ सदस्य (आमदार) निवृत्त झाले आहेत. गुरुवार, दि. ४ जुलै रोजी त्यांना निरोप देण्यात आला. विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील, अनिल परब, महादेव जानकर, मनिषा कायंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. मिर्झा वजाहत, डॉ. प्रज्ञा सातव, जयंत पाटील यांचा त्यात समावेश आहे. पैकी निरंजन डावखरे, अनिल परब, किशोर दराडे हे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून पुन्हा निवडून आले आहेत. अन्य ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे.
 
हे वाचलंत का? -  मरीन ड्राईव्ह-वानखेडेवर लोटला क्रिकेट फॅन्सचा अलोट सागर!
 
निरोप समारंभावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या देशाला संसदीय कार्य प्रणालीचा आदर्श घालून देणारी व्यक्तिमत्वे अनेक दिग्गज, विद्वान या सभागृहाचे सदस्य होऊन गेले आहेत. या सभागृहातूनच महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत महत्वाचे असे कायदे केले गेले आहेत. आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्याचे काम केले आहे. राज्याच्या वरीष्ठ सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करुन जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम या सर्व सदस्यांनी केले. आपल्या कामातून या सर्वांनी वरीष्ठ सभागृहाचा लौकिक वाढवला असून जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे, असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच यावेळी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पुढील वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.