मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या भाजप सरकारने राज्यातील शाळांमध्ये २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी (Sawarkar Jayanti) करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर २९ मे रोजी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी असेल. त्याचवेळी, ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याचा दिवस 'स्वर्ण मुकुट मस्तक दिवस' म्हणून साजरा केला जाईल. तर १३ ऑगस्ट रोजी वीर दुर्गादास राठोड जयंती साजरी करण्यास सांगण्यात आले आहे.
हे वाचलंत का? : मोहब्बतचे दुकानदार बनले सरकारी तिजोरीचे लुटारू! काय चाललंय कर्नाटकात?शिक्षण विभागाचे संचालक आशिष मोदी यांनी रविवार, दि. २८ जुलै रोजी राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांसाठी २०२४-२५ साठी कॅलेंडर जारी केले. कॅलेंडरनुसार, यावेळी शाळा वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ २१३ दिवस चालतील. सण आणि इतर कारणांमुळे १५२ दिवस सुट्या असतील. या सुट्यांमध्ये रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे. शिक्षण विभागाच्या कॅलेंडरमध्ये असे म्हटले आहे की १९ ऑगस्ट हा रक्षाबंधन (सुट्टी)/संस्कृत दिन (सण) म्हणून साजरा केला जाईल. यावेळी दिवाळीची सुट्टी २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच १२ दिवस असेल. दरवर्षीप्रमाणे हिवाळ्याच्या सुट्या २५ डिसेंबरपासून सुरू होऊन ५ जानेवारीपर्यंत चालतील.
शाळांमध्ये पहिली परीक्षा २१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट, तर दुसरी परीक्षा १४ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या वेळी सहामाही परीक्षा १२ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. तर वार्षिक परीक्षा (बोर्ड वर्ग वगळता) २४ एप्रिल ते ८ मे या कालावधीत होणार आहेत. परीक्षेचा निकाल 16 मे रोजी जाहीर होणार आहे. शिक्षण विभागाने प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार 'नो बॅग डे' म्हणून घोषित केला आहे. या दिवशी शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये मुलांना स्टेजवर येण्याची संधी दिली जाईल. शाळांमधील नवे सत्र १ जुलैपासून सुरू होणार आहे. याआधी निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांना सुटी जाहीर करण्यात येणार आहे.