संत रामदासस्वामींचा ‘रघुवीर समर्थ’ (भाग-1)

    27-Jul-2024
Total Views |
sant ramdas swami


मराठी संतपरंपरेतील थोर साक्षात्कारी, संत रामदासस्वामी हे रामदास्य भक्तीद्वारे ‘समर्थ’ झाले. श्रीराम हेच त्यांच्या जीवनाचे व कार्याचे अधिष्ठान व सारसर्वस्व होते. श्रीराम हीच त्यांची इष्टदेवता, सद्गुरू, सखा आणि प्रेरणा होती. त्यांचे सारे साहित्य रामभक्तीचा अमृतठेवा आहे. रामकथेचा ‘राष्ट्रीय ग्रंथ’, ‘राष्ट्रप्रेरणा ग्रंथ’ म्हणून संत एकनाथांप्रमाणेच समर्थ रामदासांनी जोरकस पुरस्कार केला. त्यामध्ये विश्व उद्धारण्याचे सामर्थ्य आहे. देव, देश व धर्मासाठी, निस्तेज समाजाला पुरुषार्थाने सज्ज करण्याचे महान ऐतिहासिक कार्य त्यांनी बलोपासनेद्वारे केले. समर्थ रामदासांच्या साहित्यातील ‘समर्थ रघुवीराचे’ दर्शन आपण सलग पाच भागांमध्ये करणार आहोत. ‘धर्म जागो राघवाचा’ या लेखपंचकापैकी पहिला लेख...


रामाची पदे मानसी धरीन।
विश्व उद्धरीन हेळामात्रे।
महाराष्ट्राच्या संतपंचकातील एक प्रमुख संत म्हणून समर्थ रामदासस्वामींच्या अपूर्व योगदानास कृतज्ञतापूर्वक वंदन केले जाते. महाराष्ट्राला फार मोठी वैभवशाली संतपरंपरा आहे. त्यापैकी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास स्वामी यांना महाराष्ट्राचे ‘पंचप्राण’ म्हणूनच गौरविले जाते. संतपंचकातील समर्थ रामदासांबद्दल थोर संशोधक, अभ्यासक कै. रा. चिं. ढेरे म्हणतात, ‘’महाराष्ट्रातील संतपंचायतनातील समर्थ हे प्रथम ‘रामदास’ होते आणि मगच ‘समर्थ’ बनले. त्यांच्या सामर्थ्याचे रहस्य त्यांच्या ‘रामदास्या’त आहे.‘’ समर्थ रामदासस्वामी यांच्या जीवनात प्रभू रामचंद्राचे 1) इष्टदैवत, 2) सद्गुरू 3) सखा 4) प्रेरणा देवता अशा अनेक प्रकारे स्थान दिसून येेते. 

1) जांबमधील बाल्यकाळातच घराण्यातील रामोपासना करीत असतानाच समर्थांना श्रीरामाचा साक्षात्कार झाला व अनुग्रह लाभला. या ठिकाणी श्रीरामाचे स्थान ‘सद्गुरू’ म्हणून आहे. समर्थ म्हणतात, ‘रामचंद्र स्वामी स्वामी राम अयोध्येचा राजा।’

2) नाशिक-टाकळी येथील तपश्चर्येच्या काळात श्रीरामाचे स्थान ‘उपासना दैवत’ म्हणून आहे. ‘राम उपासना ऐसी। ब्रह्मांड व्यापिनी पाहा.’ ही पदे त्याचे द्योतक आहेत.

3) दासबोध-आत्माराम आदी लेखनकाळात श्रीराम ही समर्थांची प्रेरणा देवता आहे. ‘समर्थ कृपेची वचने।’ या दासबोध व आत्माराममधील ओव्या पाहा.

4) पारमार्थिक - राष्ट्रीय-सामाजिक कार्यात श्रीराम हे त्यांचे ‘जनजागृतीचे दिव्य पुरुषार्थी साधन’ आहे. ‘रघुनाथे स्मरोनी कार्य करावे। ते तात्काळचि सिद्धी जाते।’ ही पदे त्याची साक्षच आहे. आणि छ. शिवाजींच्या पराक्रमाद्वारे स्वराज्यनिर्मितीच्या कल्पनेमागे ‘रामराज्य’ हे त्याचे साध्य आहे. थोडक्यात, अशा प्रकारे समर्थांचे अवघे जीवन व कार्य राममय आहे.
घराण्यातील रामोपासना
माता रामो मत्पिता रामचन्दः। स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः॥
बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्रामध्ये व्यक्त केलेल्या, प्रभू रामचंद्रांविषयीच्या भक्तियुक्त दृढनिष्ठा भावाचे, समर्थ रामदास स्वामींच्या समग्र जीवन कार्यातून आपणास विलोभनीय दर्शन घडते. ‘माय, बाप, बंधू, स्वजन, सांगाती। तूचि आदिअंती माहियेर॥’ हा समर्थांचा अभंग श्रीरामप्रभूंचे त्यांच्या जीवनातील अनन्य, एकमेवाद्वितीय स्थान अधोरेखित करणारा आहे. श्रीरामचंद्र हे त्यांच्या जीवन व कार्याचे सारसर्वस्व आहे.

