राज्यातील एसटी कर्मचारी संप पुकारणार!

    30-Jul-2024
Total Views |

एसटी महामंडळ
 
मुंबई : राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. येत्या ९ ऑगस्टपासून एसटी महामंडळातील १३ संघटनांनी संप पुकारला आहे. शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना देखील वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.
 
तसेच आयुर्मान संपलेल्या बसेस काढून घ्याव्या आणि नव्या बसेस उपलब्ध करुन द्याव्या अशीदेखील मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी २०२१ मध्ये दीर्घ आंदोलन केले होते. त्यावेळी एसटी बंद झाल्यामुळे राज्यातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले होते. सलग ५४ दिवस संप सुरु होता. तर २० डिसेंबर २०२१ रोजी हा संप मागे घेण्यात आला होता.
 
त्यानंतर राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या मागण्या मान्यदेखील केल्या होत्या. परंतू, त्यात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देण्याचे मात्र नुसते आश्वासनच देण्यात आले होते. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. या अंदोलनात राज्यभरातील १३ एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी होणार आहेत.