समर्थ रामदासांना रामोपासना लाभली, ती घराण्यात चालत आलेली वडिलोपार्जित उपासना या स्वरूपात, खरंतर ठोसर घराणे मूलतः सूर्योपासक. रामदासांच्या वडिलांचे नावही सूर्योपंत होते व रामदास स्वामींचे जन्मनावही सूर्यवाचक ‘नारायण’ असे ठेवण्यात आले होते. पण, समर्थभक्त कै. शं. श्री. देव एका लेखात म्हणतात- “रामदासांचे पाळण्यातील नाव ‘राम’, ‘राघव’ ठेवण्यात आले होते. कारण, त्यांचा जन्म रामनवमीचा होता.” (संदर्भ ः रामदास रामदासी शताब्दी ग्रंथ) ‘दासविश्राम’मध्ये समर्थांची जी 36 नावे दिली आहेत, त्यात ‘राघोबा’ असे एक नाव आहे. एवढेच नव्हे तर समर्थ पंचायतनातील प्रसिद्ध संत जयराम स्वामी वडगावकर हे रामदासांना ‘राघोबा’ अशाच नावाने संबोधत होते. अशा प्रकारे रामदास स्वामींचा जन्म रामनवमीचा व नावही ‘राम’ हे सूचक होते. मूळ सूर्योपासक घराण्यात रामोपासना कशी आली? याविषयी एक प्रसंग समर्थ शिष्य अनंत मौनी (तंजावर) यांचे शिष्य मेरूस्वामी लिखित ‘रामसोहळा’ या ग्रंथात वर्णिलेला आहे. तो प्रसंग असा- एका सकाळी समर्थांचे वडील सूर्योपंत अंगणात उभे राहून सूर्योपासना करीत असतानाच एक तेजस्वी सत्पुरुष आला आणि त्याने राम, सीता व लक्ष्मण अशा तीन मूर्ती दिल्या व आपण रामोपासना करावी, अशी विनंती करून तो अंतर्धान पावला आणि ठोसर घराण्यात रामोपासनेचा श्रीगणेशा झाला.


अवतारकार्यासाठीच जन्म

समर्थ रामदास स्वामींना (नारायण) वयाच्या केवळ आठव्या वर्षी (इसवी सन 1616 साली) रामदर्शनाचा साक्षात्कार झाला होता. साक्षात्कार ही केवळ एक दिव्य अनुभूतीच नव्हे, तर ती एक सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. अशी अवस्था प्राप्त करण्यास अनेक वर्षे तपश्चर्या करावी लागते; पण अशी श्रेष्ठतर अवस्था समर्थांना बालवयातच प्राप्त झालेली होती. समर्थांचा म्हणजे बाल नारायणाचा जन्मच मुळी ‘चैत्र शुद्ध नवमी’ म्हणजे रामनवमीच्याच दिवशी झाला, हा केवळ योगायोगच नव्हे तर एक संकेत होता. सामान्य माणसे जन्माला आल्यानंतर जीवनाचे उद्दिष्ट शोधतात व मग कार्य करतात. पण, जन्मजात अवतारी पुरुष हे विशिष्ट कार्यसिद्धीसाठीच जन्मलेले असतात. समर्थ रामदासांना (छोटा नारायण) आपल्या जीवनकार्याचे स्मरण होते म्हणूनच त्यांनी लग्नमंडपातून आपल्या इष्ट कार्यासाठी प्रयाण केले. सर्वसामान्य लोक त्याला ‘पलायन’ म्हणतात, पण ते पलायन नसून विधिलिखित इष्ट कार्यार्थ प्रयाण होते. जांब येथून वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडून समर्थ थेट रामचरणांनी परमपावन झालेल्या नाशिक परिसरात आले व गोदावरीच्या तटी टाकळी येथे त्यांनी कठोर तपाचरण केले. या 12 वर्षांच्या तपश्चर्येने घराण्यातील रामोपासना त्यांनी कळसाला पोचविली. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या त्रयोदशी मंत्राचा जपयज्ञ केला. वाल्मिकी ऋषींच्या रामायणाची स्वअक्षरात प्रतिलिपी केली. अशाप्रकारे ग्रंथाची प्रतिलिपी करून ईश्वरचरणी अर्पण करणे, हा भक्तीचाच एक प्रकार आहे.

श्रीराम जय राम जय जय राम।
ऐसा काही एक धरूनि नेम।
जप किजे तेणे आत्माराम। जोडेल नेमे॥
असे समर्थांनी म्हटले आहे. तो केवळ उपदेशच नव्हे तर ती त्यांची स्वानुभूती आहे.

विद्याधर ताठे
9881909775
(पुढील अंकात ः संत रामदास स्वामींचा ‘रघुवीर समर्थ ’भाग 2)